ज्येष्ठ अभिनेते गोवर्धनअसरानी यांचे निधन

0
12

आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी (84) यांचे काल निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील स्मरणात आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन असरानी यांचे काल सायंकाळी चार वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने काल त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले.

शोले या सिनेमातून असरानी यांनी केलेली जेलरची भूमिका अनेकांच्या आजही स्मरणात आहे. ‘हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!’ हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत 1972 ते 1991 या काळात सुमारे 25 चित्रपटांमध्ये असरानी यांनी काम केले.
1967 साली ‘हरें कांच की चुडियां’ या चित्रपटातून असरानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या पहिल्या काही भूमिका गंभीर स्वरूपाच्या होत्या, मात्र पुढे त्यांनी विनोदी अभिनयात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. 5 दशकांहून अधिक काळात असरानी यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले.