डिझेल, पाणी दरवाढ, मद्यावर शुल्कप्रकरणी सरकारवर हल्लाबोल

0
207

 

कोविडच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात सापडलेली असून या आर्थिक संकटावर तोडग्याच्या प्रतीक्षेत असताना गोवा सरकारकडून नागरिकांना इंधन, वीज, पाणी बिल दरवाढीची बक्षिशी देण्यात आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई तसेच मगो नेते सुदिन ढवळीकर यांनीही या विषयावर सरकारवर हल्लाबोल केला.

लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने इंधन, वीज, पाणी बिलात वाढ करून जनतेला जोरदार झटका दिला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय, उद्योग बंद करण्यात आल्याने नागरिकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. राज्य सरकारकडून आर्थिक समस्येबाबत तोडगा काढण्याची मागणी केली जात असताना सरकारने दरवाढ जाहीर करून जनतेला झटका दिला आहे, अशी टीका कामत यांनी केली.

सरकारने राज्यात पेट्रोल, डिझेल, वीज, अबकारी शुल्क वाढीबरोबरच पाणी बिलाच्या दरात ५० टक्के वाढ करून गोमंतकीय जनतेला जोरदार झटका दिला आहे, अशी टीका मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

गोवा फॉरवर्ड पार्टीने डिझेल दरवाढ, पाणी बिल दरवाढ, मद्यावरील अबकारी शुल्क वाढीचा निषेध केला आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भरडल्या गेलेल्या सामान्य माणसाच्या तसेच अडचणीत आलेल्या व्यावसायिकांच्या जखमेवर सरकारने आणखी मीठ चोळले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी काल केली.