बांधकाम पाडण्याची विरोधकांची जोरदार मागणी
सभापतींकडून काही काळ कामकाज तहकूब
जुने गोवे येथील जागतिक वारसा स्थळापासून 100 मीटर अंतरात जो बेकायदेशीर बंगला उभारण्यात आलेला आहे तो पाडण्यात यावा, अशी जोरदार मागणी काल विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोवा विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासाला सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार रूडाल्फ फर्नांडिस यांनी जुने गोवे येथील जागतिक वारसा स्थळासंबंधी विचारलेल्या प्रश्नाच्यावेळी विरोधकांनी वरील बेकायदेशीर बंगल्याचा प्रश्न उपस्थित करीत सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत सदर ‘बंगला पाडा’ अशा घोषणा देत गोंधळ घातला. यावेळी सभापती तवडकर यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधक ऐकत नसल्याचे पाहून तवडकर यांनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
तत्पूर्वी रूडाल्फ फर्नांडिस यांनी जुने गोवे येथील जागतिक वारसा स्थळासंबंधीचा प्रश्न उपस्थित करताना या स्थळासाठी एक ‘मास्टर प्लॅन’ तयार केला जावा, अशी मागणी पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली. तेथे रोज 10 हजार पर्यटक व भाविक येत असतात असे सांगून या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी पावले उचलताना त्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार केला जावा व त्यासाठी स्थानिक पंचायत, चर्च व्यवस्थापन, स्थानिक लोक व अन्यांना विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी फर्नांडिस यांनी यावेळी केली. जुने गोवेला मोठ्या संख्येने येणारे लोक लक्षात घेऊन तेथे एका रुग्णवाहिकेची सोय करावी. तसेच तेथील भव्यदिव्य अशा चर्च परिसरात क्रेनची गरज भासत असून ती देण्याचीही सोय करावी, अशी मागणीही फर्नांडिस यांनी केली. जुने गोवे येथील चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी ‘ड्रेस कोड’ ठरवावा. तोकडे कपडे घालून काही पर्यटक चर्चमध्ये प्रवेश करीत असल्याचे ते म्हणाले.
कामकाज तहकूब
यावेळी फळदेसाई यांनी सगळ्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देताना मास्टर प्लॅनची जबाबदारी मात्र नगरनियोजन खात्याची असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी विरोधी आमदार युरी आलेमाव यांनी जुने गोवे येथील बेकायदेशीर बंगल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी यांच्यात वरील प्रश्नांवरून शाब्दीक चकमक झडली. यावेळी युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई तसेच वीरेश बोरकर यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत ‘बंगला पाडा’ अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधी आमदार ऐकत नसल्याचे पाहून सभापतीनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. तद्नंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले असता सर्व विरोधी आमदार ‘बेकायदा बंगला पाडा’ असा इंग्रजीमधून लिहिलेले कागदी फलक हातात घेऊन सभागृहात आले व ते उंचावून सभापतींना दाखवत पुन्हा बंगला पाडा, अशा घोषणा दिल्या. मात्र, नंतर ते शांत झाल्यानंतर शून्य तासाचे काम सुरू करण्यात आले.

