Home बातम्या डिचोलीत खाणीतील दरड कोसळली बाराजण येथील घरांना धोका

डिचोलीत खाणीतील दरड कोसळली बाराजण येथील घरांना धोका

0

पोलिसात तक्रार

डिचोली तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खाण परिसरात असलेली अनेक गावे भीतीच्या छायेत वावरत असून खाणीच्या खंदकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दरड कोसळून व माती दुभंगून भीषण अपघाताचा गंभीर धोका आहे. काल बाराजण धबधबा येथे जमीन खचल्याने खाण खंदकात माती शिरल्याने धोका निर्माण झाला आहे.

अडवलपाल डिचोली, लामगाव, व्हाळशी, मुळगांव, शिरगांव आदि गावाबरोबरच न्हावेली, साखळी पाळी परिसरातही धोका निर्माण झाला आहे.

बाराजण धबधबा डिचोली येथे सेसा गोवा खाणीतील दरड पाण्याने तुटुंब भरलेल्या खंदकात कोसळल्याने या भागातील सुमारे ५० घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. सकाळपासून दोन वेळा दरड खंदकात कोसळली. हा प्रकार चालूच राहिला तर खाण खंदकाला तडे जाऊन मुळगाव येथे झालेल्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका असून याबाबत दिपक गावकर यांनी डिचोली पोलीस खाण खाते, उपजिल्हाधिकारी व मामलेदारांकडे लेखी तक्रार केली आहे. कोमुनिदादच्या जागेत कंपनीने अतिक्रमण केल्याची तक्रार काही महिन्यापूर्वी करण्यात आल्यानंतरही याठिकाणी कंपनीने बेकायदा उत्खनन केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. सर्वे क्र. ७८/१ या जागेतील जमिनी काल सकाळी खचून त्यातील काही भाग खंदकातील पाण्यात पडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्वरित प्लास्टिक घालून मलमपट्टी केली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा दरड कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. पोलीस निरिक्षक निनाद दंडेलकर, मामलेदार कार्यालयातील अधिकारी, तलाठी आदिनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

पावसाचा जोर : भीती कायम

दरम्यान, गेल्या दोन दिवसात डिचोलीत मुसळधार पाऊस चालू असल्याने डिचोली, लामगाव, अडवलपाल, मुळगांव, व्हाळशी या भागातील खाणीना धोका निर्माण झालेला आहे. सर्वच ठिकाणी खंदकांमध्ये पाणी साठलेले असून कंपनी व्यवस्थापनाने खबरदारी घेतल्याचा निर्वाळा लेखी स्वरूपात दिलेला असला तरी प्रत्यक्षात धोका कायम असल्याची भीती रमेश गावस यांनी व्यक्त केली आहे. उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती दिली.