झेडपी निवडणूक ः आजपासून अर्ज स्वीकृती

0
184

राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आज गुरुवार दि. २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून ५ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
या निवडणुकीसाठी पेडणे, बार्देश, पणजी, डिचोली, सत्तरी, मुरगाव, सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण, फोंडा येथील उपजिल्हाधिकार्‍याची निवडणूक अधिकारी आणि तालुका मामलेदारांची साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निर्वाचन अधिकारी कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. रविवार १ मार्चला उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. ६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर, ७ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. खुल्या गटातील उमेदवाराकडून ५०० रुपये आणि राखीव गटातील उमेदवाराकडून ३०० रुपये अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे.

उमेदवारांना खर्चासाठी
५ लाख रु.ची मर्यादा
दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांपैकी ३० जागा महिला, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती यांच्यासाठी राखीव आहेत. जिल्हा पंचायतीसाठी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार आहे. निवडणुकीतील उमेदवारांना ५ लाख रुपये खर्चाचे बंधन घालण्यात आले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी करण्यात येणारा खर्च पक्षाच्या उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दररोज तपासणी केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी १५ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पंधरा निरीक्षकांना पन्नास मतदारसंघांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील मतदारसंघांची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी सिद्धिविनायक नाईक, श्रीमती उपासना माजगावकर, मेघना शेटगावकर, श्रीनेत कोठावळे, वासुदेव शेट्ये, शिवाजी देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातील जबाबदारी गौरीश शंखवाळकर, प्रशांत शिरोडकर, संध्या कामत, दीपक देसाई, नारायण प्रभुदेसाई, दामोदर मोरजकर, सगुण वेळीप, दीपक बांदेकर, जयंत तारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत राजकीय पक्षाच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. या बैठकीला भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मगोपचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती बैठकीत देऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कॉंग्रेस जिल्हा पंचायत निवडणूक
पक्षीय पातळीवर लढविणार ः गिरीश

कॉंग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ४० मतदारसंघांतून कॉंग्रेस पक्षाने लढविण्याची तयारी सुरू केली असून १० मतदारसंघात समविचारी उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याबाबत कॉंग्रेस कार्यकारी समिती आणि विधिमंडळ गट यांच्यात मतभेद नाही, असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल सांगितले.

कॉंग्रेस पक्षाने राज्य निवडणूक कार्यालयाकडे मतदारसंघांच्या याद्यांची मागणी केली. परंतु, कॉंग्रेस पक्षाला दोन दिवसात मतदारसंघाच्या याद्या दिल्या जातील, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली आहे. मतदार याद्यांच्या अभावामुळे निवडणुकीची तयारी करण्यात अडचणी येत आहेत. कॉंग्रेसच्या गट समितीना संभाव्य उमेदवारांची नावे निश्‍चित करून तालुका समन्वयाकडे २७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रदेश समितीकडून २८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे निश्‍चित करून जाहीर केली जाऊ शकतात, असेही चोडणकर यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटाने जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करण्याची सूचना काही मुद्दे उपस्थित करून केली होती. विधिमंडळ गटाने उपस्थित केलेल्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर विधिमंडळ गटाचे नेते दिगंबर कामत व कॉंग्रेसच्या इतर आमदारांना विश्वासात घेऊन पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील भाजप सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिक तसेच भाजपचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीच्या वातावरणाचा कॉंग्रेसच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा दावा चोडणकर यांनी केला.

जिल्हा पंचायत निवडणुकीतील मतदारसंघ राखीवतेच्या विरोधात आवाज उठविणारे कुंकळ्ळीचे भाजप आमदार क्लाफासियो डायस यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी दबाव आणून त्यांचे तोंड बंद केले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. जिल्हा पंचायत निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असला तरी कॉंग्रेसला मतदारसंघाच्या मतदार याद्या उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.