जोवरी विश्व तोवरी रामायण…

0
5
  • संकलन ः विवेक लक्ष्मण जोशी

खडकी, पोस्ट ः वेळगे, वाळपई – गोवा

रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या रामकथेचे स्मरण केले पाहिजे. या कथेतील आदर्श डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम म्हणतात ते का ते समजावून घेतले पाहिजे. दशरथ, कौसल्या यांचे पुत्रप्रेम, श्रीरामाचा व्यक्तिजीवनाचा आदर्श, भरत-लक्ष्मणाचे बंधुप्रेम, सीतेचे पतिप्रेम, पतिनिष्ठा, शबरी, गूहक यांची रामभक्ती, हनुमानाची दास्यभक्ती, सेवा, समर्पण, रामपरायणता आणि श्रीरामासारखे मार्गदर्शक लाभल्यावर वानरांप्रमाणे सामान्य असणारेही कार्यकुशल होऊन महान कार्ये करू शकतात ही शिकवण. उपर्युक्त सर्व आदर्श आचरण्याचा थोडातरी प्रयत्न आजपासून सुरू करूया, तसा संकल्प करूया.

चैत्र शुद्ध नवमीला मध्यानरात्री प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. या मर्यादापुरुषोत्तमाची महती आदिकवी वाल्मिकी महानुनींनी ‘रामायण’ या महाकाव्यात वर्णिलेली आहे. या महाकाव्याचा नायक श्रीरामचंद्र हा मर्यादापुरुषोत्तम, त्याचा सेवक हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, रामाचे राज्य आदर्श रामराज्य. अशाप्रकारे श्रीरामकथा भारताच्या दशदिशांमध्ये हजारो वर्षे दुमदुमून राहिली आहे. भारतीय संस्कृती रामरसात सतत भिजत आलेली आहे.
रामकथा गाऊन आपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवी, लेखक आणि नाटककारांनी आपली प्रतिभा पणाला लावली. परिणामी, रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभार भारतीय साहित्यात डौलाने उभा आहे. रामकथा सांगणारे पुराणिक, गाणारे कीर्तनकार पिढ्यान्‌‍पिढ्या भारतीय जनमानसाची मशागत करीत आलेले आहेत. रामकथा भारतातील आणि आता विदेशातीलही भाषांत गाईली जात आहे.

‘मी ईश्वराला मानत नाही’ असे म्हणणारी माणसेही देशात रामराज्य असावे अशी अपेक्षा करतात, यातच श्रीरामाच्या आदर्श जीवनाचे यश दडलेले आहे. ‘मला वेळ नाही’ असे म्हणणारा भारतीय जिथे रामकथा चालते तिथे लाखोंच्या संख्येने एकत्र बसून रंगलेल्या रामकथेत रंगून जातो. भोगी माणसापासून तो संन्याशापर्यंत रोमारोमांत रमलेला राम चिंता व चिता यापासून कायमची मुक्ती देतो. जेव्हा धरतीवर अधर्म व अराजकता माजते, ‘मीच ईश्वर आहे’ अशी उन्मत्त भाषा काही माणसे करू लागतात व सज्जन माणसावर अन्याय होतो तेव्हा आकाशासम विशाल, आकाशरंगाचा प्रभू तप्त अवनीला आपल्या मधुर स्पर्शाने शांत करतो.
श्रीरामनाम, श्रीरामकथा व श्रीरामरक्षा या गोष्टी भारतीयांना प्राणप्रिय आहेत. दोन भारतीय एकमेकांशी बोलताना ‘राम राम’ असे परस्पर संबोधन करतात. ज्या रामकथेमुळे विश्वातील रामभक्तांना ब्रह्मानंद प्राप्त होतो, ती रामकथा महर्षी वाल्मिकींनी आम्हाला दिली.

प्रचेतस ऋषींचा मुलगा ‘रत्नाकर’ कुसंगतीने दरोडेखोर वाल्या झाला. देवर्षी वाल्याला म्हणाले, ‘तू जे पाप करतोस त्यात तुझ्या घरचे लोक सहभागी आहेत का?’ नारदांच्या या प्रश्नाने अंतर्मुख झालेला वाल्या घरी गेला व घरच्यांना त्याने विचारले, ‘आपण माझ्या पापात सहभागी आहात का?’ घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या नकाराने वाल्याला पश्चात्ताप होऊन तो नारदांचा शिष्य झाला व बारा वर्षांच्या रामनाम जपाने तोच वाल्या ‘महर्षी वाल्मिकी’ या योग्यतेला पोचला.
वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या घरच्या लोकांनी जर त्याच्या कुकर्माचे समर्थन केले नाही तर ती व्यक्ती सज्जन होऊ शकते, हे वाल्याच्या उदाहरणावरून आपल्याला समजते.

