ज्येष्ठांना कसे जपावे..?

0
262

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी

ज्येष्ठांनी कसे जगावे यावर आम्ही विचार केला. आपले जगणे ते जगतीलही. लिहिले व त्यांनी ते वाचले. त्यावर आपले जगणे ठरविले असे काही नाही. दोन अधिक दोन चारच होणार असे काही नाही. जीवन जगणे ही बेरीज-वजाबाकी असू शकत नाही. माणसाच्या जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा त्याचे जगणे पराधीन होऊन जाते.
अशा पराधीन झालेल्या ज्येष्ठांविषयी आम्ही बोलू. मागच्या कित्येक लेखात मी असा विचार मांडला होता की ज्येष्ठांनी पराधीन होता कामा नये. पण पराधीन होणे न होणे आपल्या हाती नसतेच!प्रेशरची माणसे, हृदयाचा आजार असलेली मधुमेहाचा आजार असलेली माणसे आपली औषधे नियमित घेत असतात तरीदेखील आजार जसा जुनाट व्हायला लागतो तसा शरीरावर त्या आजाराचा पगडा वाढतो- दुष्परिणाम होऊ लागतात.
प्रेशरचा त्रास असलेल्याचा रक्तदाब एकदम वाढतो.. मस्तकातील नस तुटते.. त्याला लकवा मारतो. हॉस्पिटलातून वाचून घरी आणला जातो, तेव्हापासून मरेपर्यंत अंथरुणावरच सर्वकाही! या आजारातून दगावला तर बरे म्हणायचे. हळुवार चालत जाणे जर जमत असेल तर आपली नित्याची कामे आपणच करणे शक्य होते. नसेल तर…!
आपण लाड करून वाढवलेली माणसे आपल्या आसपास असतातच… ती आपली सगळी कामे करतात. पैसे असतील तर नर्स ठेवली जाते. म्हातारा कॉटवर पडलेला असतो..! सेवेला फक्त नर्स बाईच असते. बाकी कुणीही त्या आपल्या माणसाला भेटायला त्या खोलीतपण जात नाहीत. वेळ कुणाला आहे! म्हातार्‍या माणसासोबत बसणे कुणाला आवडेल? बोलू न शकणार्‍या माणसाशी कोण बोलेल! पण तुम्ही जर त्याच्याजवळ बसाल, त्यांच्याशी बोलाल… तर ते लवकर बरे होऊ शकतात. तुमच्या मायेचा स्पर्श त्यांना जगवू शकतो. तुम्ही ते कराल ना!
अशा आजारी व ज्येष्ठांना तुमची गरज आहे. तुम्हाला त्यांना जपावे लागेल. वृद्धत्व हे प्रत्येक माणसाच्या नशिबाला येते. आयुष्याच्या सरते शेवटी प्रत्येक जण हाच विचार करतात, ‘देवाने मला माझे हात-पाय धड असताना न्यावे!’ सगळ्यांच्या नशिबात हे भाग्य नसते. आजार बळावल्याने अंथरूण धरलेल्या आपल्या माणसाची सेवा पुष्कळजण करतात – करावीच लागते.
मी बघितले, एकटा घरचा धनी, आपल्या कुटुंबासाठी राब राब राबला, बायका-मुलांकरता काबाडकष्ट केलेत, कुठे फिरायला गेला नाही, नाटक-सिनेमा बघितले नाही, स्वतःच्या शरीराचा विचार न करता मरत राहिला… घर बांधले… मुले मोठी झाली… शरीर थकले… अंथरुणावर पडला. वृद्धत्व हाच त्याचा आजार होय. त्याची बायको सेवा करू लागली. स्वतःकरता बांधलेल्या खोलीत, पाण्याच्या गादीवर तो झोपला व झोपूनच राहिला. दिवस गेले, महिना संपला, असे हे चालूच होते. सगळे काही कॉटवर! बायकोही वैतागून गेली. केव्हा केव्हा तो भ्रमात जातो. तिला शिविगाळ करतो. म्हातारपणात माणूस परत एकदा लहान मूल बनतो… पराधीन बनतो.
आम्ही लहान मुलांची जोपासना करतो. त्याला खाऊ घालतो, आंघोळ घालतो, डायपर बदलतो हो ना! मग म्हातारा माणूस हा एक मूल आहे असे समजून त्याची सेवा का करत नाही? हा प्रश्‍न विचारणे ठीक आहे हो, पण ते करणे किती कठीण असते याची कल्पना न केलेली बरी. एक मात्र सत्य आहे. त्याची सेवा त्याची बायकोच करू शकते. बायको नसेल तर सूनबाई, मुलगी किंवा नर्स, नाहीतर कुणीच नाही!
आपल्या माणसाला आपण जपले पाहिजे. नाहीतर कोण जपणार? ज्याच्याकडे पैसे आहेत तो ती तजवीज करूनच ठेवतो. अशा प्रकारची ओल्ड एज होम्स आहेत. तिथे पैसे द्या, तुमची सेवा होईल. कुणी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. फक्त आपल्या माणसाच्या प्रेमाला तुम्ही मुकाल! माणसाला पुष्कळ काही हवे असते, सगळेच काही प्रत्येकाला मिळतेच असे नाही. जेवढे नशिबात असते तेवढेच मिळते. कमी-जास्त नाहीच. शेवट सेवाही करणारी माणसे थकतात. ज्यांना वॉटर बेड विकत घेणे जमते, ते आणतात. ज्यांना शक्य नसते ते साध्या कॉटवर पेशंटला ठेवतात. नर्स ठेवणे जमत नसेल तर ठीक नाहीतर कुणीतरी वेळ मिळेल तसा सेवा करत असतो.
