ज्ञानवापी प्रकरण : हिंदू पक्षाची याचिका सुनावणीयोग्य

0
5

>> वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निकाल; पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार

ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने काल हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला. हिंदू पक्षाने दाखल केलेली याचिका सुनावणीयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या जागेवर असलेले मंदिर पाडल्यानंतर ही मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला होता. दुसर्‍या बाजूला मुस्लीम पक्षकारांनी हिंदू पक्षाची याचिका विचारात घेऊ नये, अशी मागणी केली होती; मात्र वाराणसी न्यायालयाने ती मागणी फेटाळली.

धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता. न्यायालयाच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काल वाराणसीत कलम १४४ लागू करण्यात आले. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कालच्या सुनावणीवेळी, हे प्रकरण सुनावणीस योग्य आहे, असे वाराणसी जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले. आता वाराणसीच्या ज्ञानवापी-श्रृंगार गौरी वादावर पुढील सुनावणी सुरू राहणार आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मुस्लिम पक्षाचे आक्षेप फेटाळून लावले. हा हिंदू समाजाचा विजय आहे. न्यायालयाचा हा निर्णय ज्ञानव्यापी मंदिरासाठी रचण्यात आलेला पाया आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली.

अंजुमन इंन्तेझामिआ मशीद समितीने ज्ञानव्यापी मशिदीची जागा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दावा करत हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तर या जागेवरील मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला होता. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने या मशिदीचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणादरम्यान या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. हा दावा मुस्लीम पक्षाने फेटाळून लावला आहे.