आद्य कवी वाल्मिकींनी नारदांच्या प्रेरणेने सप्तकांडांचे ‘रामायण’ लिहिले.

  1. बालकांड ः यात दशरथाचा स्वर्गात विजय, श्रावणवध, पुत्रकामेष्टी, दशरथास पुत्रप्राप्ती, त्राटिकावध, विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण, अहल्योद्धार, सीतास्वयंवर, परशुरामदर्शन व अयोध्येत आगमन हे विषय आहेत.
  2. अयोध्याकांड ः यात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांचे वनगमन, चित्रकुट पर्वतावर भरतभेट, पंचवटीत आगमन आदी विषय आहेत.
  3. अरण्यकांड ः यामध्ये शूर्पणखाविटंबन, स्वर-दूषण व मारिचवध, सीताहरण, जटायू व शबरी यांचा उद्धार हे विषय आहेत.
  4. किष्किंधाकांड ः यात हनुमान-श्रीराम भेट, सुग्रीव मैत्री, वालीवध व हनुमंताचे समुद्रउल्लंघन या विषयांचे वर्णन आहे.
  5. सुंदराकांड ः यात लंकादहन, विभीषण शरणागती, सेतुबंधन, श्रीरामाचे ससैन्य लंकागमन हे विषय असून हे कांड ‘मारुती’प्रधान आहे.
  6. युद्धकांड ः रावण गर्वपरिहार हा प्रधान विषय असलेल्या या कांडात अंगद शिष्टाई, धुम्राक्ष, कुंभकर्ण, इंद्रजीतवध, लक्ष्मणशक्ती, अही-मही व रावणवध, सीताशुद्धी, रामेश्वर स्थापना, अयोध्येत आगमन, रामराज्यारोहण, सर्वांचा सन्मान, हनुमंताचे छाती फाडून श्रीराम-सीतादर्शन या विषयांचे वर्णन आहे.
  7. उत्तरकांड ः हे सीताप्रधान आहे. यात सीतात्याग, लव-कुशजन्म, अश्वमेधयज्ञ , सीतामाईचे भूमीत अदृश्य होणे, लक्ष्मणाचे पाताळगमन, श्रीरामाचे निजधामगमन हे विषय आहेत.

या सर्व रामकथेतून प्रभू रामाचे मर्यादापुरुषोत्तमत्व प्रकर्षाने जाणवते. रघुकुलाचे सत्यप्रतिज्ञपण, प्रामाणिकपणा, वचनपूर्ती व कर्तव्य पालनासाठी सर्वस्व त्यागाची तयारी हे गुण दिसून येतात.
वैवस्वत मनूतील इश्वाकूचा वंशज सगर, त्यानंतर अंशुमान, दिलीप, भगीरथ, अंबरीश, रघू, नंतर अज, दशरथ व दशरथाचे पुत्र म्हणजेच रामायणाचे नायक प्रभू श्रीराम. श्रीरामाच्या वंशाला ‘रघुवंश’ म्हणायचे कारण म्हणजे, या रघुराजाने विश्वजीतयज्ञ केला व वरतंतू ऋषीचा शिष्य कौत्स दान मागण्यासाठी आला असता त्याला दान द्यायचे कबूल केल्याने व आपला शब्द पाळण्यासाठी त्याने कुबेरावर स्वारी करायचे ठरविले. कुबेराला हे समजताच त्याने शमी वृक्षावर सुवर्णमोहोरांचा पाऊस पाडला व ‘रघुकुलरिती यही चली आयी, प्राण जाय पर वचन न जाई’ ही उक्ती निर्माण झाली. त्यामुळे रामाच्या कुळाला ‘रघुकुल’ नाव पडले व या रघुकुलाला आपल्या चारित्र्याने, पराक्रमाने, कर्तृत्वाने, धर्मपरायणतेने गौरवाचित करणाऱ्या रामप्रभूंना रघुपती, राघव, रघुनाथ ही संबोधने प्राप्त झाली.
प्रभू रामाचे कार्य, कर्तृत्व व पुरुषोत्तमत्वाचा विचार केल्यास, त्यावर चिंतन-मनन केल्यास त्रेता, द्वापर व आज कलियुगातही प्रभू रामचंद्राचे चरित्र किती बोधप्रद, अनुकरणीय, अनुसरणीय व आदर्श आहे याची प्रचिती येते. रामायणातील बालकांडाच्या सुरुवातीलाच तो प्रसंग वर्णिलेला आहे.
एके दिवशी महर्षी वाल्मिकी आपल्या शिष्य-परिवाराला भक्तीचा महिमा सांगत होते. त्याचवेळी भगवंताच्या लिलांचे, गुणांचे व नामाचे संकीर्तन करणारे देवर्षी नारदमुनी वाल्मिकींच्या आश्रमी आले. रीतीनुसार देवर्षींचे स्वागत झाले. वाल्मिकी ऋषींनी नारदांना उच्चासन दिले आणि मधुर वाणीने त्यांचे कुशल विचारत त्यांचे पादप्रक्षालन केले.

