ज्येष्ठ मराठी कथाकार व नाटककार शंकर नारायण नवरे तथा ‘शन्ना’ नवरे यांचे काल पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. डोंबिवली – मुंबई येथील एका इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली.
तरूणाईत अफाट लोकप्रिय असलेले शन्ना नवरे यांच्या अनेक साहित्यकृती गाजल्या. कथा, चित्रपट, नाटक, ललित लेख, स्तंभलेखन अशा विविध प्रांतांमध्ये त्यांनी आपल्या शैलीदार लेखनाचा ठसा उमटवला होता. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सुखदुःखाला त्यांनी आपल्या साहित्यकृतींमध्ये स्थान दिले. साधी, सोपी भाषा आणि प्रसन्न शैली यामुळे शन्ना यांचे लेखन लोकप्रिय ठरले. त्यांचे आजवर २७ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय ‘गुंतता ह्रदय हे’, ‘रंगसावल्या’, ‘सुरूंग’, ‘गहिरे रंग’, ‘वर्षाव’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘नवरा म्हणू नये आपला,’ ‘सूर राहू दे’, ‘प्रेमगंध’, ‘हसत हसत फसवुनी’ अशी त्यांची नाटके रसिकांना मनापासून आवडली. कराडच्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना प्राप्त झाले होते. त्यांची ‘दिवसेंदिवस’, ‘ओलीसुकी’, ‘शहाणी सकाळ’,‘शन्नाडे’ अशी अनेक पुस्तके गाजली होती. ‘निवडुंग’, ‘इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरूंग’ या त्यांच्या कादंबर्याही प्रसिद्ध आहेत. शन्ना नवरे यांच्या निधनाबद्दल मराठी साहित्य विश्वात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.