तरुणांनो! वाचा आणि लिहिते व्हा…

0
40
  • – मुलाखत ः अनिल पै

सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. कोकणी भाषेतील साहित्यिकाला मिळालेला हा दुसरा मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार असून यापूर्वी तो रवींद्र केळेकर यांना प्राप्त झाला होता. मावजो हे कोकणी साहित्यविश्‍वात एक कथाकार व कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने अनिल पै यांनी त्यांची घेतलेली ही खास मुलाखत-

नामवंत साहित्यिक दामोदर मावजो म्हणजे आमचे भाई यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम या साहित्यसेवकाचे मी मनापासून अभिनंदन केले व ‘साहित्यनिर्मिती, भारतीय भाषांचे भवितव्य’ यासंबंधी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.

प्रश्‍न ः ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त रवींद्र केळेकर यांच्यानंतर तुम्हाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार तुम्हाला अपेक्षित होता काय?
मावजो ः अपेक्षित असते तर त्याला किंमत राहिली नसती; ते अनपेक्षितच होते. भारतात ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतील असे मोठमोठे साहित्यिक आहेत. या साहित्यिकांतून माझ्या नावावर या पुरस्कारासाठी शिक्कामोर्तब झाली, याबद्दल मला अपार आनंद झाला. देशात मोठमोठे नामांकित साहित्यिक या पुरस्कारासाठी योग्य आहेत याची मला जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच नम्रपणे हा पुरस्कार मी स्वीकारत आहे.

प्रश्‍न ः माजोर्डा येथे शिक्षक होतो तेव्हापासून आपणास मी पाहत आलो आहे. तुमचं किराणा मालाचं दुकान होतं. तिथे दुकानात काम करीत असताना फावल्या वेळेत तुम्ही लिहीत असताना मी पाहिले आहे. तुमची दोन्ही कामं समांतरपणे चालू असत. गेल्या साठ वर्षांपासून तुम्ही अखंडितपणे लिहीत आहात. भारतीय व विदेशी भाषांतील पुस्तकांचे वाचन करीत आहात. हे साहित्याचे बीज तुमच्यात कसे रुजले?
मावजो ः साहित्याचे बीज माझ्या आईमुळे माझ्यात आले. मी लहान असताना ती मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. ती कहाणी अगदी फुलवून सांगायची. मी जेव्हा आजारी पडलो होतो तेव्हा वडिलांनी मला बालरामायण व मुलांचे महाभारत आणून दिले. ती पुस्तके मी अधाशासारखी वाचून काढली. माझी आई निरक्षर होती. पण तिला सांगितलेल्या कथा आवडत. या दोन्ही पुस्तकांचे मी कित्येकदा पारायण केले. त्यातूनच वाचनाची गोडी लागली व पाया रचला गेला.
मडगाव येथे मला शिक्षणासाठी जावे लागले. सकाळी रेल्वेने मडगावला जायचो. शाळा सुटल्यानंतर रेल्वेने सायंकाळी परत घरी जाईपर्यंत मधे वेळ मोकळा असायचा. तेव्हा त्या वेळेत ग्रंथालयात जाऊन मी पुस्तके वाचायचो. अशा प्रकारे दोनतीन ग्रंथालयांतली कितीतरी पुस्तके मी वाचून काढली. ग्रंथालयात दर्जेदार पुस्तक होती. त्याकाळी वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांची पुस्तके वाचली. सुरुवातीला साने गुरुजींच्या पुस्तकांचे वाचन करून साहित्यिक रूची वाढविली. सरोजिनी बाबर व मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तके वाचून काढली. ते लोकांमध्ये लोकप्रिय नव्हते पण पुस्तके दर्जेदार होती. त्यानंतर इंग्रजी वाचन सुरू केले व लेखनाची प्रेरणाही वाचनातूनच मिळाली.

