ज्येष्ठ नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे निधन

0
11

ज्येष्ठ नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे काल पहाटे दोडामार्ग येथे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोरगाव-पेडणे येथे जन्मलेले रमाकांत पायाजी हे सध्या दोडामार्ग येथे मुलीच्या घरी वास्तव्याला होते. दरम्यान, दोडामार्ग येथे काल संध्याकाळी 3 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.


रमाकांत पायाजी यांनी हौशी रंगभूमीसाठी 55 मराठी नाटके लिहिली. ते एक चांगले नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक होते. रमाकांत पायाजी यांना वयाच्या पंधराव्या वर्षापासून वाचनाची गोडी लागली. त्यांनी कथा, कांदबऱ्या, नाटके यांचे खूप वाचन खूप केले. ना. सी. फडके, वि. स.खांडेकर, बाबा कदम, नाथ माधव हे त्यांचे आवडते लेखक होते. हौशी रंगभूमीवर 1968 ते 1996 या काळात 150 हून अधिक नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या. त्याच अनुभवाच्या जोरावर नाट्य लेखनाकडे वळले. आतापर्यंत एक रेडिओ श्रृतिका, वर्तमानपत्रात चार लघुकथा आणि 55 नाटके लिहिली. फुटला पाझर पाषाणाला, वाहते गंगा त्यागाची, हा पिंजरा काटेरी, कडेलोट, जगावेगळा, अनाथ, आभास, आघात, चंबळचा डाकू, निराधार, न्यायाचा तराजू, दैवखेळ हा असे वेगळा, विधीचक्र, न्याय नाही या जगी, उभा आंधळा मी अंधारी ही त्यांची नाटके जास्त गाजली. रमाकांत पायाजी यांना कला अकादमीचा रंग-सन्मान पुरस्कार, कला-संस्कृती खात्याचा राज्य पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले होते.