– म. कृ. पाटील
आजच्या तडफदार आणि धाडसी युवाशक्ती समवेत ज्ञान आणि अनुभवाने परिपक्व अशा महा-तारे-तारकांच्या वैचारिक, भावनिक नात्यांचा विवेकी गोफ विणण्याचे महत्त्वाचे कार्य ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेने केलेला आहे. म्हातारा या शब्दाला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, जरठ आणि स्थविर असे शब्द आहेत. म्हातारपण म्हणजे वार्धक्य. ‘म्हातारा’ या शब्दाचा विग्रह ‘महा तारा’ असा केला आहे. घरोघरी, समाजात असे अनेक महा तारे-तारका आहेत. ते घर आणि समाजाचे आधारस्तंभ आहेत. या चर्चासत्राद्वारे तरुण, होतकरू युवापिढीला ज्येष्ठांच्या प्रति आदर, ज्येष्ठांची सेवा-सुश्रुषा, त्यांच्या वेदना जाणून घेऊन कार्य करण्यास प्रवृत्त आणि उद्युक्त करण्याचा हा अभिनव आणि नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित केल्याबद्दल समस्त ‘महा-तार्यां’च्या वतीने शतशः धन्यवाद!
वृद्धत्व, म्हातारपण अथवा वार्धक्य हा शाप नसून ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्वाचा अभिशाप आहे. जन्माला आल्यावर सहाव्या दिवशी सटवी मानवाचं भविष्य लिहिते, असं म्हणतात. पण आयुष्याने कधीच ‘मी तुला फक्त सुख देईन’ असं वचन दिलं नव्हतं कुणाला. नव्हतं दिलं खरच… मग मला फक्त सुखच दे असं भांडण कुणाशी आणि का? आवडती व्यक्ती दिसली की आनंदाच्या भरती लाटा, नाही दिसली तर ओहोटीच्या दुःखाची लाट. जीवनात प्रकाश-अंधार, चढ-उतार हा नियमित सारीपाट आहे. मग महा-तार्यांनी खचून जायचं कशासाठी? ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार, ज्यांनी मदत नाकारली पण चेतना अस्मिता जागवली त्यांचेही हार्दिक आभार मानून स्वतः समाधानी, सुखी राहायला हवे. कारण त्या निंदकामुळेच आपण स्वतःला परिपक्व महा-तारे म्हणून घडवू शकता. आजचे युवा-युवती उद्याच्या भारताचे ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक म्हणजेच महातारे-तारका आहेत. ज्येष्ठांच्या शारिरीक, मानसिक आणि भावनिक समस्यांची जाणीव समरसतेने जाणून घेण्याची संधी लाभली आहे. त्यामुळे वरिष्ठ जनांबद्दल आणि सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान त्यांना आपसूकच येईल. युवा शक्ती आणि उर्जा त्यासोबत महा-तार्यांच्या ज्ञानानुभवाची योग्य सांगड घालता येईल.
ज्येष्ठांप्रति आदर असलेले आणि समाजसेवेचा ध्यास असलेले युवा-युवती काय करू शकतात?..
१) ‘आम्ही ज्येष्ठांची सर्व प्रकारची काळजी घ्यायला कटिबद्ध आहोत. ज्येष्ठांवर अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचेल असे कार्य कदापिही करणार नाही’, अशी शपथ घेऊ शकतात. ‘‘स्टॉप एल्डर ऍब्यूज’’, ‘‘सन ऑफ मिलिअन पॅरेन्ट्स’’ अशी घोषवाक्ये असलेल्या टी-शर्टचा वापर एन.एस.एस. स्वयंसेवकाचे ब्रीद वाक्य आहे. ‘‘नॉट मी, बट फॉर यू’’. एन.सी.सी. आणि स्काऊट गाईडचे स्वयंसेवक, क्रीडापटू यांच्या द्वारे समाज प्रबोधन होऊ शकते. महामहीम राष्ट्रपती ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतात असे डॉ. अब्दुल कलाम यांनी ज्येष्ठांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी ‘‘स्नेहबंधन’’ संकल्पना अंमलात आणली. ही संकल्पना म्हणजे मुलामुलींनी मातापित्यांना झिडकारले तर, त्यांचा नातू अथवा इतर नागरिक स्नेहाचा रेशिम धागा बांधून प्रतिपाळ करण्याची शपथ घेऊन कार्य निभावतो.
२-अ) गोवा राज्यशासनाच्या समाज कल्याण संचालनालयाने अनेक योजना ज्येष्ठांकरिता राबविल्या आहेत. वय वाढते तशी ‘आयडेंटिटी’ गमावून बसण्याची पाळी ज्येष्ठांवर येते त्यावेळी कार्ड हीच आयडेंटिटी ठरते, तेव्हा ते अनमोल ठरते. ओळखपत्र धारकाला ५०% बस प्रवास भाडे सवलत मिळते. ती सवलत फक्त कदंब महामंडळापुरती सिमित आहे.
