10 नोव्हेंबरपर्यंत शरण येण्याचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कुविख्यात गुंड जेनिटो कार्दोज याला दणका काल दिला. वर्ष 2009 मधील एका टोळीयुद्धात झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणात जेनिटो कार्दोज याची 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवली आहे. गोवा खंडपीठाने जेनिटो कार्दोज याचे अपील फेटाळून लावले आहे. येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे निर्देश दिला आहे.
शिरदोण येथे समुद्र किनाऱ्यावर मे 2009 मध्ये झालेल्या टोळीयुद्धात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने जेनिटो कार्दोज आणि अन्य दोघांना 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात जेनिटो कार्दोज याने अपील केले होते. सध्या जेनिटो हा रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.
जेनिटो याच्या टोळीतील महावीर नाडर, डोम्निक नाझारेथ, सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांचा प्रतिस्पर्धी मिरांडा टोळीशी वाद उफाळून आला होता. दोन्ही टोळीतील गुंडांनी एका शॅकजवळ परस्परांवर काचेच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केला. या टोळीयुद्धात दुसऱ्या टोळीतील संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांडा या दोघांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात जेनिटो कार्दोज तसेच इतरांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली जेनिटो व इतर दोघांना दोषी ठरवले आणि तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावली होती.
न्यायालयीन कोठडीत वाढ
येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज आणि इतर सात संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 9 दिवसांची वाढ केली आहे. या हल्ला प्रकरणात जेनिटो याने येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयाने या हल्ल्यात जखमी झालेल्या रामा काणकोणकर याला हल्ला प्रकरणाच्या खटल्यासाठी वकील नियुक्तीबाबत विचारणा करणारी नोटीस जारी केली आहे.

