‘लगान’ आणि ‘गजनी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे काल दुःखद निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावरून दिली. प्रदीप रावत यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे.
प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांना या आजाराचा पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर भिवंडीतील कर्करोग रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

