27 C
Panjim
Saturday, September 19, 2020

डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ

मराठी साहित्यविश्वात आनंदाची लाट
देशीवादाचे खंदे समर्थक, ‘कोसला’ पासून ‘हिंदू’ पर्यंतच्या मराठीतील गाजलेल्या साहित्यकृतींचे निर्माते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार काल जाहीर झाला. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांच्यानंतर नेमाडे हे मराठीतील हा पुरस्कार प्राप्त करणारे चौथे साहित्यिक ठरले आहेत. नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्याच्या वार्तेने मराठी साहित्यविश्वामध्ये आनंदाची लाट उसळली असून डॉ. नेमाडे हे पूर्वी गोवा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख होते व येथील कोकणी – मराठी साहित्यिकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते, त्यामुळे गोव्यातील साहित्यविश्वातही अतिशय आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यंदाचा ज्ञानपीठ हा पन्नासावा पुरस्कार असल्याने हा दुग्धशर्करायोग मानला जात आहे.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नामवर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मानाने गौरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नेमाडे यांची ‘कोसला’ ही पहिलीच कादंबरी प्रचंड गाजली. मराठी साहित्यविश्वामध्ये तिने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. अलीकडेच तिची सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. मराठी साहित्यातील ती एक मापदंड मानली जाते. त्यानंतर बिढार, जरीला, झूल अशा कादंबर्‍या नेमाडे यांनी लिहिल्या, त्यांचेही चांगले स्वागत झाले. अलीकडेच ‘हिंदू ः जगण्याची समृद्ध अडगळ’ ही महाकादंबरी नेमाडे यांनी लिहिली, तिच्यावरून साहित्यविश्वामध्ये वाद प्रतिवाद झडले.
समीक्षेच्या प्रांतातही नेमाडे यांची भूमिका गांभीर्याने घेतली जात असून देशीवादाचे ते करीत असलेले खंदे समर्थन आणि विविध व्यासपीठांवरून मराठी साहित्यव्यवहारासंदर्भात त्यांनी व्यक्त केलेली अत्यंत परखड मते यांचा पुरस्कार करणारा साहित्यप्रेमींचा मोठा वर्ग गेल्या पन्नास वर्षांत निर्माण झाला आहे.
‘‘विंदांच्या परंपरेचा पाईक’’
‘‘ज्ञानपीठ मिळाल्याचा मला आनंद आहे. मराठी माणसाच्या अभिरूचीचा मला अभिमान वाटतो, कारण त्यांनी माझे लेखन आजवर सहन केले. मला तुरुंगात जावे लागले नाही वा कोणी माझ्याविरोधात आंदोलनही केले नाही,’’ अशी मिश्कील प्रतिक्रिया डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘ज्ञानपीठ’ मिळाल्यानंतर व्यक्त केली. आपण विंदा करंदीकरांच्या आधुनिक परंपरेचे पाईक असून आजच्या साहित्यिकांनी ही परंपरा पुढे न्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अल्पपरिचय
भालचंद्र वनाजी नेमाडे
जन्म  :२७ मे १९३८, सांगवी, जि. जळगाव
शिक्षण : पुणे विद्यापीठातून बी. ए. (भाषाशास्त्र) (१९६१), मुंबई विद्यापीठातून एम. ए. (इंग्रजी साहित्य) (१९६४),
पेशा : इंग्रजीचे प्राध्यापक. १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचे अध्यापन. गोवा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख. तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त.
कादंबर्‍या : ‘कोसला’ (१९६३), ‘बिढार’ (१९५७), ‘जरिला’ (१९७७), ‘झूल’ (१९७९), ‘हूल’, ‘हिंदू’ (२०१०)
कवितासंग्रह : ‘मेलडी’ (१९७०) आणि ‘देखणी’
समीक्षा :‘टीकास्वयंवर’, ‘साहित्याची भाषा’, ‘तुकाराम’ ‘द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी’
पुरस्कार : ‘टीकास्वयंवर’ ला साहित्य अकादमी पुरस्कार, ‘ज्ञानपीठ’.
