आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गेल्या 31 जुलै 2026 रोजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्याकडे आरोग्य संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सुपूर्द करण्याचा आदेश जारी केला होता. आरोग्य खात्यातील ज्येष्ठ अधिकारी डॉ. सलिना नाईक यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. आरोग्य सेवा संचालकपदासाठी असलेल्या सेवा नियमांतर्गत हा पदभार उपसंचालक किंवा वैद्यकीय अधीक्षक, सह उपसंचालक या विशिष्ट प्रवर्गातून भरणे बंधनकारक आहे. मात्र, डॉ. साळकर मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर आहेत. त्या विहित प्रवर्गात येत नाही.
राज्य सरकारने 18 मे 2026 रोजी प्रकाशित केलेली ज्येष्ठता यादी नजरेआड करून हा निर्णय घेतला आहे, असा दावा याचिकेत केला आहे. आपण सर्वांत ज्येष्ठ आणि पात्र अधिकारी असल्याचा दावा करत, त्यांनी ही नियुक्ती रद्द करण्याची, त्या पदावर आपली नियुक्ती करण्याचे निर्देश देण्याची आणि प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत डॉ. साळकर यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली आहे.