त्यावेळी वाल्मिकींनी नारदांकडे पृच्छा केली, ‘हे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानशिरोमणी, मला सांगा की सध्या भूतलावर सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण, सर्वात पूर्णत्व पावलेला, विद्वान, सामर्थ्यवान, उदार, सत्यवचनी आणि कृतज्ञ असा कोण आहे? कोणाचे चारित्र्य निष्कलंक आहे आणि जिवांच्या खऱ्या कल्याणाची काळजी करण्यात कोण सतत गुंतलेला असतो? कोण असा असामान्य, चतुर आणि सर्वांगसुंदर महापुरुष आहे जो राग आणि दुष्टप्रवृत्तींच्या पलीकडे असूनही मोठमोठ्या देवतांना आपल्या क्रोधाने भयाकूल करू शकतो? कुणात बरे त्रैलोक्यातील सर्व जिवांना संरक्षण देण्याचे सामर्थ्य आहे? भाग्यदेवतेने कुणावर बरे आशीर्वादाचा वर्षाव केला आहे? हे महामुने, आपण कृपया पूर्णपणे माझ्या शंकांचे निरसन करावे.’

त्यावर देवर्षी नारद म्हणाले, ‘ऋषिवर्य, राम नावाचा एक कीर्तिमान राजा इश्वाकूच्या राजघराण्यात महाराज दशरथाचा सुपुत्र म्हणून अवतरला आहे. त्याच्यात सर्व दिव्य गुण आणि सर्व ऐश्वर्ये एकवटलेली आहेत. श्रीराम हे जितेंद्रिय असून अगणित शक्तींचे स्वामी आहेत. ते अजानबाहू आहेत. त्यांचे खांदे उंच व भरदार आहेत, छाती रुंद आहे, ललाट भव्य आहे व मस्तक सुंदर आहे. त्यांचे नेत्र विशाल आहेत. सर्व अवयव सुबक व संतुलित आहेत. किंचित हिरव्या रंगाची झाक असलेली त्यांची गडद निळी अंगकांती दीप्तिमान आहे. अगाध बुद्धिमत्ता आणि धीरगंभीर वर्तणुकीचे प्रभू राम संभाषणात निपुण व रसाळ वाणीने अलंकृत आहेत.
प्रभू रामाचे चरित्र परमपवित्र असून ते खऱ्या धर्मतत्त्वांचे अनुयायी आहेत. पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी असणारे राम वर्णाश्रमधर्माचे रक्षणकर्ते आहेत. खरोखर तेच संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. ते सर्व शत्रूंचे संहारक आहेत व त्याचवेळी ‘शरणागतवत्सल’ अर्थात त्यांना पूर्णपणे शरण आलेल्या जिवांचे ते एकमेव आश्रयदातेही आहेत. ते वेदशास्त्रांचे परम ज्ञाते आहेत. ते सर्वप्रकारची शस्त्रे चालवण्यातही निपुण आहेत. त्यांच्याकडे अढळ निर्धारशक्ती आहे आणि अचूक स्मरणशक्तीबरोबर प्रखर बुद्धिमत्तेचे ते स्वामी आहेत. खरोखर, त्यांची विद्वत्ता असीम आहे. ते अतिशय समंजस, दयाळू आणि रणांगणात वीरश्री गाजविणारे आहेत. सर्व प्राणिमात्रांचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि शत्रू असो वा मित्र सर्वांशी ते समभावाने वागतात. ते महासागरासारखे गंभीर आहेत.