मातृभाषेतील शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते
– विष्णू सूर्या वाघ (साहित्यिक, आमदार)
साठोत्तरी मराठी साहित्यात सृजनशीलतेचे नवे मानदंड प्रस्थापित करणारे ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या पुरस्काराचा आनंद तमाम मराठी वाचकांसाठी वेगळ्या प्रकारचा आहे. लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या व त्यातील गूढांच्या आकलनाचे प्रवेशद्वार आहे असे मत नेमाडेंनी जीवनभर ठामपणे मांडले. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचे अखंडपणे समर्थन करणार्‍या साहित्यिकाचा हा सन्मान नव्या लेखकांना प्रेरणादायी ठरेल.
नेमाडे यांना मिळालेला ‘ज्ञानपीठ’ हा केवळ मराठीचा सन्मान नाही, तर अक्षरविश्वात अभावानेच मांडण्यात येणार्‍या नैतिकतेच्या आग्रहाचा तो यथोचित गौरव आहे. मराठी साहित्यातील प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचे काम नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’ या कादंबरीद्वारे केले. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी साहित्यप्रवाहाच्या बाहेरील उत्कृष्ट कादंबरी मानली जाते. पांडुरंग सांगवीकर व चांगदेव पाटील या त्यांच्या साहित्यातील नायकांनी स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले व टिकवून ठेवले. ‘देखणी’ व ‘मेलडी’ हे त्यांचे आशयगर्भ काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेची उंची अधोरेखित करतात. ‘तुकाराम’ हा नेमाडे सरांच्या जिव्हाळ्याचा विषय. ‘टीकास्वयंवर’ ग्रंथातील त्यांच्या समीक्षालेखनाने देशीवादाचा नवा आयाम मराठी साहित्यात आणला. ‘हिंदू ः जगण्याची समृद्ध अडगळ’या त्यांच्या कादंबरीने धर्म आणि जीवन यासंबंधातील त्यांचे सूक्ष्म निरीक्षण साहित्याच्या पटलावर आणले.
नेमाडे नावाचा ‘राजा माणूस!’
– विश्राम गुप्ते (ज्येष्ठ साहित्यिक)
डॉ. भालचंद्र नेमाडेंना मिळालेले ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतील आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे असे मला वाटते. यापूर्वी ज्या मराठी साहित्यिकांना हा सन्मान लाभला, त्यापैकी वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज हे ‘क्लासिकल’ मानले गेलेले परंपरावादी लेखक होते. त्यानंतर विंदा करंदीकर यांच्यासारख्या आधुनिकतावादी साहित्यिकाला ‘ज्ञानपीठ’ सन्मान लाभला. आता नेमाडेंनाही ‘ज्ञानपीठ’ सन्मान घोषित होणे हा त्या आधुनिकतावादाचा गौरव आहे. ‘कोसला’ सारख्या कादंबरीत व्यक्त झालेल्या आधुनिक संवेदनशीलतेचा हा सन्मान आहे.
नेमाडे यांची मराठी भाषेबद्दलची आस्था सर्वविदित आहे. त्यामुळे खरे तर हा मराठी भाषेचा विजयोत्सव आहे. देशीवाद, सहिष्णुता यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. गेली पन्नास – साठ वर्षे ते लिहित आले आहेत. गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख असताना त्यांचा येथील कोकणीप्रेमींशीही संबंध आला. ते कोकणी माणसाशीही नेहमी प्रेमाने वागायचे. त्यांना कोकणी आवडायचे. तेवढा उमदेपणा त्यांच्यापाशी आहे. अशा उमद्या माणसाचा हा सन्मान आहे. साहित्य संमेलनांसंबंधी त्यांनी जी भूमिका मांडली, ती खरीच आहे. साहित्य संमेलनांतून साहित्य घडत नसते. तेथील मानपान, वादविवाद याचा साहित्याला काही फायदा होत नसतो हे त्यांचे मत योग्यच आहे. लेखकाची भूमिका महत्त्वाची असते. तो जीवनजाणिवांचा उद्गार असतो. आपण मात्र साहित्य संमेलनांची हौस करून टाकतो.
