ढवळीकरांची मगोत एकाधिकारशाही

0
127

>> लवू मामलेदार ः केंद्रीय समितीला विश्‍वासात न घेता निर्णय

मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची एकाधिकारशाही चालू असून ते केंद्रीय समितीला विश्‍वासात न घेता आपणाला हवे ते निर्णय घेत असतात. गेल्या वर्षी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यापूर्वीही त्यांनी पक्षाला विश्‍वासात घेतले नव्हते, असा आरोप मगोचे सरचिटणीस व माजी आमदार लवू मामलेदार यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

केंद्रीय समितीला विश्‍वासात न घेता दीपक ढवळीकर यांनी आतापर्यंत ३६ निर्णय घेतल्याचाही आरोप यावेळी मामलेदार यांनी केला. गेल्या वर्षी मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी मगोच्या पाठिंब्याचे पत्र देण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय समितीला विश्‍वासात घ्यायला हवे होते. मात्र, तसे न करता त्यांनी परस्पर पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिल्याचे मामलेदार यांनी यावेळी सांगितले. असे अन्य कितीतरी निर्णय त्यांनी केंद्रीय समितीला विश्‍वासात न घेताच घेतल्याचे सांगून अशा निर्णयांची संख्या सुमारे ३६ एवढी असल्याचे मामलेदार यांनी यावेळी नमूद केले. पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घेताना पक्षाच्या हिताचा विचार करायचा असतो. मात्र, दीपक ढवळीकर हे कोणताही निर्णय घेताना पक्षाच्या हिताचा विचार करीत नसल्याचे मामलेदार यांनी सांगितले.

मगो भाजपात विलीन
करण्याचाही झाला प्रयत्न
गेल्यावर्षी पक्षाला विश्‍वासात न घेताच मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा त्यांनी पाठिंबा दिला होता तेव्हाच खरे म्हणजे आपण त्याबाबत आवाज उठवणार होतो. मात्र, पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आपण गप्प राहिल्याचे ते म्हणाले. मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रयत्नही एकदा झाला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

अन्य पक्षांनी हकालपट्टी
केलेल्यांना मगोत प्रवेश
आता दीपक ढवळीकर यांनी अन्य पक्षांनी हकालपट्टी केलेल्यांना मगो पक्षात घेण्याचे सत्र सुरू केले असल्याचे सांगून यातून पक्षाचे काहीही भले होणार नसून उलट पक्षाचे नुकसान होणार असल्याचे मामलेदार म्हणाले. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या कित्येक नेत्यांना दोन दिवसांपूर्वी मगो पक्षात प्रवेश देण्याचा ढवळीकर यांच्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली. भारतीय सुरक्षा मंचातून आलेले केतन भाटीकर, शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या शिवसैनिकांना मगोत घेऊन ढवळीकर यांनी काय साधले, असा सवालही मामलेदार यांनी यावेळी केला.