– ज्योती भट, भंडारवाडा – पालये
‘डोळे हे जुल्मी गडे,
रोखुनी मज पाहू नका..’
‘डोळे’ हा अत्यंत नाजुक असा अवयव. पण तरीसुद्धा अतिशय महत्त्वाचा. शरीराचा अविभाज्य भाग. ज्यामुळे बरे-वाईट, रंग-रूप, आकार याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो. जसा मानवासाठी हा अवयव महत्त्वाचा, तसाच इतर पशुुपक्ष्यांसाठीसुद्धा तो महत्त्वाचा. बर्याचवेळा जे आपल्या डोळ्यांना दिसते तेच सत्य आहे असे समजून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो व स्वतःचीच स्वतः फसवणूक करून घेतो.
‘जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं’ असे म्हटले आहे ते काय उगाच? एखाद्या व्यक्तीचा चेहरा वरवर अत्यंत निरागस दिसतो आणि म्हणून त्याचा स्वभाव तेवढाच मृदू असेल असे नाही आणि एखादा दिसायला कठोर असला म्हणून त्याचा स्वभावही तेवढाच कठोर असेल असेही नाही. कुत्रा हा एक इमानदार प्राणी आहे. त्याच्या चेहर्याकडे पाहिल्यास तो मवाळ वाटतो, पण जर एखादा अपरिचित माणूस समोर आला तर त्याचा तो मवाळपणा न जाणवता त्याचे गंभीर, आक्राळ-विक्राळ रूप दिसते. ‘जे चकाकते ते सोने’ असे म्हणून जर आंधळेपणाने पुढे झालो आणि त्या वस्तूला हात घातला तर सत्य काय आहे हे समजते. संथगतीने चालणारा हत्ती, तो काही वेडेवाकडे करील असे अजिबात वाटत नाही. पण जेव्हा तो रौद्रावतार धारण करतो, तेव्हा हाच हत्ती सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. काय पटलं ना? जे डोळ्यांना दिसते ते कितपत खरे असते, त्यावर कितपत विश्वास ठेवावा यावर जरूर विचार करावा.
‘डोळे’ हे माणसाच्या अंतर्मनात चाललेल्या भावनांचे प्रगटीकरण करणारे उत्तम साधन. जे मनात आहे ते लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सहज डोळ्यांत दिसते. फक्त आपल्याला ते डोळे व एकंदरीत चेहरा वाचता आला पाहिजे. जेव्हा आपण बरोबर असतो, तेव्हा डोळ्यांना डोळे भिडवले जातात. पण जेव्हा आपण चुकतो असे जाणवते तेव्हा अपराधीपणाने नजर खाली झुकते. डोळ्यांसाठी बर्याच उपमा लेखक/कवींनी दिल्या आहेत. उदा. मीनाक्षी, कमलनयन, लोचन इ.
सर्वसामान्यपणे माणूस किंवा तत्सम प्राण्यांना दोन डोळे असतात, असे सिद्ध झाले असले तरीसुद्धा समर्थ रामदासांनी ‘आरती’मध्ये मात्र चक्क त्रिनेत्री हा शब्दप्रयोग केला आहे. खरं तर त्यात तथ्य आहे. पण तो तिसरा डोळा शोधण्याचा माणूस उगाचच आटापिटा करतो. पण तो तिसरा डोळा आहे कुठे याचा मात्र थांगपत्ता लागत नाही. ज्याप्रमाणे हरीण कस्तुरीगंधाचा शोध घेत फिरते पण सुगंधाशिवाय तिला काहीच जाणवत नाही आणि शेवटपर्यंत तिला त्याचा शोध लागत नाही, त्याचप्रमाणे मानवाचा तिसरा डोळा म्हणजे त्याचे ज्ञान/बुद्धी हे कदाचित माहीत नसल्यामुळे तो त्याचा शोध घेत फिरत आहे.
याच डोळ्यांवरून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. ती अशी ‘दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.’ आणि हे सत्य आहे की आपण आपल्या शरीराचे बरेचसे अवयव स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आरसा या वस्तूचा आधार घ्यावा लागतो. हा आरसा आपल्याला चुकीचे दिशादर्शन करतो, हे माहीत असूनही आपण त्यावर विश्वास ठेवतो.
असे हे डोळे बर्याचदा न बोलताही आपल्या भावना, आपले म्हणणे दुसर्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. उदा. प्रेम, आपुलकी, राग, तिरस्कार इ. आपल्याकडे ‘डोळे वटारणे’ असाही एक वाक्प्रचार वापरला जातो. आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक असा अवयव, पण त्याच अवयवामुळे जीवनातील अंधार/उजेड विसंबून असतो आणि म्हणूनच या अवयवाची तसेच संपूर्ण शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे हे सत्य नाकारून चालणार नाही. तसे आपल्या मृत्यूनंतर जर आपले हेच डोळे आंधळ्यांना उजेड दाखवतील असे वाटत असेल तर आपण स्वेच्छेने नेत्रदान करू शकतो, जेणेकरून आपले संपूर्ण शरीर जरी अनंतात विलीन झाले तरी डोळे मात्र जिवंत राहू शकतात व सृष्टीचा आनंद घेऊ शकतात.