प्रश्‍न ः सुरुवातीस तुम्ही मराठीतून लिहीत होता ना?
मावजो ः सर्व सर्जनशील साहित्य फक्त कोकणीतून लिहिण्याची प्रेरणा मला कोकणीनेच दिली. पण सुरुवातीस प्रॅक्टिस मराठीतून केली. निबंध लेखन, कहाण्या मी मराठीतून लिहिल्या. मडगाव येथील महिला विद्यालयात शिकत असताना तेथे आम्हाला चंद्रकांत केरकर- चित्रकार सुबोध केरकर यांचे वडील- शिकवीत असत. ते चांगले चित्रकारही होते. आम्हाला ते मराठी शिकवत. एकदा त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, तुला मराठी चांगली येते. आता न येणारी भाषा तू शिक! तू आता फ्रेंच शिकायला घे. ती शिकल्यास तुला आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्य वाचता येईल. पण दुर्दैवाने मी मनावर घेतले नाही. ती भाषा शिकलो असतो तर त्याचा निश्‍चितच फायदा मला झाला असता. असो.
सुरुवातीस मराठीतून शिक्षणावर एक लेख लिहिला आणि तो ‘गोमन्तक’ दैनिकात पाठवला. पण मग लगेच मी उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेलो. तिथे गेल्यावर समजले की तो लेख प्रसिद्ध झाला आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण मुंबईत गेल्यावर समजले की माझी मराठी ही ग्रांथिक, पुस्तकी मराठी. त्यामुळे त्यात जो फ्लेवर साहित्यात आला पाहिजे तो क्रियेटिव्ह फ्लेवर येत नाही. मुंबईतील लोकांची मराठी भाषेकडे बघण्याची दृष्टी मला समजली. तिथे मी व पत्नीने एकदा नाटकातही काम केले होते. तो संवाद ऐकून एकाने मला ‘कुठचे तुम्ही?’ असे विचारले. लगेच मी गोव्याचा असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने म्हटले, तरीच मला वाटले! तेव्हाच मला आमची भाषा वेगळी आहे हे समजले. तेथे सुरेश काकोडकर यांनी ‘कोकणीची व्याकरणी बांधावळ’ हे पुस्तक आणून दिले. ते शणै गोंयबाबांचे होते. ते वाचल्यानंतर मला साक्षात्कार झाला की, कोकणीतून आपण सुंदर लिहू शकतो! मग त्यांची आणखीन पुस्तके वाचली. त्यातून कोकणीतून लिहिण्याची प्रेरणा मिळाली व मी भरभर लिहू लागलो. मी मराठीत, इंग्रजीत लेख लिहितो खरा; पण कथा-कादंबरी फक्त कोकणीतूनच लिहितो. सर्जनशील साहित्य कोकणीतूनच प्रकाशित करतो.

प्रश्‍न ः आपण गोव्यातील समाजजीवनाचे दर्शन घडविणारे साहित्य कथा-कादंबर्‍यांतून लिहिले… विशेषतः महिलांवरील अत्याचारांविषयी. गोव्यातील महिला नोकरीसाठी विदेशात- आखाती देशांत जातात. तेथील महिलांवरील परिस्थितीवर आपण ‘कार्मेलीन’ ही कादंबरी लिहिली. पण ती लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली?
मावजो ः मी महिलांवर लिहायला पाहिजे म्हणून लिहीत नाही. समाजात जे पाहायला मिळते ते वास्तव दर्शन असते. ते लिहावे असे वाटले म्हणून लिहीत गेलो. आमच्या नजरेसमोर महिलांवर जे अत्याचार होतात, ते मी लिहिले. ‘कार्मेलीन’ लिहिताना मला आमच्या गावातील अनेक कार्मेलीना पाहायला मिळाल्या. त्यांच्यावर लिहावेसे वाटले. त्यासाठी निरीक्षण केले, त्यांच्यातील वास्तव समजून घेतले, तेथील वातावरणाचा सखोल अभ्यास केला… त्यामुळे जशी महिला साहित्यात यायला हवी तशी कार्मेलीन कादंबरीतून आली आहे. महिला जशी असली पाहिजे तशी ती या कादंबरीत आली.

