26.3 C
Panjim
Thursday, September 24, 2020

डू बेटर विथ लेस

फ्रुगल इनोव्हेशनची आगळी संकल्पना

एडिटर्स चॉइस
परेश प्रभू

काही पुस्तकांचा विषय कितीही जटिल का असेना, परंतु लेखकापाशी अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असेल आणि जर त्याच्यापाशी काही वेगळे आणि मूलभूत सांगण्यासारखे असेल, तर अशी पुस्तके तुमच्या मनावर नक्कीच गारूड करून जातात.
आज कॉर्पोरेट संस्कृतीला अनुसरून अगणित नवनव्या संकल्पना मांडणारी पुस्तके सातत्याने प्रकाशित होत असतात, कॉर्पोरेट संस्कृतीमधील नवनव्या कार्यसंस्कृतीच्या कल्पना मांडणारी, व्यवस्थापनाचे नवनवे गुरूमंत्र देणारी, नेतृत्वगुण व इतर मानवी कौशल्यांना – अगदी देहबोलीचा देखील अन्वयार्थ लावणारी अशी असंख्य पुस्तके अलीकडच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये आणि भारतीय भाषांमध्येही भाराभर प्रकाशित होत असतात, परंतु नेहमीचे ठोकताळे वापरून चटपटीत भाषेत लिहिलेल्या तशा सेल्फ हेल्प पुस्तकांपेक्षा वेगळे असे एखादे पुस्तक जेव्हा आपल्यासमोर येते, तेव्हा त्यात स्पष्ट केलेली अनोखी संकल्पना नीट समजून घेतल्याखेरीज आपल्याला ते खाली ठेववत नाही.
‘डू बेटर विथ लेस’ हे असेच एक पेंग्वीनच्या पोर्टफोलिओ मालिकेतले ताजे टवटवीत पुस्तक. पुस्तक कसले, ४०३ पानांचा हार्डबाऊंड ग्रंथच म्हणायचा तो. हे पुस्तक आहे फ्रुगल इनोव्हेशन ही कॉर्पोरेट विश्‍वासाठी नव्या युगाची नवी संकल्पना मांडणारे. फ्रुगल म्हणजे काटकसर. काटकसरीने आपले उत्पादन कसे वाढवायचे, गुणवत्ता कशी वाढवायची याचा गुरूमंत्र देणारे हे पुस्तक लिहिले आहे, काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि जगभरात धमाल माजवलेल्या ‘जुगाड इनोव्हेशन’च्या कर्त्यांनी. नॅव्ही रॅडजोऊ आणि जयदीप प्रभू यांनी.
वाढते उत्पादन खर्च, अटीतटीची स्पर्धा, गुणवत्तावाढीचा ग्राहकांचा आग्रह या दुष्टचक्रामध्ये अडकलेल्या उद्योग आणि सेवा क्षेत्राला काही सोप्या गुरुमंत्रांचा वापर करून – म्हणजेच फ्रुगल इनोव्हेशनचा वापर करून – मर्यादित संसाधनांमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादने अगर सेवा कशा देता येतील त्यासंबंधीचे वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करणारे हे लक्षवेधी पुस्तक आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित संसाधने यांच्या विळख्यात सापडलेल्या भारतासारख्या देशाला या संकल्पनेद्वारे कसा प्रचंड लाभ मिळवता येऊ शकतो, त्याचाही विचार यात केला गेला आहे. विशेष म्हणजे ही सारी केवळ तात्त्विक चर्चा नाही. प्रत्यक्षात कोणकोणत्या उद्योगांनी कशा प्रकारे काटकसरीच्या मार्गांचा अवलंब करून यश प्राप्त केले, त्याच्या यशोगाथांचा विस्तृत परिचय करून देत रंजकपणे फ्रुगल इनोव्हेशन या संकल्पनेच्या सर्व मितींचा परिचय लेखकद्वयाने या पुस्तकात करून दिलेला आहे.
एकीकडे जगामध्ये तीव्र स्पर्धेमुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी वाढतच जाणार आहे आणि दुसरीकडे संसाधनांच्या मर्यादाही भेडसावत राहणार आहेत. आजच्या काळातले हे सर्वांत मोठे व्यावसायिक आव्हान ठरले आहे. या परिस्थितीत काटकसरीच्या मार्गांचा अवलंब करूनही यश प्राप्त कसे करता येऊ शकते यावर या सार्‍या लेखनप्रपंचाचा भर आहे. काटकसरी, मितव्ययी नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून यश प्राप्त केलेल्या उद्योगांच्या केस स्टडीजची संबंधितांच्या मुलाखतींच्या माध्यमातून या संकल्पनेच्या प्रत्येक तत्त्वाला जोड दिलेली असल्यामुळे ही केवळ तात्त्विक चर्चा उरत नाही. तिला वास्तविकतेची जोड मिळते आणि कोणतेही क्षेत्र का असेना, त्यामध्ये या तत्वांचा अवलंब करणे कसे शक्य आहे याविषयीचे उद्बोेधनही होऊन जाते. या काटकसरीच्या मार्गाचा अवलंब केल्याने संसाधनांच्या मर्यादांवर मात तर करता येईलच, परंतु त्याच बरोबर हवामान बदलांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करताना कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासही मदत मिळेल असे लेखकांचे प्रतिपादन आहे. ऊर्जा, भांडवल आणि वेळेची बचत आजच्या ‘एज ऑफ स्कॅर्सिटी’मध्ये – म्हणजे तुटवड्याच्या युगामध्ये – करणे किती आवश्यक आहे ते सांगताना फ्रुगल इनोव्हेशनचे महत्त्व लेखकांनी वाचकांच्या मनावर बिंबवले आहे.
