Home बातम्या ज्ञानमहर्षी

ज्ञानमहर्षी

0

– शंभू भाऊ बांदेकर

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. ते दलितांचे कैवारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार! त्यांचे हे दोन पैलू विशेषत्वाने चर्चिले गेले तरी एक विद्वान लेखक, पं. नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, तत्त्वज्ञ, विचारवंत, ज्ञानमहर्षी या त्यांच्या इतर पैलूंवर हवा तितका प्रकाश पडलेला नसला, तरी वेळोवेळी या पैलूंवरही अनेकांनी अनेकदा प्रकाशझोत टाकलेला आहे. येथे आपणास दलितोद्धाराचे क्रांतीसूर्य असलेले आणि देशाच्या घटनेचे शिल्पकार असलेले डॉ. आंबेडकर हे एक ज्ञानयोगी व ज्ञानमहर्षी कसे होते, हे जाणून घ्यायचे आहे.

जातिभेदांचा आणि धर्मभेदांचा धिक्कार करून मानवी समतेचा पुरस्कार करणार्‍या आणि विद्येचे, ज्ञानाचे महत्त्व जाणून दलितांना, स्त्रियांना, बहुजन समाजाला शिक्षणाभिमुख बनवू पाहणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना बाबासाहेबांनी गुरुस्थानी मानले होते. त्यांची विद्येचे महत्त्व सांगणारी जी मीमांसा आहे –

विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली॥

नीतीविना गती गेली| गतीविना वित्त गेले॥

वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले॥

याचे प्रत्यंतर आणून देण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्वत: विद्येची कास धरली. विद्या, स्वाभिमान आणि चारित्र्य या तीन गोष्टींना त्यांनी आपली उपास्य दैवते मानली. ही ती उपास्य दैवते बाबासाहेबांच्या जीवनाची अविभाज्य घटक बनली होती. त्यांनी आजन्म विद्येची कास धरली. उपासना केली. त्यांच्या जीवनात अनेक कटू तसेच मोहाचे प्रसंग आले. परंतु ते त्या सर्वांना पुरून उरले. त्यांनी कधी स्वाभिमान सोडला नाही. अत्यंत निष्कलंक चारित्र्य हे तर त्यांच्या जीवन चरित्राचे एक वैशिष्ट्य मानले जाते.

बाबासाहेबांना जशी तीन उपास्य दैवते होती, त्याचप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन गोष्टींचा मूलमंत्र त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. तसेच विषमता, अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींचे निर्मूलन या तीन गोष्टींची आवश्यकता त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे सदैव प्रतिपादन करणे हे आपले कर्तव्य मानले. वाचन व लेखन ही दोन्ही कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने सातत्याने केली. त्यांचा स्वत:चा असा पंचवीस हजारांचा ग्रंथसंग्रह होता. यावरून त्यांचे ग्रंथप्रेम लक्षात यावे. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही, अशी त्यांच्या मनाची पक्की खात्री होती. जगातील नामांकित लेखकांचे ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. एखाद्या लेखकाचा नवीन ग्रंथ प्रकाशित झाल्याचे कळले की मुंबई, पुणे, दिल्ली मधील ग्रंथालयांत जाऊन ते तो ग्रंथ खरेदी करीत. ग्रंथालयांत तासन्‌तास घालवून आपल्या आवडत्या पुस्तकांची खरेदी करूनच ते बाहेर पडत. त्यांनी इंग्रजीमधून अनेक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी सुमारे दहा ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले. त्यातील ‘हू वेअर द शूद्राज?’ आणि ‘बुद्ध ऍण्ड हिज धम्म’ हे दोन ग्रंथ तर जागतिक पातळीवर नावाजले गेले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेही (१९९१) त्यांच्या अनेक दुर्मीळ ग्रंथांचे प्रकाशन झाले.

इंग्रजीज्या मानाने बाबासाहेबांचे मराठी लेखन फार कमी आहे. त्यांचे मराठी लेखन विविध नियतकालिकांतून विखुरलेले आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मराठी भाषणांचे संग्रहही प्रसिद्ध झालेले आहेत. यावरून त्यांच्या विद्वत्तेचा आणि विद्याव्यासंगाचा प्रत्यय आपणास येतो व या ज्ञानयोगापुढे नकळत आपण नतमस्तक होतो. बाबासाहेबांचे इंग्रजी भाषेवर तर असामान्य असे प्रभुत्व होतेच. पण संस्कृत भाषेचाही त्यांनी चिकाटीने अभ्यास केला होता. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांनी मुळातून वाचून काढले होते. त्यामुळे हिंदूधर्म, त्यातील खरेपणा, फोलपणा, संस्कृत भाषेतील मौलिक साहित्य या विषयांवर ते हिंदूधर्ममार्तंडांशी व विद्वानांशी वास्तवतेचा आधार घेऊन चर्चा करीत. आपण अमुक एक विधान कशाच्या आधारावर करत आहोत, हे ते त्या ग्रंथाच्या नावासह सांगून सोदाहरण पटवून देत. त्यामुळे प्रकांडपंडितही त्यांच्याशी चर्चा करताना किंवा त्यांच्या ग्रंथातील उणिवा दाखवताना कचरत असत.

१९२४ साली बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ या संस्थेची स्थापना केली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे या संस्थेचे ब्रीद वाक्य होते. खरं तर, बाबासाहेबांचे जीवन व कार्य यांचेच ते सार होते. बाबासाहेबांनी जीवनभर शिक्षणाचा ध्यास घेतला. १९०७ साली मॅट्रिक व १९१३ साली ते कोलंबिया विद्यापीठात बी. ए. झाले. त्यांनी प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. सेलिगमन यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसाचे अठरा – अठरा तास अभ्यास केला. जेवढे जास्त ज्ञान मिळवता येईल, तेवढे ते मिळवीत गेले. जून १९१५ साली ‘प्राचीन भारतीय व्यापार’ या प्रबंधाने त्यांना एम. ए. ही पदवी मिळाली. मे १९१६ या वर्षी डॉ. गोल्डनबीझर यांच्या मानसशास्त्राच्या परिसंवादात त्यांनी ‘भारतातील जाती, त्यांची यंत्रणा, उत्पत्ती व वाढ’ या विषयावर निबंध वाचला व नंतर तो स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध झाला. बाबासाहेबांचे हे पहिले प्रकाशित पुस्तक. ते फारच गाजले. मग त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहायचे काम एक व्रत म्हणून पाळले, ते अखेरपर्यंत. १९१६ साली त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश मिळविला. आपले परदेशातील शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले आणि जुलै १९१७ साली बडोद्याच्या महाराजांनी त्यांना आपले लष्करी चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक केली. पण उच्चविद्याभूषित असूनही ते जातीने अस्पृश्य होते. त्यांची अवहेलना होत गेली.

आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी दलितोद्धाराच्या कामासाठी केला. पं. नेहरू तर त्यांना आपल्या मंत्रिमंडळांतील ते ‘हिरा’ आहेत, असे म्हणत. अशा या जगद्विख्यात ज्ञानमहर्षीस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र प्रणिपात.