ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

0
12

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे काल मुंबईतील हिंदुजा इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 85व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
दया डोंगरे यांच्या आई यमुताई मोडक या देखील अभिनेत्री होत्या, तर त्यांच्या आत्या शांता मोडक याही गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. 11 मार्च 1940 रोजी दया डोंगरे यांचा जन्म झाला. त्यांना गायन क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. शालेय जीवनापासून त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीत यांचे प्रशिक्षण घेतले होते.

दया डोंगरे यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगाच्या वेळी गाणे म्हटले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दया डोंगरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यामधून त्यांनी अभिनय केला. ज्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले.
आव्हान, नवरी मिळे नवऱ्याला, उंबरठा, खट्याळ सासू नाठाळ सून अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केले. तसंच मालिका आणि नाटकांमधूनही त्या काम करत होत्या. खलनायिकेच्या भूमिका त्यांनी मोठ्या प्रमाणावर साकारल्या. मराठी चित्रपटसृष्टीतले ललिता पवार यांच्यानंतरचे खलनायिकेच्या भूमिका करणारे दुसरे नाव होते ते म्हणजे दया डोंगरे यांचे. 1990 नंतर त्यांनी अभिनय करणे थांबवले. 2019 मध्ये नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन दया डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला होता. ‘मायबाप’ आणि ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या सिनेमांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.