ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा मोर्चा

0
14

>> दल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाचा प्रयत्न; आकाशवाणी भवनात राहुल गांधींचा 8 तास ठिय्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी काल दिल्लीत इंडिया आघाडीने ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढला. या मोर्चात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीतील 19 विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवल्यानंतर त्यांनी जवळच्या आकाशवाणी भवनमध्ये ठिय्या मांडला. रात्री सुमारे 8 वाजेपर्यंत राहुल गांधी व प्रियंका गांधी ह्या तेथेच ठाण मांडून होत्या. जवळपास 8 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने हटवत ताब्यात घेतले. त्यांच्यासह 250 जणांना किंग्सवे कॅम्प पोलीस लाइन्समध्ये आणण्यात आले होते. मात्र, रात्री 10 वाजता सर्वांना सोडण्यात आले.

संसद भवनाच्या मकरद्वारापासून काल सकाळी 10 वाजता ह्या मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी व डेरेक ओब्रायन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)च्या सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा)चे संजय राऊत यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे खासदार मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चेकऱ्यांना संसद मार्गावरील नीती आयोगाजवळ पोलिसांनी अडविले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पुढे जाता न आल्याने विरोधी खासदारांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. राहुल गांधी यांनी बॅरिकेडवर चढून हातात तिरंगा फडकावला.

अनेक खासदारांना घेतले ताब्यात
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विरोधी पक्षांतील अनेक खासदारांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना बसमध्ये बसवून शहरातील विविध पोलीस ठाण्यात नेण्याची तयारीही सुरू केली. त्यामुळे हे आंदोलन आता संपल्यात जमा असल्याचे अनेकांना वाटत होते. त्याचवेळी आकाशवाणी भवनाजवळ एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या एका अनपेक्षित कृतीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

बहीण-भावाचा गनिमी कावा
दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओचे मुख्यालय असलेल्या आकाशवाणी भवनाबाहेर पोलिसांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी बसेस उभ्या केल्या होत्या. प्रियंका गांधी वाड्रा आधीच यातील एका बसमध्ये जाऊन बसल्या होत्या; तर राहुल गांधी हेदेखील बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी दोन्ही भावंडांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते पोलिसांना चकवा देऊन आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले. त्यांच्या या कृतीमुळे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना नेमके काय करावे हेच समजले नाही. गांधी बहीण-भावंडांनी आकाशवाणी भवनात प्रवेश करताच बाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्येही उत्साह संचारला. पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि पवन खेरा थेट आकाशवाणी भवनाच्या संरक्षक भिंतीवर चढले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे शांत होत आलेले इंडिया आघाडीचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले.

यादरम्यान गांधी बहीण-भावंडांसह काँग्रेसचे बहुतांश खासदार दुपारपर्यंत आकाशवाणी भवनाच्या आवारातच ठिय्या देऊन बसले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी या खासदारांशी चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनबाहेर दिल्ली पोलीस आणि जलद कृती दलाच्या जवानांचा फौजफाट तैनात केला
होता.

मोदी, शहा, भागवत, ज्ञानेश कुमार यांनी
देशातील लोकशाही संपवली : राहुल गांधी

आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीसोबत गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि ज्ञानेश कुमार यांनी मिळून देशातील लोकशाही संपवली आहे. देशाच्या निवडणुका मोदी आणि शहा यांनी हायजॅक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.