महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारार्थ फोंड्यात जाहीर सभा
डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. विकासाची ही गती कायम राखण्यासाठी जनतेचीही तेवढीच मोलाची साथ अपेक्षित आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसत असले, तरी ते युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यस्थी करण्यात सक्षम आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, त्यापूर्वी 2037 मध्ये गोवा हे विकसित राज्य बनवण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे यशस्वी ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने काल देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यात आगमन झाले. यानंतर त्यांनी काल सायंकाळी उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर
सभा घेतली.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार गोविंद गावडे, आमदार मायकल लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, खासदार सदानंद तनावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष हरीश नाईक, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश नाईक, कुर्टी पंचायतीचे सरपंच नावेद तेहसीलदार, नगरसेवक विश्वनाथ दळवी, रॉय नाईक, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, आनंद नाईक व जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्याचे भाजप सरकार हे राज्याला शैक्षणिक हब तयार करून आधुनिक पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रितेश नाईक यांना विजयी करून मतदार स्व. रवी नाईक यांची परंपरा टिकवून ठेवण्यात मदत करणार आहे. गोव्यात 2027 पर्यंत आणि त्यानंतरही भाजप-मगो पक्षाचे युतीचे सरकार अस्तित्वात राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत, गोविंद गावडे, मायकल लोबो, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांची भाषणे झाली.
फोंडा मतदारसंघात
जमावबंदीचा आदेश जारी
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोंडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व सार्वजनिक सभा, रॅली आणि पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तर मतदानापूर्वीच्या 48 तासांच्या शांततेच्या कालावधीत ध्वनिक्षेपकांवर बंदी घालण्यात आली आहे.
मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी प्रचार वाहनांच्या वाहतुकीवरही निर्बंध घातले आहेत. रोख रक्कम, दारू किंवा प्रलोभनांचे वितरण रोखण्यासाठी खासगी वाहनांची कडक तपासणी अनिवार्य केली आहे.
फर्मागुडीत होणार आयआयटी : प्रमोद सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डबल इंजिन सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे यावेळी नमूद केले. गोव्यात आवश्यक असलेला आयआयटी प्रकल्प फर्मागुडी येथे सुरू हाणार आहे. त्याच बरोबर राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या गृहआधार योजनेच्या मानधनात लवकरच वाढ करण्यात येईल. पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांचा विजय निश्चित असून, मोठी आघाडी देण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

