- शशांक मो. गुळगुळे
ज्या कंपनीची बेस पॉलिसी त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी घ्यावी. कारण एकाच ठिकाणी दावा दाखल करता येतो. त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी न घेता दुसऱ्या कंपनीचीसुद्धा घेता येते. मात्र, अशावेळी बेस पॉलिसीचा व टॉप-अप पॉलिसीचा वेगळा दावा दाखल करावा लागतो.
आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे आता दुर्धर आजारांवरही मात करता येते, हे खरे असले तरी आधुनिक उपचारांचा खर्चही बऱ्याचदा परवडणारा नसतो. यासाठी मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी. प्रत्येकाने, मग तो कोणत्याही वयोगटातील असो, मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी. कारण हल्ली आजारांचे एवढे प्रकार वाढले आहेत की कधीही हॉस्पिटलात भरती व्हायची पाळी येऊ शकते. पण दुर्दैवाने भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर मेडिक्लेम पॉलिसी घेणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. सर्वसाधारणपणे पती-पत्नीसाठी एकत्र असलेली फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी व वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली जाते. ज्यांना ‘प्रीमियम’ची रक्कम भरणे कठीण असते, असे लोक गरजेपेक्षा कमी रकमेची पॉलिसी घेतात. कोरोनानंतर मेडिक्लेम पॉलिसीच्या प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा गरजेपेक्षा कमी मूल्याची पॉलिसी घेतल्यास रुग्णाच्या खिशातून बराच पैसा जाऊ शकतो.
सर्वसाधारण विमा कंपन्यानी ‘टॉप-अप’ मेडिक्लेम पॉलिसी सुरू केल्या आहेत. टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी घेण्याआधी फॅमिली फ्लोटर किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली हवी. मात्र घेतलीच पाहिजे असे नाही. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वा कंपनीकडून असणारे मेडिक्लेम कव्हर ही पॉलिसीधारकाची मूळ (बेस) पॉलिसी असते. या पॉलिसीतून मिळणाऱ्या कव्हरला ‘थ्रेशोल्ड लिमिट’ असे म्हणतात. हॉस्पिटलमध्ये झालेला खर्च जर ‘थ्रेशोल्ड लिमिट’पेक्षा जास्त असेल तर त्या रकमेचा दावा टॉप-अप पॉलिसीतून संमत होऊ शकतो. टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसीतून मिळणारे कव्हर हे ‘थ्रेशोल्ड लिमिट’च्या वर असते. विशेष म्हणजे आपण बेस पॉलिसी न घेतासुद्धा टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकता. मात्र अशी पॉलिसी घेताना आपण जी थ्रेशोल्ड लिमिट घेतलं असेल तेवढ्या रकमेपर्यंतचा दावा संमत होत नाही, तर त्यावरील रकमेचा दावा टॉप-अप पॉलिसीतून मिळू शकतो. एखाद्याकडे बेस पॉलिसी नाही; मात्र दोन लाख थ्रेशोल्ड लिमिट असणारी पाच लाख रुपये कव्हर असणारी टॉप-अप पॉलिसी घेतली असेल आणि पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा हॉस्पिटलचा खर्च तीन लाख रुपये झाला तर त्याचा दावा फक्त 1 लाख रुपये संमत होईल. कारण दोन लाख रुपये थ्रेशोल्ड वजा करून दावा संमत केला जाऊ शकतो. आपण असे समजूया की, एखाद्या पॉलिसीधारकाचा खर्च एक लाख रुपये झाला तर खर्च थ्रेशोल्ड लिमिटच्या आत असल्याने काहीही क्लेम मिळणार नाही. टॉप-अप पॉलिसीचा क्लेम थ्रेशोल्ड लिमिट संपली तरच मिळतो. त्यामुळे क्लेमची शक्यता फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी यांच्या क्लेमच्या शक्यतेपेक्षा कमी असल्याने ‘प्रीमियम’ कमी असतो. याशिवाय जेवढी थ्रेशोल्ड लिमिट जास्त तेवढा टॉप-अपमध्ये ‘प्रीमियम’ कमी भरावा लागतो. ‘एक परिवार एक पॉलिसी’ या तत्त्वाचा आधार घेऊन एकाच पॉलिसीतून कुटुंबातील सर्व सदस्यांना टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसीतून मेडिक्लेमचा फायदा मिळू शकतो. कुटुंब म्हणजे पती/पत्नी व अवलंबून असणारी मुले. ही पॉलिसी 18 ते 80 वयाच्या व्यक्तीस घेता येते. तसेच आई/वडील पॉलिसी घेत असतील तर तीन महिन्यांच्या मुलापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश करता येतो. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि मुलाचे उच्च शिक्षण चालू असेल तर 26 वर्षे वयापर्यंत त्याचा या पॉलिसीत समावेश करता येतो. दिव्यांग मुलांसाठी वयाची अट नाही.