प्रश्‍न ः कार्मेलीन कादंबरी भारतीय व विदेशी भाषांतही अनुवादित झाली आहे. हा विषयच वेगळा असल्याने तो सर्वांना भावला. देशात शिक्षित लोकांची संख्या वाढली आहे. इंटरनेटच्या जमान्यात पुस्तक वाचायची सवय कमी झाली आहे, वाचनसंस्कृती कमी झाली आहे. साहित्य मोठ्या प्रमाणात येत आहे, पण ते वाचले गेले नाही तर या भारतीय भाषांतील साहित्याचे भवितव्य काय?
मावजो ः वाचनसंस्कृती कमी झाली आहे असे नाही, तर माध्यमंही कमी झाली आहेत. आधी रविवारची नियतकालिके मोठ्या प्रमाणात खपत असत. आता ती परिस्थिती नाही… नियतकालिकेच कमी येताहेत. आता सोशल मीडियावर सर्वकाही वाचता येते. यू-ट्यूब, व्हिज्युअल-व्हर्च्युअल, व्हेब साईटवर साहित्याविषयी चर्चा चालते. साहित्य वाचायला मिळते. या बदलाचा आम्ही स्वीकार करायलाच हवा. आम्ही बदल करू इच्छित असलो तरी आमच्या तरुण पिढीने त्यांचा स्वीकार केला आहे. त्यांना आम्ही टीव्ही बघू नका असे न सांगता टीव्हीवर काय बघावं हे सांगितलं पाहिजे. मोबाईलबाबत तीच स्थिती आहे. त्यांना आपण अडवू शकत नाही. त्यांच्या कलाने घेतले पाहिजे. वाचनसंस्कृती कमी झाली असे मला वाटत नाही. छापील साहित्य वाचणे कदाचित कमी झाले असेल. काळाप्रमाणे बदल तर होतच असतो. पण साहित्याला उज्ज्वल भविष्य आहे. मी याकडे सकारात्मक दृष्टीने बघतो. जर तरुणपिढी वाचत नाही असे वाटत असेल तर त्याला आम्ही लेखक कमी पडतोय असे म्हणावे लागेल.

प्रश्‍न ः कोकणीत आता विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित होत आहे. मोठ्या प्रमाणात कथा, ललित लेख, कवितांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या साहित्यासंबंधी आपण आपले मत परखडपणे मांडता. आजच्या कोकणी साहित्याविषयी काय सांगाल?
मावजो ः एखादे साहित्य आवडले तर मी निःसंकोचपणे आवडल्याचे सांगतो. पण जे आवडले नाही त्यावर विचार व्यक्त न करता गप्प राहणे पसंत करतो. एक खंत वाटते, आताचे नवलेखक, तरुण साहित्यिक एक पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर संतुष्ट राहतात. इतरांचे साहित्यही वाचत नाहीत. त्यांनी वाचन करणे गरजेचे आहे. कोकणी, मराठी, हिंदी भाषांतील साहित्याचे त्यांनी वाचन केले पाहिजे. हे साहित्य आज अगदी सोपेपणी उपलब्ध आहे. मराठी, हिंदीतील कोणतीही दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. इतर ज्येष्ठ लेखकांशी कोणती पुस्तके वाचावीत याबाबत चर्चा करायला हवी. मी पदवीधर झाल्यानंतर लिहायला लागतो. रवींद्रबाबांचे शिक्षण फारसे नव्हते, पण विचारांचे धन आकाशाएवढे होते. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांनी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. फक्त कोकणीतीलच नव्हे तर इतर भाषांतील पुस्तकेही वाचायला उपलब्ध आहेत. त्यांनी ऐतिहासिक वा इतर चांगली पुस्तके वाचावीत. शिक्षकांनीही मुलांना पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले हवे. माझ्या विद्यार्थिदशेत शिक्षक मार्गदर्शन करीत असत. आजच्या मुलांना तसे मार्गदर्शन मिळाले तर तरुण साहित्यात फार मोठी मजल मारू शकतील.

