तत्त्व

0
12
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

शी श्रेष्ठ आणि दिव्य माणसे या भूमीवर कशी चालली याचा विचार करताना आपली मती गुंग होते. जीवनाचे तत्त्व एवढे शक्तिशाली असते की त्या तत्त्वाच्या प्रभावाने आणि प्रखरतेने व्यक्ती संपते, पण तत्त्व या भूमीवर अजरामर राहते.

माणसाला नाव जन्मानंतर इतर माणसे देतात. त्या नावाने हाक मारतात तेव्हा त्याला आपले नाव इतरांकडून समजते. समज आल्यावर व आकलन व्हायला लागल्यावर माणूस स्वतःविषयी विचार करू लागतो. आपल्यासंबंधी एक तत्त्व तो स्वीकारतो. आपण जसा वागतो ते कोणत्या तत्त्वाने ते सुरुवातीला त्याला कळत नाही. त्याच्यामधून त्याचे वर्तन आणि स्वभाव हे दोन घटक मूळ धरायला लागतात. त्यातूनच त्याच्या तत्त्वाचा जन्म होतो. त्याला शेवटपर्यंत आपले तत्त्व सांगता येत नाही. कारण तत्त्व हे अमूर्त असते. त्याला दृश्य स्वरूप नसते. ते त्याच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असते. माणूस चांगला की वाईट हे त्याच्या तत्त्वानुसार ठरत असते. खरे म्हणजे माणूस चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. चांगले किंवा वाईट त्याचे वर्तन असते. वर्तनाला तत्त्वाचे वेष्टन असते.

आजची माणसे चांगल्या तत्त्वाला स्पर्श करायला घाबरतात. कारण तत्त्व ही जळती आग असते. ज्याच्याकडे पावित्र्य आहे त्याला त्या आगीची भीती नसते. पण ज्याला मनातून माहीत आहे की आपण वाईट मार्गाने जात आहे, त्याला त्या आगीचे चटके बसायला लागतात. म्हणूनच अशा प्रवृत्तीची माणसे शुद्ध तत्त्वापासून चार हात दूर राहतात. तत्त्व आपल्याला परवडणारे नाही अशी सबब देऊन मोकळी होणारी माणसेही थोडी नाहीत.
नोकरी नाही, पैसा नाही म्हणून वैफल्यामुळे आपण दारूच्या व्यसनात सापडलो अशी कारणे सांगणारी माणसे सत्यापासून दूर असतात.

प्रत्येकाच्या जीवनात विविध संकटे येतात. त्या संकटांमुळे आपली प्रवृत्ती बदलता कामा नये. आलेल्या संकटांना धाडसाने तोंड देणारी माणसेच जीवनात यशस्वी होतात.

एकदा मी संकटात सापडलो. मीच गमावलेली नोकरी परत मागण्यासाठी मॅनेजमेंटमधील अधिकार्‍याला विनंती करताना मोठ्या तळमळीने म्हणालो, ‘‘मी माझ्या तत्त्वाचा माणूस आहे.’’ ते लगेच म्हणाले, ‘‘केवळ तत्त्वाने माणूस यशस्वी होऊ शकत नाही.’’ मी अतिशय नम्रतेने गप्प राहिलो. एक दार बंद झाले आणि देवाने दुसरे दार उघडले. माझ्या तत्त्वावर माझा संपूर्ण विश्‍वास होता. त्याच तत्त्वाने मी पुढील जीवनात यशस्वी झालो. धाडसाने व ईश्‍वरकृपेने मी त्या संकटातून सुटलो. दुसरी नोकरी सुखरूपपणे चालू झाली. पुढे ती अधिकारी व्यक्ती कित्येकदा मला भेटली; पण त्यांना त्यांचे शब्द आठवत असतील का ते देव जाणे!
कितीही भयानक संकटे आली तरी माणसाने आपल्या अंतर्मनातील तत्त्वापासून जरादेखील ढळता कामा नये. माणूस हा निश्‍चयाचा महामेरू असावा.

