ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत

0
15

खासदारांच्या फोडाफोडीची ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम पूर्ण; शिंदेंकडे आता 13 खासदार

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ‘ऑपरेशन टायगर’ ही खासदारांच्या फोडाफोडीची मोहीम काल अधिकृतपणे पूर्ण झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) गटाच्या 6 खासदारांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या फोडाफोडीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे अत्यंत आक्रमक दिसले. चार वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हा 40 आमदार सोबत होते. आज आम्ही चौकार नाही, तर थेट षटकार मारला आहे. हे एक नाही, तर आमचे 6 ‘टायगर’ आहेत, अशा शब्दांत शिंदेंनी फुटीर खासदारांची पाठराखण केली.

या फोडाफोडीच्या राजकारणानंतर शिंदे गटातील खासदारांची संख्या 7 वरून 13 वर पोहोचली आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांची संख्या 9 वरून 3 पर्यंत खाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी काल पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
प्रवेश केला.
शिवसेना हे कुटुंब असून, कट्टर शिवसैनिक खासदार आमच्याकडे आले आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी फुटीर खासदारांचे स्वागत केले.

आपल्यासमवेत आज सहा टायगर येथे उपस्थित आहेत. आमच्याकडे आता तीन ‘संजय’ झाले आहेत. ते (संजय राऊत) तिकडेच आहेत, कोणाला घ्यायचे आहे का अजून? आमच्याकडे तर चौथाही संजय (संजय राठोड) आहे. मी नक्की कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

संजय राऊत यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली. मिंधे बाळंत झाले असून, त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिला आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी फुटीर खासदारांचा समाचार घेतला. पुढे जाऊन त्यांचे सिजरिंग करावे लागेल, अशा शब्दातही राऊतांनी तोंडसुख घेतले. चित्रगुप्ताने त्यांच्या पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे. यांच्या पुढच्या पिढ्या म्हणतील, ‘माझे वडील गद्दार होते’, ‘माझे पती गद्दार होते’, ‘माझे आजोबा गद्दार होते’, अशी टीका देखील राऊतांनी केली.