झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन विराजमान

0
3

नुकत्याच झालेल्या झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्यात फक्त हेमंत सोरेन यांनीच एकट्याने शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला इंडिया आघाडीतील 10 पक्षांचे 18 दिग्गज नेते उपस्थित होते. त्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पंश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे अध्यक्ष शिबू सोरेन हे उपस्थित होते. या सोहळ्यात हेमंत सोरेन यांनी एकट्यानेच शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर होणार आहे. मंत्रिपदावरून झामुमो आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याच कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये इंडिया आघाडीने 81 पैकी 56 जागा जिंकल्या होत्या, त्यामध्ये झामुमोला 34, काँग्रेसला 16, आरजेडीला 4 जागा मिळाल्या.