जुना बोरी पूल उद्यापासून अवजड वाहतुकीसाठी बंद

0
2

दुरूस्तीसाठी ऑक्टोबरमध्ये दर शनिवार, रविवारी बंद

फोंडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना बोरी पुल दुरुस्तीच्या कामासाठी ऑक्टोबर महिन्यातील दर शनिवार-रविवारी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी टप्पा टप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, येत्या 11 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 असे 23 दिवस पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभाग 15 च्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंबंधीची सूचना जारी केली आहे. जुन्या बोरी पुलाची दुरवस्था झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलावर सर्वत्र खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने जुन्या बोरी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुलावरील जुने स्टील, बॅरींग आदी बदलले जाणार आहे. बोरी पुलाची दुरूस्तीला गती देण्यासाठी पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी 23 दिवस बंद ठेवला जाणार आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्यात दर शनिवार-रविवारी पुल सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने पूल बंदबाबत माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या उद्या 11 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत असा सुमारे 12 तास पूल बंद ठेवला जाणार आहे.
शनिवार 18 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत असा सुमारे 8 तास बंद ठेवला जाणार आहे.

शनिवार 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 असा 12 तास बंद ठेवला जाणार आहे.
शनिवार 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 असा 8 तास बंद ठेवला जाणार आहे.
तसेच, 11 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पूल बंदीच्या काळात अवजड वाहनांची पर्यायी मार्गाने वाहतूक केली जाणार आहे.
पुलाच्या दुरुस्तीनंतर डांबरीकरणासाठी पुन्हा बंद ठेवला जाणार आहे. त्याबाबतच्या तारखा आणि वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे, असेही सूचनेत म्हटले आहे.