ज्ञानवापी मशिदीत त्रिशूळ, स्वस्तिक, डमरू

0
11

>> वाराणसी न्यायालयात आयुक्तकांकडून सादर सर्व्हेचा अहवाल लीक

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत १४ ते १६ मे दरम्यान झालेल्या सर्व्हेचा वाराणसी न्यायालयात सादर झालेला अहवाल काल लीक झाला. वकील आयुक्त विशाल सिंह यांनी सादर केलेल्या या ८ पानी अहवालानुसार, मशिदीतील कुंडाच्या मध्यभागी आढळलेल्या काळ्या रंगाच्या दगडाच्या आकृतीत कोणतेही छिद्र आढळले नाही. तसेच पाईप घुसवण्याची जागाही आढळली नाही. तसेच मशिदीच्या आत हत्तीची सोंड, त्रिशूळ, पान, कमळ, स्वस्तिक, डमरू अशी चिन्हे आढळली आहेत.

मुस्लिम पक्ष मशिदीतील कुंडाच्या मध्यभागी आढळलेला काळ्या रंगाचा दगड कारंजे असल्याचा; तर हिंदू पक्ष शिवलिंग असल्याचा दावा करत आहे. या अहवालानुसार, मुस्लिम पक्ष ज्याला कारंजे म्हणत आहे, त्यात पाईप घुसवण्याची जागाच नाही. मशिदीच्या मुख्य घुमटाखालील दक्षिणेतील खांबावर स्वस्तिकचे चिन्ह आढळले, तर मशिदीच्या पहिल्या द्वाराजवळ ३ डमरूंचे चिन्ह आढळले. वायव्य दिशेला १५ बाय १५ फुटांचे एक तळघर आढळले असून, त्यावर ढिगारा पडला होता. त्यातील दगडांवर मंदिरासारख्या कलाकृती दिसून आल्या आहेत. तळघरात विहीर असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. पाण्याने भरलेला ३ फूट खोल एक कुंडही आढळला. २.५ फूट उंच गोलाकार आकृतीच्या शिवलिंगासारख्या आकृतीच्यावर एक वेगळा पांढरा दगड ठेवण्यात आला आहे. बाहेर विराजमान नंदी व आत आढळलेल्या कुंडातील अंतर (ज्याच्या मध्यभागी एका बाजूला शिवलिंग स्थापन केले आहे असे मानले जाते) ८३ फूट ३ इंच आहे. तसेच मशिदीच्या आत हत्तीची सोंड, त्रिशूळ, कमळ, पान, घंट्या आढळल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी माजी वकील आयुक्त अजय मिश्रा यांनी वाराणसी न्यायालयात सर्व्हेचा अहवाल सादर केला. या अहवालात ज्ञानव्यापी परिसरात पश्चिमेकडे असेलल्या भिंतीवर प्राचीन मंदिरांचा मलबा सापडला असून, त्यात देवी-देवतांच्या मूती, कमळ, शेषनाग आणि प्राचीन मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
ज्ञानवापीप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू-मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाने या प्रकरणी कोणताही निर्णय देऊ नये, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी ३ वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.