वायव्य विभाग प्रमुख पदावरून डिच्चू
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातनजीक समुद्रात पाकिस्तानी जहाजावर स्फोट होऊन ते बुडाल्याच्या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक तथा वायव्य विभाग प्रमुख बी. के. लोशाली यांना या विभाग प्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. तसेच त्यांना गुजरातमधील गांधीनगर येथे चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.केंद्रीय संरक्षण खात्याने सदर पाकिस्तानी जहाजावर स्फोटके असल्याचा तसेच अतिरेकी असल्याचा दावा केला होता. तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी त्या जहाजाचा पाठलाग केल्यानंतर त्या जहाजावरील लोकांनीच ते जहाज स्फोट घडवून उडवून लावले व त्यावरील चौघेजण बुडून मरण पावले, असे निवेदनही खात्याने केले होते.
तथापि या खात्याला अडचणीत टाकणारे वक्तव्य लोशाली यांनी केल्याचा दावा करणारे वृत्त एका राष्ट्रीय खपाच्या इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. तसेच एका वृत्त वाहिनीवर लोशाली सदर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाची चित्रफितही दाखविण्यात आली होती. त्यात ते म्हणतात, तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेलच. आम्ही ती पाकिस्तानी बोट उडवून लावली. आम्हाला त्यांना बिर्याणी खाऊ खालायची नव्हती. यामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर अडचणीत आले होते. परिणामी त्यांना पत्रकार परिषदेत त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले होते. तसेच त्यांना सरकार आपल्या पूर्वीच्या निवेदनावर ठाम असल्याचे निवेदन करणे भाग पडले होते. त्यात बदल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच लोशाली यांच्या वक्तव्याची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्यास कारवाई करणार असे सांगितले. तर लोशाली यांनी प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा नंतर केला होता. तसेच संरक्षण खात्याला स्पष्टीकरणही दिले होते. मात्र खात्याचे त्यामुळे समाधान झाले नव्हते.