नेमाडे गोव्यात माझ्याकडे अनेकदा राहिलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत. वैयक्तिक आठवणी अनेक आहेत. ते गोव्यात असताना मी त्यांच्यासमवेत जायचो. आम्ही बराच गोवा त्या काळात फिरलो आहोत. तेरेखोलच्या किल्ल्यावर, बोंडला अभयारण्यात, तांबडी सुर्लाला तेव्हा आम्ही गेलो होतो असे आठवते. मी, ते आणि त्यांचा मुलगा मिळून बोंडलाला गेलो होतो. तेथील जंगलात झाडावरून त्यांच्या मुलाच्या अंगावर हिरवा साप पडला. नंतर एक वडाचे झाड होते, त्याच्या पारंब्यांना मी लटकलो असता खाली पडलो. त्या दोन्ही प्रसंगी त्यांना फार काळजी वाटली होती. ते मुळात एक चांगले माणूस आहेत. एक लोभस असे ते व्यक्तिमत्त्व आहे. अनेकदा ते लेखकांच्या छान नकला वगैरे करतात. गाडगिळांच्या नवकथा या नकली कथा आहेत वगैरे स्पष्ट मते ते मांडतात.
‘कोसला’ ते ‘हिंदू’ या त्यांच्या लेखन प्रवासात काळ बदलला आहे. पन्नास वर्षांपूर्वीचा पांडुरंग सांगवीकर आजच्या काळात कसा राहील? आज ज्याला त्याला पैसा कमवायचा आहे. त्यासाठी भटकणे भाग आहे. सारी व्यवस्थाच आज बदलून गेलेली आहे. त्यामुळे कुटुंबापासून वेगळे झालो तर यशस्वी होऊ ही आजची मानसिकता बनलेली आहे.
त्यांच्या ‘हिंदू’ वर मी प्रदीर्घ टीका लेख लिहिला होता. ते आता तो त्यांच्या पुस्तकात घेणार आहेत. परंपरानिष्ठांचा दृष्टिकोन त्यांनी ‘हिंदू’ मध्ये मांडला आहे असा आक्षेप मी त्या लेखात घेतला होता. काही असो, त्या कादंबरीची जी प्रचंड जाहिरातबाजी झाली, ती मराठीत अभूतपूर्व होती. मी त्यांनी त्या कादंबरीत मांडलेल्या भूमिकेला पूर्ण विरोध करतो, पण तरीही तो लेख त्यांनी आपल्या पुस्तकात समाविष्ट करायला घेतला आहे. परंपरावाद आज महत्त्वाचा नाही.
साहित्य समीक्षेला मोठे योगदान
– दामोदर मावजो (कोकणी साहित्यिक)
‘कोसला’ कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भारतीय साहित्य समीक्षेला फार मोठे योगदान दिले आहे. हे महत्त्वाचे काम करीत असतानाच त्यांनी कादंबरी लेखनाचे आव्हान यशस्वीपणे पेलले. खरे म्हणजे त्यांना यापूर्वीच ‘ज्ञानपीठ’ मिळायला हवे होते. गोव्यात असताना त्यांना डॉ. मनोहरराय सरदेसाई, पांडुरंग भांगी व र. वि. पंडित यांचे सान्निध्य लाभले. त्यामुळे भारतीय साहित्याला कोकणीने दिलेल्या योगदानाची त्यांना जाणीव झाली. गोव्यातून गेल्यावरही त्यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध अजूनही आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा अतीव आनंद मलाही होत आहे.

 

 

 

 

 

STAY CONNECTED

846FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

ALSO IN THIS SECTION

खासगी इस्पितळांच्या कोरोना शुल्काचा फेरआढावा घेणार

>> मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती राज्यातील खासगी इस्पितळांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या शुल्काचा फेरआढावा घेतला जाणार आहे,...

पुढील चार दिवस पावसाची शक्यता

पश्‍चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील काही भागात आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा काल हवामान खात्याने दिला आहे.

पुन्हा ८ जणांचा मृत्यू, ५९६ बाधित

>> मृतांमध्ये दोन युवक, एक युवती राज्यात गेल्या चोवीस कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ५९६...

‘आप’चे एल्विस गोम्स यांनी दिला राजीनामा

आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घटना ताजी असतानाच आता पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनीही शुक्रवारी आपल्या...

कृषी विधेयकावरून विरोधकांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल ः पंतप्रधान

कृषी विधेयकावर बोलताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना आपली दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी या विधेयकावरून विरोधक...