झिंगन, बाला देवी यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

0
177

बचावपटू संदेश झिंगन आणि महिला संघाची स्टार स्ट्रायकर बाला देवी यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे.

संदेश आणि बाला यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी नावे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी काल माहिती देताना सांगितले.

बालादेवीने या वर्षाच्या सुरुवातीस स्कॉटिश महिला प्रीमियर लीगच्या रेंजर्स एफसी संघासमवेत १८ महिन्यांचा करार करीत इतिहास रचला होता. या कराराबरोबरच ती देशाबाहेर व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिला भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली होती.
कोरोना महामारीच्या प्रसाराविरुद्धच्या लढाईत जनजागृती करण्यासाठी आशियाई फुटबॉल कन्फेडरेशनच्या ‘ब्रेक दी चेन’ व्हिडिओ अभियानात सहभागी झालेली ३० वर्षीय मणिपुरी खेळाडू असलेली बाला देवी ही खंडातील अग्रगण्य खेळाडूंपैकी एक होती.
तर दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असूनही झिंगन यालाही या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. सिक्कीम युनायटेडमध्ये बायचुंंग भूतिया आणि रेनेडी सिंग यांच्याबरोबर खेळलेल्या २६ वर्षीय झिंगनने भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्वत: ला स्थापित केलेले आहे.

२०१५ मध्ये फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे झिंगनने भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाच्या बचावफळीचा एक प्रमुख भाग बनलेला आहे. त्याच्या खेळाने प्रभावित होऊन नियमित कर्णधार सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत माजी प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टँटाईन यांनी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपविली होती. त्याने आत्तापर्यंत कित्येक प्रसंगी कर्णधारपदाचा आर्मबँड घातलेला आहे.