विशेष म्हणजे उत्पादन असो, किरकोळ विक्री असो, वित्त असो, आरोग्य असो, शिक्षण असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये या संकल्पनेच्या तत्त्वांचा अवलंब करता येऊ शकेल हेही लेखकांनी दाखवून दिले आहे. आपल्या या संकल्पनेची सहा मूलभूत तत्त्वे लेखकद्वयींनी सांगितली आहेत, त्यातले पहिले आहे ‘गुंतवणे व वारंवार सांगणे’. कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादी क्रांतिकारी नवसंकल्पना वरपासून खालपर्यंत सर्वांच्या गळी उतरवणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. क्षेत्र कोणतेही असो, पारंपरिक पद्धतींवरच भर असलेल्या आणि सुस्तावलेल्या मंडळींचा नवीन काही करून पाहायला पराकोटीचा विरोध असतोच असतो. त्यामुळे अशा मानसिकतेमध्ये बदल घडवणे व नव्याचा स्वीकार करायला लावणे हे पहिले आव्हान असल्याचे लेखक म्हणतात. उदाहरणार्थ – संशोधन आणि विकासावर प्रचंड खर्च करण्यापेक्षा आपल्या ग्राहकांची मते जाणून घेतल्यानेही आपल्याला हवी ती माहिती मिळू शकेल असे लेखक सुचवतात.
त्यानंतरचे दुसरे तत्त्व म्हणजे ‘फ्लेक्स युअर ऍसेट्स.’ म्हणजे तुमच्याजवळची जी उपलब्ध साधनसामुग्री आहे, ती नव्या रीतीने काम करण्यासाठी तिची नवी संरचना करणे हा झाला दुसरा टप्पा. एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे तर उत्पादन, वाहतूक, सेवा या सार्‍यांच्या पारंपरिक कार्यपद्धतींमध्ये बदल घडवून वेळ, पैसा, ऊर्जा यांची कशी बचत करता येऊ शकते ते हे प्रकरण सांगते. आपल्या संस्थेच्या संरचनेमध्ये देखील सोपेपणा आणून सारी कामाची प्रक्रिया सुलभ करता येऊ शकेल असे लेखक म्हणतात.
तिसरे तत्त्व आहे ते म्हणजे ‘कायम टिकतील अशा प्रकारच्या उपाययोजना शोधून काढा’. त्यासाठी पुनर्वापर असेल, सहनिर्मिती असेल, अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. लेखकांनी सांगितलेले चौथे तत्त्व म्हणजे ‘शेप कस्टमर्स बिहेव्हियर’. म्हणजे आपल्या ग्राहकांच्या सवयींना आकार देण्याचा प्रयत्न करा. ग्राहकांच्या तालावर आपण नाचत राहण्याऐवजी आपण आपल्या ग्राहकांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न आपल्या अनुरूप केला पाहिजे असे हे तत्त्व. पाचवे तत्त्व आहे सहनिर्मिती. कोणतेही उत्पादन सहनिर्मितीच्या तत्त्वाद्वारे वेळ, पैसा, ऊर्जेची बचत करून कसे निर्मिती येऊ शकते त्यावर यात भर दिला आहे. आणि शेवटचे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘मेक इनोव्हेटिव्ह फ्रेंडस्’. म्हणजे नावीन्यपूर्ण कल्पना मांडणार्‍यांशी मैत्र जोडा आणि त्याचा आपल्या व्यवसायामध्ये उपयोग करून घ्या. तरुणांचे स्टार्ट अप्स असतील, विद्यापीठे असतील, व्हेंचर कॅपिटल फंड्स असतील, त्यांची मदत घेऊन आपल्या व्यवसायाला त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळवून देणे असे हे तत्त्व. त्यातूनही फ्रुगल इनोव्हेशनचे आपले अंतिम उद्दिष्ट गाठण्यास मदतच मिळेल. लिनियर इकॉनॉमीकडून सर्क्युलर इकॉनॉमीकडे वळा असे लेखकाचे सांगणे आहे. याचाच अर्थ आपल्या उत्पादनांवरील पुनर्प्रक्रियेचा अवलंब करा असा त्यांचा गुरूमंत्र आहे.
अर्थात हे सारे फारच मोघमरीत्या मी येथे सांगितले, परंतु ही सारी तत्त्वे अवलंबिण्याची अनेक सोपी, परंतु उपयुक्त सूत्रे या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतील. आपला एखादा छोटा व्यवसाय असला तरी देखील त्यामध्ये या तत्त्वांचा अवलंब करून आपण मर्यादित संसाधनांमध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकतो हा विश्वास देणारे हे पुस्तक आहे. ही काही केवळ सैद्धान्तिक संकल्पना नाही. जगभरातील बड्या-बड्या कंपन्या आणि उद्योगसमूह या फ्रुगल इनोव्हेशनकडे कसे वळत आहेत याचे दाखले देताना वाहन उद्योगातील रेनॉं-निस्सान, उत्पादन क्षेत्रातील जीई, सीमेन्स, ग्राहकोपयोगी उत्पादने बनवणारी युनिलीव्हर किंवा शीतपेयनिर्मिती करणारी पेप्सीको, वस्त्रोद्योगातील मार्क अँड स्पेन्सर, शिक्षणक्षेत्रातील पियरसन, वित्त क्षेत्रातील अमेरिकन एक्स्प्रेस अशा बड्याबड्या उद्योगांनी या तत्त्वांचा अवलंब कसा केला आणि त्यामध्ये कसे यश मिळवले त्याच्या यशोगाथा या पुस्तकात दिलेल्या आहेत. भारतातील टाटांसारखा उद्योगसमूह या वाटेने कसा चालला आहे त्याकडेही लेखक अंगुलीनिर्देश करतात.
शेवटी लेखक म्हणतात त्याप्रमाणे हा काही जादुई फॉर्म्युला नाही, पण गुणवत्तेवर परिणाम होऊ न देता आपले काटकसरीचे हे ध्येय गाठण्यासाठीची साधने आणि तंत्र यांसंबंधी मार्गदर्शन यामध्ये मिळेल. त्यांच्या आधारे आपली उद्दिष्टे आणि प्राधान्ये ठरवता आली की पुढचे ध्येय गाठणे असंभव म्हणता येत नाही.
————

