देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे काल कोल्हापूरमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी या उपाधीने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठे साम्राज्य उभारले होते. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते.
कोरोना काळानंतर कोल्हापुरातील निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील हे वास्तव्यास होते. मागच्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. मात्र त्यातून ते सावरत होते. सोमवारी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