२-ब) उम्मीद डे केअर सेंटर ः गोवा राज्यात एकूण १८६ पंचायती आणि १५ नगरपालिका आहेत. या ठिकाणी ‘उम्मीद केंद्र’ असावे अशी शासकीय योजना आहे. प्रत्येक पंचायत, नगर पालिकेत अशी केंद्रे सुरू करण्यास युवा शक्तीला वाव आहे.
२-क) दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ ज्येष्ठांना मिळवून देण्याच्या कामी सहभाग घेता येतो.
२-ड) केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत ज्येष्ठांकरिता स्नेहालय, आसरा, उभारण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अनुदान रूपात आर्थिक साहाय्य मिळते. १५/२० युवा-युवती त्या जागी सेवा देऊ शकतात.
२-ई) गोवा राज्य शासनाने मार्च महिन्यात ज्येष्ठांकरिता पर्यटन स्थळांना, धार्मिक व पवित्र स्थळांना भेटी देण्याच्या ज्येष्ठांना ८०% अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. युवक पर्यटन सहलीचे आयोजन करू शकतात.
३) गोमंतकात आपत्कालीन सेवा, ज्येष्ठांकरिता अजून झालेली नाही. २४ तास उपलब्ध असणार्या हेल्पलाईनचा अभाव आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी १२९८ या क्रमांकाची हेल्पलाईन तर संपूर्ण महाराष्ट्रात ०९०२९००००९१ या भ्रमणध्वनिवर हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईनद्वारे समुपदेशन, औषधोपचार मदत आणि इतर मदत दिली जाते. अशा प्रकारची २४ गुणिले ७ अशी सेवा गोवा राज्यात सुरू करण्यास युवा शक्तीने प्रयत्न करावा. १०० क्रमांकावर आपली तक्रार नोंदविण्यास ज्येष्ठ घाबरतात.
४) पुण्यात एक अनोखा उपक्रम ज्येष्ठांकरिता राबविला आहे. भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आणि पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रवीण चोरबोले यांच्या सृजनशील संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम आहे. बॅटरीवर चालणारी सहा आसनी रिक्षा फक्त ज्येष्ठांच्या सेवेकरिता विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. याचा मोफत लाभ उपनगरीय ज्येष्ठांना घेता यावा म्हणून घरोघरी छापील पत्रके वाटली. दर दिवशी ४०० ते ५०० ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेतात. अशा प्रकारची मोफत सेवा गोमंतकातील शहरी भागात उपलब्ध करण्यासाठी खटपट करावी. गोमंतकात दानशूर आणि सेवाभावी व्यक्तींची वानवा नाही. त्यांना फक्त विधायक कार्य, कार्यकर्ते आणि व्यवहारातील पारदर्शकता हवी असते. ही पारदर्शकता युवा पिढी अवश्य देऊ शकेल.
५) गोमन्तकातील दोन्ही जिल्ह्यांत सुसज्ज असे एकेक ज्येष्ठ नागरिक भवन निर्माण व्हायला हवे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा सुविधा देणारी केंद्रे, समुपदेशन केंद्र, निवासाची व्यवस्था, वाचनालय, करमणुकीची सोय, जुन्या-नव्या विचारांची देवाण-घेवाण होण्याकरिता व्याख्यानं, चर्चासत्र, शिबिरं इत्यादी आयोजन सोय व्हायला हवी. आपल्या परिसरात असणारे आजी-आजोबा हे लहान बालकापेक्षा वेगळे आहेत का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दोघांमध्ये किती साधर्म्य आहे? लहान बालकाच्या आहार-विहाराविषयी आपण किती जागरूक असतो? याउलट ज्येष्ठांप्रति बेफिकीर असतो. याकरिता जागरूक असण्याची जबाबदारी नातवंडांवर म्हणजे युवकांवर येते. खरे ज्ञान पुस्तकातून मस्तकात, मस्तकातून हृदयात आणि हृदयातून कृतीत उतरले तर त्या आत्मसात ज्ञानाचा उपयोग. खरा ज्ञानी बालवत् असतो, असे म्हणतात. निष्पाप, निरागस, स्वतः आनंदी, दुसर्यालाही वर्तनातून आनंदी करणारा, अशी निरागसता बालकासम अज्ञानातून आलेली नसते. जगाचे टक्के, टोमणे खाऊन, बरे-वाईट अनुभव पचवून, ज्ञानी व्यक्ती आपली निष्पाप वृत्ती आणि निरागसता राखण्यात पूर्णतः यशस्वी होते. कारण जीवन जगण्यातील सजगता अज्ञान, द्वेष, राग, लोभ अभिनिवेशाच्या पलिकडे घेऊन जाते. वय वाढणे ही भौतिक घटना. परिपक्वता ही सर्वस्वी मानसिक, वैचारिक बाब आहे. यास्तव गोमन्तक कवी, कविवर्य बा. भ. बोरकर यांनी याचे वर्णन अतिशय सुंदर काव्यात केले आहे… जीवन त्यांना कळले हो|
मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो॥