त्यांचे धैर्य हिमालयासारखे आहे. सामर्थ्यात ते जणू भगवान विष्णूच आहेत. चंद्रासारखे सुंदर आहेत. वसुंधरेसारखी सहनशीलता त्यांच्याठायी असून विश्वसंहारसमयी धगधगणाऱ्या प्रलयाग्नीसारखा त्यांचा क्रोध आहे. ऐश्वर्यात ते कुबेरासमान व भक्तीत ते सदाचाराची देवता धर्मराजासमान आहेत.’
या देवर्षींनी सांगितलेल्या गुणांचा समुच्चय म्हणजे राम. म्हणून म्हणतात, ‘सौंदर्यैवा गुर्णैवा रघुपतिसदृशो नास्ति देवो द्वितियः।’
या रामांनी सर्व धर्म प्रतिष्ठित केले. धर्म म्हणजे कर्तव्य. म्हणून म्हणतात, ‘रामो विग्रहवान धर्मः।’ आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा म्हणून प्रभू रामचंद्राचेच नाव घेतले जाते. आत्यंतिक निस्वार्थीपणा, मनःसंयम, न्यायनिष्ठुरता, सचोटी आणि सत्यता यांचा मूर्तिमंत अवतार म्हणजे राम.
सीताराम आणि राजाराम यांचे द्वंद्व होईल त्यावेळी राजारामच जिंकला पाहिजे. व्यापक हितासाठी कौटुंबिक, वैयक्तिक सुखाचा विचार गौण ठरतो हे रामानी आपल्या वर्तनातून दाखवून दिलेले आहे.

प्रभू रामाच्या चरित्राने आणि चारित्र्याने भारताचे जनमानस कायमच प्रभावीत केले आहे. आणि म्हणून कविश्रेष्ठ रवींद्रनाथ म्हणतात की, रामायण ही खरोखरच भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी आहे आणि तिच्या पुण्यसलिलाने त्याच्या मनोभूमीची मशागत शतकानुशतके अखंड होत राहिली आहे.
रामायणातील राजधर्म, यतिधर्म, कुलधर्म आणि या सर्वांचे परस्पर संबंध नियत करणारे सर्व हृदयधर्म केळीच्या कोंभाप्रमाणे आसेतुहिमाचल सर्व भाषांतून, सर्व प्रदेशांतून मोठ्या कोडकौतुकाने जोपासले जातात.

प्रतीकात्मक चिंतनातून राम, लक्ष्मण, शत्रुघ्न व भरत हे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थांचे प्रतीक आहेत. प्रपंच व परमार्थ सांग व चांग होण्यासाठी अर्थ, काम हवेत. पण ते धर्माधिष्ठित हवेत, तरच त्यातून प्रापंचिक अडचणींतून मुक्ती व अंती मोक्ष लाभू शकतो. पण त्यासाठी आपण ‘दशरथ’ असले पाहिजे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये या दहांना जो आपल्या मनाने नियंत्रित करतो, आपल्या संकल्प-विकल्पात्मक मनाला जो निश्चयात्मिका बुद्धीने जिंकतो, त्याच्याच जीवनात रामाचा प्रवेश होतो व तोच मोक्षाचा अधिकारी होतो.

रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या रामकथेचे स्मरण केले पाहिजे. या कथेतील आदर्श डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम म्हणतात ते का ते समजावून घेतले पाहिजे. दशरथ, कौसल्या यांचे पुत्रप्रेम, श्रीरामाचा व्यक्तिजीवनाचा आदर्श, भरत-लक्ष्मणाचे बंधुप्रेम, सीतेचे पतिप्रेम, पतिनिष्ठा, शबरी, गूहक यांची रामभक्ती, हनुमानाची दास्यभक्ती, सेवा, समर्पण, रामपरायणता आणि श्रीरामासारखे मार्गदर्शक लाभल्यावर वानरांप्रमाणे सामान्य असणारेही कार्यकुशल होऊन महान कार्ये करू शकतात ही शिकवण. उपर्युक्त सर्व आदर्श आचरण्याचा थोडातरी प्रयत्न आजपासून सुरू करूया, तसा संकल्प करूया.
श्रीरामभक्ताचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, संत तुलसीदास, संत रामदास, संत कबीर यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून खरेखुरे रामभक्त होऊया. रामनाम, रामरक्षा पठण, रामकथा श्रवण व या सर्वांच्या चिंतन-मननाने आपण निश्चितच ‘पुरुषोत्तम’ होऊ शकतो यात तीळमात्र शंका नाही.