तक्त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे थ्रेशोल्ड लिमिट व टॉप-अप कव्हरचे पर्याय सर्वसाधारणपणे खाली दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध असतात.
क्रमांक थ्रेशोल्ड लिमिट टॉप-अप कव्हर
(रुपयांत) (रुपयांत)
1 2 लाख 3 लाख
2 2 लाख 5 लाख
3 3 लाख 3 लाख
4 3 लाख 5 लाख
5 3 लाख 7 लाख
6 5 लाख 5 लाख
7 5 लाख 10 लाख
8 5 लाख 15 लाख
ज्या कंपनीची बेस पॉलिसी त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी घ्यावी. कारण एकाच ठिकाणी दावा दाखल करता येतो. मात्र, त्याच कंपनीची टॉप-अप पॉलिसी न घेता दुसऱ्या कंपनीचीसुद्धा घेता येते. मात्र, अशावेळी बेस पॉलिसीचा व टॉप-अप पॉलिसीचा वेगळा दावा दाखल करावा लागतो. दोन्ही पॉलिसी एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असे नाही; मात्र जो क्लेम दाखल करावयाचा ती पॉलिसी इन-फोर्स असावयास हवी.
टॉप-अप पॉलिसीचे टॉप-अप व सुपर टॉप-अप असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही पॉलिसी मूलतः सारख्याच असल्या तरी सुपर टॉप-अप पॉलिसी घेणे जास्त फायदेशीर होते. कारण सुपर टॉप-अप पॉलिसीत मल्टिपल ‘क्लेम’ मिळतो. तसा सध्या टॉप-अप पॉलिसीत मिळत नाही. उदाहरण द्यायचे तर एका पॉलिसीधारकाची तीन लाख कव्हर असणारी बेस पॉलिसी आहे व सात लाख रुपये कव्हर असणारी टॉप-अप पॉलिसी आहे. हॉस्पिटलचा खर्च 7 लाख रुपये झाला तर त्यांना बेस पॉलिसीतून तीन लाख रुपयांचा क्लेम मिळेल, तर उर्वरित चार लाख रुपयांचा क्लेम टॉप-अपमधून मिळेल. मात्र, त्यांना एकाच वर्षात दोनदा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल व प्रत्येक वेळी 2 लाख व 2.50 लाख रुपये इतका खर्च आला तर बेस पॉलिसीतून केवळ तीन लाख रुपये इतका ‘क्लेम’ मिळेल व प्रत्येक वेळचा खर्च तीन लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने टॉप-अप पॉलिसीतून क्लेम मिळणार नाही. कारण दोन्ही वेळी झालेला खर्च तीन लाख रुपयांपेक्षा (थ्रेशोल्ड लिमिट) कमी होता. मात्र, त्यांनी सुपर टॉप-अप पॉलिसी घेतली असेल तर मल्टिपल क्लेम स्वीकारले जाऊन दोन्ही क्लेमची रक्कम थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा जास्त असल्याने तीन लाख रुपयांचा क्लेम बेस पॉलिसीतून, तर 1.50 लाख रुपयांचा क्लेम सुपर टॉप-अप पॉलिसीतून दिला जाईल. यावरून आपल्याला असे समजू शकते की, टॉप-अप पॉलिसी घ्यावी. वयाच्या 50-55 वर्षांनंतर पॉलिसीधारकाने फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची मर्यादा (कव्हर) न वाढविता ते थ्रेशोल्ड लिमिट ठेवून 7 ते 10 लाख रुपयांचे कव्हर असणारी सुपर टॉप-अप पॉलिसी घेतल्याने ‘कव्हर’ही वाढेल व ‘प्रीमियम’ही कमी भरावा लागेल.

