>> चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचे मोठे विधान
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची झलक देखील जगाला पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी देशाच्या शस्त्रास्त्र सज्जतेबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. बुधवारी सीडीएस अनिल चव्हाण यांनी भारताच्या संरक्षण क्षमतांचे तातडीने आधुनिकीकरण करण्याची गरज बोलून दाखवली. कालच्या शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही. आजचे युद्ध उद्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने लढले पाहिजे, जुन्या प्रणालींनी नाही, असे अनिल चौहान म्हणाले. विदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध तयारी कमकुवत होते, असेही त्यांनी नमूद केले.
अनमॅनड एरियल व्हेईकल (यूएव्ही) आणि काउंटर-अनमॅनेड एरियल सिस्टीम्स (सी-यूएएस) इंडिजनायजेशनवरील नवी दिल्ली येथे आयोजित प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आधुनिक युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आपण आजचे युद्ध कालच्या शस्त्र प्रणालींने जिंकू शकत नाहीत. तसेच भारताने अत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक मोहिमांसाठी परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबत्व कमी करण्याची आवश्यकता आहे. आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे आपल्या सज्जतेला कमकुवत करते, असेही चौहान म्हणाले.
मे महिन्यात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना अनिल चौहान म्हणाले की, पाकिस्तानने अनआर्म्ड आणि दारुगोळा असलेले ड्रोन सीमेपलीकडून सोडले, त्यापैकी बहुतांश हे कायनेटीक आणि नॉन-कायनेटिक मार्गांनी निष्क्रिय करण्यात आले. यापैकी कोणत्याही अनमॅनड एरियल व्हेईकल भारतीय लष्कर किंवा नागरी इमारतींना कसलेही नुकसान पोहचवू शकले नाही.
सीडीएस चौहान यांनी यावेळी भविष्यातील हवाई मार्गाने येणाऱ्या धोक्यांना प्रभावीपणे निष्प्रभ करण्यासाठी कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक प्रतिकारात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी त्यांनी ड्रोन आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट केले.
स्वदेशी ड्रोनविरोधी प्रणाली गरजेची
ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवून दिले आहे की आपल्यासाठी स्वदेशी सी-यूएएस (काउंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) म्हणजेच ड्रोनविरोधी प्रणाली असणे का महत्त्वाचे आहे. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करावी लागेल, असे अनिल चौहान म्हणाले.

