ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

0
12

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दोनापावल येथे निधन;

पुण्यातील डोणजे गावात पार्थिवावर अंत्यसंस्कार;

100 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये भूमिका

आपल्या भारदस्त अभिनय, संवादफेकीने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतंत्र ठसा उमटवणारे एक सिद्धहस्त कलाकार, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (75 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी पहाटे दोनापावल-पणजी येथील सदनिकेत निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळताच त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार पाटेकर आणि इतर नातेवाईक तातडीने गोव्यात दाखल झाले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव कुटुंबीयांचे स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळ 5.30 च्या सुमारास त्यांचे पार्थिव पुण्याकडे रवाना करण्यात आले. पुण्यातील सिंहगडाखालील डोणजे गावात त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

हृदयविकाराचा झटका आला, त्यावेळी दोनापावल-पणजी येथील निवासस्थानी नानांच्या सोबत कुणीच नव्हता. नानांनी मध्यरात्री 2.30 वाजता एका मित्राला मेसेज केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, आपणाला अस्वस्थ वाटत आहे. आपल्याला डाव्या बाजूला त्रास होत आहे; पण रात्रीची वेळ असल्याने मित्र झोपला असावा व त्याने वेळेवर मेसेज पाहिला नाही. पहाटेला जाग आल्यानंतर त्या मित्राने नानांचा मेसेज पाहिला. तो मित्र पहाटे 4 वाजता नानांच्या घरी पोहोचला, तोपर्यंत नानांना खूप घाम सुटला होता. त्या मित्राने केअर टेकरला बोलावून घेतले. नंतर त्याने खासगी इस्पितळाची रुग्णवाहिका बोलवून घेतली. त्या इस्पितळाचे आपत्कालीन वैद्यकीय पथक नानांच्या घरी गेले, तेव्हा नाना कोणताही प्रतिसाद देत नव्हते. पहाटे 4.20 वाजता त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. नानांना सीपीआर देण्यात आला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

सीपीआर दिला; पण…
हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास दोनापावल येथील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. त्यांना सुमारे 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. अखेर 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे डॉ. शेखर साळकर यांनी दिली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

अंत्यदर्शनासाठी गर्दी
नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्याला नेण्यापूर्वी अर्धा तास बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मंत्री दिगंबर कामत, मंत्री रमेश तवडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याबरोबरच नानांच्या अनेक चाहत्यानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकामधून मोपा विमानतळावर नेण्यात आले, तेथून हवाई रुग्णवाहिकेमधून पुण्यात नेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते माणिकराव ठाकरे, मंत्री उदय सांमत यांनी देखील बांबोळी येथील गोमेकॉला भेट देऊन नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

उत्पल पर्रीकरांकडून शोक व्यक्त
उत्पल पर्रीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. नाना हे महाराष्ट्रातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे चिंतित होते. गोवा भेटीवर असलेल्या नानांची पाच दिवसांपूर्वी भेट घेण्याची संधी मिळाली, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

निधनाचे वृत्त ऐकून
देवेंद्र फडणवीस गहिवरले

नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गहिवरले. नानांच्या निधनाची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीसांनी मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच नाना पाटेकर यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी सरकार कायम आपल्यासोबत असेल, असेही सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कसदार कलाकार आणि अत्यंत उत्तम माणूस असलेल्या नाना पाटेकर यांचे अचानक जाणे ही एक मोठी हानी आहे. ‘क्रांतीवीर’ ते ‘नटसम्राट’ अशा विविध चित्रपटांतून त्यांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही, तर त्यांना वैचारिक दृष्टीही दिली, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

चित्रपटसृष्टीतील कारकीर्द
नाना पाटेकर यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून (थिएटर) सुरुवात केल्यानंतर ‘गमन’ (1978) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘परिंदा’ (1989), साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि ‘क्रांतीवीर’ (1994) चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी ‘अग्नी साक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ (2016) चित्रपटात उत्तम भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम अभिनय सादर केला.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. नानांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. रंगभूमीपासून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतच्या त्यांचा प्रदीर्घ आणि उल्लेखनीय प्रवास राहिला आहे. त्यांनी प्रभावी अभिनयाने चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांकडून
तीव्र दु:ख व्यक्त

नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, ‘एक्स’ वर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अतिशय मोजक्या अभिनेत्यांमध्ये अशी तीव्रता, अनोखे व्यक्तिमत्त्व आणि अजोड स्क्रीन प्रेझेन्स असतो, जो नाना पाटेकर यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत अष्टपैलूत्व आणि सर्जनशीलता आणली आणि आपल्याला अशी अजरामर पात्रे दिली जी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. ते त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ओळखले जात होते; आपल्या तत्त्वांसाठी उभे राहताना आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहताना त्यांनी कधीही आढेवेढे घेतले नाहीत, असेही पतंप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.