डॉ. रघुनाथ माशेलकरांना ‘गोमंत गौरव’ सन्मान

0
8

कला अकादमीत 16 एप्रिल रोजी सोहळ्याचे आयोजन

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 16 एप्रिल रोजी कला अकादमीच्या आवारात प्रख्यात शास्त्रज्ञ व गोमंतकीय सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘गोमंत गौरव’ सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. ही माहिती गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सन्मान सोहळ्यानिमित्त ‘गोवा 2037 : ज्ञान, उद्योग आणि शाश्वतता’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे. हा पुरस्कार डॉ. माशेलकर यांच्या आयुष्यभरातील उत्कृष्ट कार्य आणि समाजासाठीच्या योगदानाचा गौरव करणारा आहे. त्यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासातून गोव्यातील जनतेला प्रेरणा मिळते. आगामी पिढ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिमा धोंड यांनी नमूद केले.

‘गोवा 2037′ परिषद ही राज्याला एकात्मिक आणि भविष्याभिमुख दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेमध्ये विचारवंत आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार अशा राज्याची सामायिक दृष्टी मांडणार आहेत.
या परिषदेत दोन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय आमोणकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. विजयन करिपल, शशांक जोशी, अंबिका धाकणकर आदी उपस्थित होते.