ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरची लवकरच नियुक्ती होणार

0
3

मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित; आक्षेप मागवले

राज्य सरकारकडून ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक खात्याने गोवा ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित काल केली.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 67 मध्ये राज्य सरकारला रस्ते वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. राज्यात ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर नियुक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. आता, वाहतूक खात्याने ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
गोवा ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वासंबंधी आक्षेप आणि सूचनांसाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधितांनी आपले आक्षेप, सूचना वाहतूक संचालक, पहिला मजला, जुन्ता हाउस, पणजी, गोवा-403001 यांना पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. तीस दिवसांच्या समाप्तीनंतर सरकारकडून सदर मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतली जाणार आहेत.

ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरसाठी तीन वर्षाचा परवाना दिला जाणार आहे. सदर परवाना आणखी तीन वर्षे वाढविण्याची तरतूद आहे. परवान्यासाठी पाच लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरचे गोव्यात नोंदणीकृत कार्यालय किंवा भारतात नोंदणीकृत कार्यालय आणि गोव्यात शाखा असली पाहिजे. ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर परवाना मंजूर करण्यात आल्यानंतर सहा महिन्यात व्यवसाय सुरू केला पाहिजे; अन्यथा परवाना रद्द केला जाणार आहे.
ॲग्रीगेटर परवान्यासाठी कुणीही अर्ज करू शकतो. अर्जासोबत आवश्यक शुल्क आणि अनामत रक्कम भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
ॲग्रीगेटरचे कार्यक्षेत्र संपूर्ण गोवा राज्य असणार आहे, ॲग्रीगेटर पीएसव्ही बॅच असलेले चालक ऑनबोर्ड घेऊ शकतो. वाहनचालकांचा किमान 10 लाखांचा विमा बंधनकारक करण्यात आला आहे, महिला चालक असल्यास तिच्या कुटुंबीयांचा विमा बंधनकारक आहे. राज्य सरकारचा परवाना असलेले वाहन ऑनबोर्ड घेणे बंधनकारक आहे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.