जीसीईटी परीक्षा अर्ज सादरीकरणाबाबत संभ्रम

0
121

कोरोनासंदर्भात सध्या जगभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असली तरी बारावीनंतर अभियांत्रिकी, फार्मसी आदी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या गोवा कॉमन एंटरन्स टेस्ट किंवा जीसीईटी प्रवेश परीक्षांसाठी येत्या २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान पर्वरी व मडगाव येथे अर्ज भरण्याच्या नियोजित कार्यक्रमात बदल करण्याची सुबुद्धी अद्याप तरी राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण मंडळाला झालेली नाही. हजारो विद्यार्थी आणि पालक या काळात जीसीईटीचे अर्ज भरण्यासाठी पर्वरी आणि मडगाव येथे दरवर्षी रांगा लावत असतात. यंदा कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने पालकांमध्ये ही प्रक्रिया तंत्रशिक्षण मंडळाने ऑनलाइन करावी अशी मागणी सातत्याने होत आहे, मात्र मंडळाने अद्यापही यासंदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही वा अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकललेल्या नाहीत.

यासंदर्भात तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विवेक कामत यांच्याशी संपर्क साधला असता, मंडळाने यासंदर्भात अद्याप काही विचार केलेला नसल्याचे उत्तर मिळाले. मंडळातर्फे जीसीईटी प्रवेशासंदर्भात जी अधिसूचना काढण्यात आली आहे तीच अजून कायम आहे असे ते पुढे म्हणाले. तेथे विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही काय? असे विचारले असता ‘होऊ शकते’ असे ते उत्तरले. ही प्रक्रिया सद्यपरिस्थितीत लांबणीवर टाकली जाऊ शकत नाही का असे विचारले असता जर मंडळाला काही निर्णय घ्यावासा वाटला तर तो २६ पूर्वी घेतला जाईल असे ते पुढे म्हणाले.

कोरोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वत्र खबरदारीचे उपाय योजिले जात असताना गोवा तंत्रशिक्षण मंडळ मात्र अजूनही यासंदर्भात सुस्तच असल्याचे पाहायला मिळत आहे.