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

उपेक्षित‘मत्स्यगंधा’

गोमंतकाच्या ‘मत्स्यगंधे’चा कोरोनाने घास घेतला. आशालताबाई गेल्या. सहा दशके रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोट्या पडद्याला व्यापून राहिलेल्या या गुणी अभिनेत्रीचे हे अशा...

खासगी इस्पितळांच्या कोरोना शुल्कात कपात

राज्य सरकारने खासगी इस्पितळांना कोविड उपचारांसाठी निश्‍चित केलेल्या शुल्कात दुरुस्ती करण्यात आली असून उपचार शुल्कात किरकोळ प्रमाणात कपात करण्यात आली आहे. राज्य...

५९० बाधितांसह राज्यात ८ मृत्यू

>> चोवीस तासांत ७३६ कोरोनामुक्त राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवे ५९० रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा...

आशालता वाबगावकर यांचे कोरोनाने निधन

मूळ गोव्यातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (७९) यांचे काल सातारा येथील एका इस्पितळात कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या आई माझी...

पावसाचा दहा वर्षांतील उच्चांक

>> यंदा आतापर्यंत १५९ इंच, ३९ टक्के जास्त पाऊस राज्यात मोसमी पाऊस आत्तापर्यंत १५८.७१ इंच एवढा नोंद झाला असून...

ALSO IN THIS SECTION

खासगी इस्पितळांच्या कोरोना शुल्कात कपात

राज्य सरकारने खासगी इस्पितळांना कोविड उपचारांसाठी निश्‍चित केलेल्या शुल्कात दुरुस्ती करण्यात आली असून उपचार शुल्कात किरकोळ प्रमाणात कपात करण्यात आली आहे. राज्य...

५९० बाधितांसह राज्यात ८ मृत्यू

>> चोवीस तासांत ७३६ कोरोनामुक्त राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवे ५९० रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा...

आशालता वाबगावकर यांचे कोरोनाने निधन

मूळ गोव्यातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (७९) यांचे काल सातारा येथील एका इस्पितळात कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या आई माझी...

पावसाचा दहा वर्षांतील उच्चांक

>> यंदा आतापर्यंत १५९ इंच, ३९ टक्के जास्त पाऊस राज्यात मोसमी पाऊस आत्तापर्यंत १५८.७१ इंच एवढा नोंद झाला असून...

संजीवनी कारखाना बंद करणार नाही ः मुख्यमंत्री

संजीवनी सहकारी साखर कारखाना कायमचा बंद केल जाणार नसल्याचा पुनरुच्चार काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. काल ऊस उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांची भेट...