Home बातम्या झुआरी ऍग्रोच्या कामगारांचा जेल भरो आंदोलनाचा इशारा

झुआरी ऍग्रोच्या कामगारांचा जेल भरो आंदोलनाचा इशारा

0

३०० कामगार सहभागी होणार

गेल्या सात महिन्यांपासून संपावर असलेल्या झुआरी नगर येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स कंपनीच्या कामगारांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी १ जुलैपासून जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा गोवा क्रांती सेना मजदूर संघटनेने दिला आहे.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर म्हणाले की कामगारांच्या एकूण आठ प्रमुख मागण्या असून यामध्ये दीर्घकाल रेंगाळत पडलेला वेतन करार, एप्रिल २०१० पासूनची थकबाकी, स्वेच्छा सेवा निवृत्ती योजना चालू ठेवणे, डिसेंबर २०१२ पासूनचे वेतन यासह बाहेरील कामगार भरती पध्दत बंद करणे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता सुमारे ३०० कामगार जेल भरो आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ३ जुलै रोजी कामगार आपल्या कुटुंबियांसह जेलभरो आंदोलन करणार आहेत आणि त्यानंतर ५ रोजीपासून जेल भरो आणि उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवस्थापनाला कामगारांबरोबर बोलणी करायची असेल तर त्यांना उपोषणाच्या ठिकाणी येऊन बोलणी करावी लागेल असे म्हार्दोळकर म्हणाले.

झुआरीनगर कंपनीमध्ये सध्या तीन कामगार संघटना असल्या तरी आपल्या संघटनेकडे सर्वाधिक कामगार असल्याचा दावा म्हार्दोळकर यांनी केला. यावेळी सचिव गौरीश नाईक व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. जेल भरो आंदोलन संबंधितचे निवेदन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त तसेच पोलीस अधिक्षकांना सादर करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.