प्रश्‍न ः तुम्ही एक ज्येष्ठ व नामांकित लेखक आहात. आजच्या तरुण लेखकांना, मग ते कोणत्याही भाषेतील असोत, काय संदेश देऊ इच्छिता?
मावजो ः मी लहानाचा मोठा झालो; पण मी संदेश देऊ इच्छित नाही. मी कोणाचेही संदेश ऐकले नाहीत. कोणी दिल्यासही या कानाने ऐकले व दुसर्‍या कानातून सोडून दिले. अनुभवातून हे सांगतो. वाचन, निरीक्षण, संशोधन तरुणांनी केले पाहिजे, ते आजचे तरुण करीत नाहीत. मागे मी एक कथा वाचली होती. एक मोठे मॉल आहे. कृत्रिम माणसांची यंत्रे तिथे आहेत. त्यांना मेंदू आहे, भावना आहेत. प्रेमभावना ते समजून घेतात. हे एक सुंदर पुस्तक आहे. लहान मुलांपर्यंत अशी पुस्तके पोचली पाहिजेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवली पाहिजे. ती लागली तर भविष्याचे वेध घेण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल. ते समर्थ होतील.

प्रश्‍न ः तुम्हाला यापेक्षा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळावेत अशी गोमंतकीयांची इच्छा आहे…
मावजो ः गोमंतकीयांच्या भावनांचा, अपेक्षांचा मी आदर करतो. पण ज्ञानपीठ पुरस्काराने मला मोठे बनविले नाही… मी आहे तसाच आहे. आता याचा फायदा आमच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे. कोकणी साहित्यिकाला, कोकणीला एवढा मोठा पुरस्कार मिळू शकतो हे जाणून त्यांनी आणखी लिहिले पाहिजे. ते साहित्यनिर्मिती करू लागले, वाचन करू लागले, तर मला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे खरे सार्थक झाले असे मी समजेन.

दामोदर मावजो हे केवळ साहित्यिकच आहेत असे नव्हे, तर ते कोकणी राजभाषा चळवळीतील एक आघाडीचे नेते आहेत. कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यात जे ५५५ दिवसांचे उग्र आंदोलन झाले होते, मावजो त्यातील एक नेते आहेत. कोकणी भाषेला गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांत दोन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले. रवींद्र केळेकर यांना २००६ साली तर गोवामुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षात श्री. मावजो यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कथा, कादंबरी, पटकथालेखक, बालसाहित्य, नाटक, निबंध असे वेगवेगळे प्रकार मावजो यांनी हाताळले व आजही साहित्यनिर्मितीचे काम चालू आहे…
कोकणीला कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त झालेली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. मग ती साहित्य अकादमीची मान्यता असो, राजभाषेचा दर्जा असो. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद अधिक वाटतो असे ते म्हणाले.


साहित्य पुरस्कार
१९७३- ‘गांथन’ या कोकणी कथासंग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा आणि गोवा कला अकादमीचा पुरस्कार.
१९७६- ‘जागरणां’ या कथासंग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा पुरस्कार.
१९७७- ‘निळें निळें सवणें’ (नाटक)- कोकणी भाषा मंडळाचा पुरस्कार.
१९७९- ‘काणी एका खोमसाची’ या बालसाहित्याला कला अकादमी पुरस्कार.
१९८३- ‘कार्मेलीन’ या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.
१९९७- पहिल्या गोवा फिल्म उत्सवात ‘शितू’ या फिल्मसाठी उत्कृष्ट संवादलेखनाचा पुरस्कार.
१९९८- कथा पुरस्कार (नवी दिल्ली).
२००३- ‘भुरगीं म्हगेली तीं’- जनगंगा पुरस्कार.
२००५- ‘आलिशा’ फिल्मसाठी बेस्ट स्क्रीन-प्ले पुरस्कार.
२००८- गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार.
२०११- ‘सुनामी सायमन’ या पुस्तकाला विश्‍व कोकणी केंद्राचा विमला व्ही. पै साहित्य पुरस्कार.
या पुरस्कार मिळालेल्या पुस्तकांबरोबरच आणखी काही प्रसिद्ध झालेली पुस्तके अशी-
१९७५- ‘सूड’
१९८१- ‘रुमडफूल’
२०१४- ‘सपनमोगी’
२०२०- ‘च्या मारू काय जींव दिंव’, ‘तिष्ठावणी’.
त्याशिवाय इतर भाषांतील अनेक पुस्तकांचा त्यांनी कोकणी अनुवाद केला आहे.