डिचोली भागात तीन दिवस तीव्र पाणीटंचाई

0
1

दोन वेळा दुरुस्त केलेली जलवाहिनी पुन्हा फुटली

डिचोली भागात नाईकनगर येथे मोठ्या जलवाहिनीचे काम सुरू असताना तीनवेळा जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या तीन दिवसांपासून डिचोलीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे डिचोलीवासीयांची मोठी गैरसोय झाली आहे.
लोकांना पाण्यासाठी विहिरी तसेच टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक आस्थापनांमध्ये चार पाच मजले इमारती असल्याने त्या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

जलपुरवठा खात्याने जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार असल्याने दोन दिवस पाणी नसेल अशी नोटीस बजावली होती. मात्र दोन दिवस उलटून रविवारी तिसरा दिवस संपला तरी डिचोलीत पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी जलखात्याला त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. काल सकाळी त्यांनी काम चालू असलेल्या परिसरात जाऊन पाहणी केली यावेळी काही नागरिकांनी ही घटनास्थळी जाऊन एकूण कामाच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमदार डॉ. शेट्ये यांनीही लोकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल खेद व्यक्त केला. पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते मात्र तशी खबरदारी घेतली नसल्याने लोकांची मोठी गौरसीय झाली असल्याचे सांगितले.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत तेली यांनी स्वखर्चाने भायली पेठ येथील लोकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला तसेच इतर भागांतही पाणीपुरवठा खात्यातर्फे तसेच काही स्थानिकांनी पुढाकार घेऊन लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना केलेली आहे. आमदार डॉ. शेट्ये यांनी विविध भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा केला. नगराध्यक्ष विजय नाटेकर हे सलग दोन तीन दिवस दुरुस्ती कामाच्या ठिकाणी तळ ठोकून
आहेत.

दरम्यान, पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून रविवारी रात्री पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले.