Home बातम्या टँकरच्या धडकेने मडगावात दोघे सायकलस्वार ठार

टँकरच्या धडकेने मडगावात दोघे सायकलस्वार ठार

0

रावणफोंड उड्डाण पुलाजवळ अपघात

रावणफोंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ संजय इंटरप्रायझेस या फर्निचर दुकानासमोर इंधनवाहू टँकरची धडक बसून झालेल्या अपघातात श्रीराम जनैया जाठर (२२) व जारवी रामस्वरुप जाठर (२०) हे दोघे सायकल स्वार ठार झाले. हा अपघात काल सकाळी ८.३० वा. झाला.

जीए- ०८- यू- ६३०० क्रमांकाचा टँकर आकेंच्या दिशेने निघाला होता तर त्यापुढे जनैया जाठर व जारवी रामस्वरुप जाठर हे (मूळ मध्य प्रदेशातील, मांडो नावेली येथे राहणारे) दोघे सायकलने निघाले होते. टँकरची धडक बसून ते खाली पडले. त्यात डोक्याला मार लागल्याने श्रीराम जागच्या जागी ठार झाला तर जारवी गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. पण तेथे नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. मडगाव पोलिसांनी टँकर चालक मिलाग्रीस ब्रागांझा याला अटक केली आहे.

या रस्त्यालगत नेहमी अडथळा असतो. कोंबड्या विकण्याची व्हॅन, फळे, मांस विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून असतात. पालिका वा बांधकाम खाते त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करीत नसल्याबद्दल नागरिकात चर्चा आहे.