मी एका पेशंटला बघायला गेलो होतो. पेशंट एकटीच कॉटवर पडली होती. घरात प्रवेशताना सूनबाई दिसली. चांगली ठणठणीत होती. पण इकडे सासूबाईंची सेवा ती करत नव्हती. घरी फक्त ती जेवण बनवायची. आपल्या मुलांची सोय करायची. पतिराजांची काळजी घ्यायची. पतीराज म्हणजे त्या बेडवर पडलेल्या म्हातारीचा मुलगा. तिची सर्व सेवा तोच करायचा. सगळे करून कामावर जायचा. कधी दुपारी सूनबाई तिला काही खाऊ घालायची. मग तिचे सगळे कॉटवरच. प्रत्येक दिवशी डायपर आणायला पैसे नव्हते. मी तिला तपासायला गेलो होतो. कॉटवरील गादी लघवीने ओली झाली होती. रूमभर लघवीचा घमघमाट पसरला होता. दोन दिवसांपूर्वी ती कॉटवरून खाली कोसळली होती. हात मोडला होता. शरीराला आणखी एक व्याधी जडली होती. मी काहीच करू शकलो नाही व तो मुलगाही चुपचाप बाजूला उभा होता. शेजार्‍यांनी कौतुक केले व पोराचे किती काळजी घेतो ग बिचारा! मुलगा चार दिवसांनी आला व म्हणाला, ‘आई गेली!’ मी म्हटले, ‘सुटली बिचारी!’
असे कितीतरी म्हातारे, म्हातार्‍या आपल्या जीवनाच्या सरतेशेवटी कॉटवर पडलेली असतात! त्यांची कोण व कशी सेवा करणार?
मूत्रपिंड निकामी झालेली कितीतरी माणसे दर आठवड्याला डायलिसीस करायला जातात. पैसे खर्च होतच राहतात..! आयुष्यभर केलेली कमाई संपते. मुले बघतात. पैसे कमी होताहेत. माया पण आटून जाते. शेवट ठरलेला असतो.
एका घरात पतीला हार्ट अटॅक आला.. धावत पळत हॉस्पिटलात गेला.. दोन-तीन लाख संपले.. अँजिओप्लास्टी झाली. दोन-तीन लाख संपले. साहेब घरी आले. हल्लीच रीटायर झाले होते. दारू, सिगारेट ओढणे चालूच होते. सहा महिन्यांनंतर परत घरी अचानक कोसळले. धावाधाव झाली. हॉस्पिटलात बायपास झाली. दोन-चार लाख संपले. बायकोही रिटायर झाली होती. हातातली पुंजी संपल्याने बायको हताश झाली. चक्क वेडी झाली. कुणी एक बाई तिची सेवा करते. कुठलाही आजार नाही. फडाफडा बोलणारी, चालणारी बाई चक्क लाचार झाली होती. तिला आता कुणी बघावे? तर शेजारी तिचा नवरा बसलेला.. बेफिकिर! टेबलावर दारूचा ग्लास.. हातात तीच सिगारेट्स. जीवन असेच संपणार होते.
कितीही प्रयत्न केले तरी नशिबात घडणारे घडत राहील… असे म्हणणार्‍याची मला केव्हा केव्हा कीव येते. प्रत्येक प्रौढ माणसाने यावर विचार करावा. ज्येष्ठ झाल्यावर काय करणार? कशाप्रकारे जगणार ठरवावे व त्याची तरतूद करावी. सगळ्या बाजूंनी विचार करावा. कुणालाही दोष न देता.. लादता काम करावे.
माझ्या एका कथेचा म्हातारा आपल्या मुलीच्या घरी राहतो. जावई, नातू, मुलगी.. त्याची बायको सेवा करतात. ते धडधाकट आहेत. भरपूर जेवतात. पण त्यांची स्मरणशक्ती थकलेली आहे. ते आपल्यातच असतात. पराधीन झालेले आहेत. खोकला नाही, आजार नाही, रक्तदाबावर औषधे चालू आहेत. पण रात्रभर खोकतात. घरच्यांना झोपू देत नाहीत. शेजारी दुसर्‍या कॉटवर झोपलेल्या बायकोला जागे करतात. ती बिचारी आजारी आहे. तरीही उठतात. नवरा जागाच राहतो व तीही! पराधीन झालेत बिचारे. त्यांना कळत नाही आपण काय करतो ते! मी म्हटले, ‘रात्रभर खोकत राहिलात तर दवाखान्यात भरती करावे लागेल..’ मात्रा लागू पडली. खोकला बंद! विचारले तर सांगतात बरे आहे. खोकला नाही. सगळे काही ठीक चाललेय!
आज गरज आहे ती ज्येष्ठांना जपण्याची! त्यांना आधार देण्याची. तो आधार कुणी द्यावा? कसा द्यावा? कुठपर्यंत द्यावा हे ज्याचे त्याने ठरवावे. दोन अधिक दोन किती हा विचार न करता प्रत्येकाने ठरवावे… आपण काय करायचे? कारण आपणही केव्हा ना केव्हा ज्येष्ठ होणारच. पराधीनता ही शेवटी आपल्याही नशिबात असणार! ज्येष्ठांना जपा!