करासवाडा म्हापसा येथील चाररस्ता मार्गाजवळ शुक्रवारी सकाळी ट्रकच्या धडकेने जखमी झालेल्या एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाम बाबाजी मयेकर (57, रा. बामणवाडा, कुचेली-म्हापसा) असे मृताचे नाव आहे. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक करासवाडा चाररस्त्यावरून थिवीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रस्त्यावरून चालत असलेल्या शाम मयेकर यांना ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने म्हापसा-पेडे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा पंचनामा पोलिस हवालदार सतीश ठाकूर यांनी केला. या अपघातातील ट्रक जप्त करण्यात आला असून, ट्रकचालक मिंगेल गोम्स (56, रा. पाळी, उसगाव) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे करासवाडा परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी करीत आहेत.