माझे वयोवृद्ध आजोबा (आईचे वडील) म्हणायचे, ‘‘कितीही संकटे आली; कितीही दुःखाच्या वेदना झाल्या तरी डोळ्यांतून अश्रू येता कामा नये. जो रडणारा आहे तो संपलाच म्हणायचा. न रडणारेच नेहमी धीराने पुढे-पुढे जातात.’’
आमच्या गरिबीला पाहून ते व्यथित व्हायचे व म्हणायचे, ‘‘धट्टीकट्टी गरिबी व लुळी-पांगळी श्रीमंती.’’ याचा अर्थ असा असायचा की पैशांच्या बाबतीत आम्ही निर्धन होतो, पण शारीरिक सुदृढपणा, बलोपासना, आरोग्य हे पैलू प्रथम श्रेणीचे होते. मनाची श्रीमंती उल्लेखनीय होती.

उलट अर्थी ज्यांच्याकडे पैसा भरपूर असतो, ती माणसे आरोग्याने अथवा शरीराने बलवान व सुखी नसायची. शारीरिक व्यंग्य सांभाळत आणि गोंजारत त्यांना आयुष्य काढावे लागायचे. अस्वस्थ शरीराबरोबर मनदेखील आजारीच राहायचे. आजदेखील तशी कित्येक उदाहरणे आपल्या परिचयाची असतीलच.
मनाचा संयम, दृढ निश्‍चय, दयाळूपणा, सहानुभूती व सामंजस्य तसेच मनाची प्रगल्भता यांना गरिबीच्या भोगलेल्या चटक्यांनीच बहर येत असतो.

थोरामोठ्यांच्या जीवनाचा आलेख तपासा. जे तत्त्व त्यांनी जीवनात स्वीकारले, ते अखेरपर्यंत समर्थपणे पेलले. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी लोकांनी दिली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि मी तो मिळविणारच,’ हे त्यांचे तत्त्व नेहमीच त्यांना तुुरुंगात डांबत राहिले. त्यांच्या उच्च शिक्षणामुळे ब्रिटिशांची सुखा-समाधानाची नोकरी त्यांना मिळाली असती; पण सगळ्या सुखांना ठोकरून कष्टांचे व यातनांचे जीवन त्यांनी स्वखुशीने स्वीकारले. ब्रिटिशांना मनातून भारतीय जनतेला स्वातंत्र्य द्यायचे नव्हते. स्वातंत्र्य मागणारा त्यांच्यासाठी महाशत्रू होता. ‘स्वराज्य’ हे टिळकांच्या शत्रुत्वाचे मूळ कारण होते. किती धीरोदात्तपणे अखेरपर्यंत ते आपल्या तत्त्वांसाठी परकीय महासत्तेशी झुंजत राहिले.

महात्मा गांधीजींच्या सत्यनिष्ठेच्या तत्त्वाचा विचार करा. सत्याचे प्रयोग अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी चालूच ठेवले. जग काहीही म्हणो, कोणत्याही मोहाला अथवा आमिषाला शेवटपर्यंत ते बळी पडले नाहीत.

विनोबा भावेंचे तत्त्व अतिशय श्रेष्ठ दर्जाचे होते. सगळे जीवन जनसेवेसाठी बहाल करणे हे दिसते तेवढे सोपे नाही. त्यांच्या जीवनाचा प्रवास जर तपासला तर सामान्य माणूस आश्‍चर्याने गांगरून जातो. भूदान यज्ञामध्ये केवढी महान झेप त्यांनी घेतली होती, तिचे कौतुकच करावे लागेल.

अशी श्रेष्ठ आणि दिव्य माणसे या भूमीवर कशी चालली याचा विचार करताना आपली मती गुंग होते. जीवनाचे तत्त्व एवढे शक्तिशाली असते की त्या तत्त्वाच्या प्रभावाने आणि प्रखरतेने व्यक्ती संपते, पण तत्त्व या भूमीवर अजरामर राहते.