Home बातम्या डॉ. विकास आमटेंचे पणजीत व्याख्यान

डॉ. विकास आमटेंचे पणजीत व्याख्यान

0

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाने येत्या २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ‘सृष्टी आणि दृष्टी’ या विषयावर डॉ. विकास आमटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

हे व्याख्यान कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात येणार आहे. ‘कुष्ठरोग’ या विषयाचा अभ्यास केलेले तज्ज्ञ तसेच महाराष्ट्रातल्या वडोरा येथील ‘महारोगी सेवा समितीचे’ प्रमुख कार्याधिकारी व समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचे अनमोल असे मार्गदर्शन या व्याख्याना दरम्यान उपस्थितांना लाभणार आहे.

डॉ. विकास आमटे यांचा जन्म ऑक्टोबर १९४७ साली झाला. वडोरा, महाराष्ट्र येथील ते एक तज्ज्ञ डॉक्टर असून समाज कार्यकर्ते म्हणून हे कार्य करत आहेत. तसेच ते आनंदवन या त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या संस्थेचे कार्याधिकारी म्हणून काम पहात आहेत. नामांकित समाज कार्यकर्ते तसेच ‘मॅगसेसे’ या पुरस्काराचे मानकरी ‘स्व. बाबा आमटे’ यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. भारती आमटे याही या व्याख्यानात सहभागी होणार आहेत.

पुरातन कालापासून ते आतापर्यंत मानवाच्या जीवनात झालेल्या अनेक घडामोडींमुळे निसर्गाकडे पाहण्याची आजच्या पिढीतल्या माणसाची नजर ही कालानुरूप बदलत गेली आहे. तेव्हा खर्‍या अर्थाने ‘सृष्टीला पाहाण्याची दृष्टी’ ही कशी असावी या विषयावर डॉक्टर यावेळी मार्गदर्शन करतील.

गोव्याच्या कानाकोपर्‍यात रहाणार्‍या लोकांसाठी वेगळ्या अशा प्रकारचे हे व्याख्यान कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात आले असून गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जाणकार यांनीही या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे.