पाकचे मंत्री अन् आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे आगळेवेगळे अभिनंदन केले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावला. ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच. तो म्हणजे भारताचा विजय, असा टोला पाकला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने 5 गडी राखून पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकाचे जेतेपद पटकावले. मात्र विजयानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदके स्वीकारण्यास भारतीय संघातील खेळाडूंनी नकार दर्शवला. यानंतर मोहसीन नक्वी हे आशिया चषक आणि भारतीय खेळाडूंची वैयक्तिक पदके घेऊन हॉटेलमध्ये निघून गेले. त्यानंतर भारतीय संघाने चषकाशिवाय विजय साजरा केला.
पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे कटाक्षाने टाळले होते.
अंतिम सामन्या संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ रविवारी रात्री उशिराने सुरू झाला. चषक वितरण आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून होणार असल्याने त्याला भारतीय खेळाडूंनी नकार दिला. तसेच भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवची विजयानंतर मुलाखतही घेतली गेली नाही.
यानंतर एसीसीने मला कळवले आहे की भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिकं स्वीकारणार नाही. त्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो, असे सूत्रसंचालक सायमन डुल म्हणाले. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिके घेतली, पण भारतीय संघाने एकत्रितपणे चषक घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही.
भारतीय संघाने प्रेझेंटेशन सेरेमनी संपल्यानंतर मात्र चॅम्पियन्स लिहिलेल्या बोर्डाच्या इथे एकत्र जमत विजय साजरा केला. सूर्यकुमार यादवने हातात चषक असल्याचे भासवत हात उंचावले. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

