Home बातम्या ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवासात सवलतीसाठी प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवासात सवलतीसाठी प्रयत्न

0

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आपल्या पक्षाच्या सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांना विमान प्रवासात सवलत मिळावी म्हणून सरकार इंडियन एअरलाईन्स व एअर इंडियाकडे प्रयत्न करीत असल्याचे समाजकल्याणमंत्री महादेव नाईक यांनी काल येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थापन केलेल्या उम्मीद केंद्राच्या संख्येतही वाढ करण्याचा विचार नाईक यांनी व्यक्त केला. सुसंस्कारी पिढी तयार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव महत्त्वाचा असतो. आमच्या काळातील युवक आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच युवक दिशाहीन होतात. ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण आपल्या मतदारसंघात नेत्रचिकित्सा शिबिरे आयोजित केली. काहींना मोतिबिंदू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना इस्पितळात नेऊन शस्त्रक्रिया करून घेण्याचे आपण ठरविले. परंतु त्यांची मुले आई-वडिलांबरोबर इस्पितळात येण्यास तयार नाही. हा अनुभव त्यांनी याप्रसंगी सांगितला.

समाजकल्याणमंत्र्यांच्या हस्ते २० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यात एकनाथ गणेश नाईक, एडविन नोरोन्हा, विठ्ठल दत्ता नाईक, जुझे ओवेलिक, क्विन्तीन क्रियादो, तिमोतीयो फर्नांडिस, सरस्वती गंगाराम मोरजकर, बालाजी कोसंबे, नंदा रायकर, विनायक जी. शिरोडकर, कमला देविदास, सिताराम शेटकर, सुनंदा चंद्रकांत आमोणकर व पांडुरंग सावंत यांचा समावेश होता. या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून आमदार प्रमोद सावंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सरकार ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करते. काही ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष देण्यास कोणीही नसतात. त्यांची मुलेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वृद्धाश्रम स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

समाजकल्याण खात्याचे उपसंचालक सांतान फर्नांडिस यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वेदना व्यक्त करणारी कवी संजीव वेरेकर यांची ‘रक्ताची नाती’ ही कविता प्रभावीपणे सादर केली. खात्याच्या संचालक लीना गोलतकर यांनी स्वागत तर सूत्रसंचालन सहाय्यक संचालक सुदेश गावडे यांनी केले.