जीवन ही एक कला

0
9
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- 657, अंतरंगयोग- 243

पूर्वकर्माप्रमाणे त्याचे स्थान ठरलेले असते. त्याला मिळालेल्या योग्य ज्ञानाचा उपयोग करून तो आत्मा संस्कारी झाला तर त्याचा जीवनविकास होईल, अन्यथा नाही. म्हणून प्रत्येकाने सत्कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण विश्वात चौफेर नजर फिरवली तर लगेच लक्षात येते की, बदल हा प्रत्येकाचा स्थायी स्वभाव आहे- मग त्याचे स्वरूप कसेही असू दे- जिवंत प्राणी, पशू, पक्षी, जीवजंतू, कृमी-कीटक, निसर्ग, ऋतू… आणि खरे म्हणजे या बदलातच जीवनाची खरी मजा आहे. आपण अनेकवेळा म्हणतोच की- ‘बदल हा निसर्गाचा नियम आहे!’
पण हल्लीच्या तथाकथित प्रागतिक, भौतिक जीवनाचा बारकाईने अभ्यास केला, त्यावर थोडे चिंतन केले तर लगेच आपल्या लक्षात येईल की, हल्ली मानवी जीवनाचे संस्कार, जीवनपद्धती अत्यंत जलदगतीने बदलत आहे. हे बदल चांगले असतात तेव्हा जीवनावर परिणाम होत नाही. पण विरुद्ध दिशेने, नकारात्मक होतात तेव्हा प्रत्येकाला चिंता वाटते.

भारतात पन्नास-साठ वर्षांपूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. तीन-तीन पिढ्यांतील व्यक्ती एकत्र राहत असत. मुख्य म्हणजे, संस्कार चांगले व्हावेत व कुटुंबातली मुले आदर्श व्हावीत म्हणून सर्व प्रयत्नशील असत. तो काळ आदेशावर आधारित होता. घरातील एक प्रमुख व्यक्ती आदेश द्यायची व त्याप्रमाणे पालन व्हायचे. कुणीही उलट प्रश्न विचारीत नसत. आता ही पद्धत चांगली होती की नाही हा संशोधनाचा विषय. पण घरात एकोपा होता. सर्वजण एकत्र येऊन विविध कामे करत असत. अवश्य अपवाद असतील. परंतु घरात शांती नांदत असे.

तद्नंतरच्या काळात बदल आला. हा काळ विचार-विमर्शावर आधारित होऊ लागला. मुले प्रश्न विचारू लागली- असे का? असे का नाही? अन्‌‍ यात वाईट काही नाही. कारण तरुणांना काही गोष्टी समजल्या नाहीत, काही निर्णय पटले नाहीत तरी ते वडीलधाऱ्यांचे ऐकायचे. ते म्हणत असत- आपण सांगता तसे आम्ही वागू! यात थोडे असमाधान असले तरी गोष्टी निभावल्या जात असत.
त्यानंतर काळ सुरू झाला तो चर्चा करण्याचा. प्रत्येक गोष्टीला प्रमाण मागण्याचा. आता प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणे शक्य होणारच असे नाही. उदा. भगवंताला नमस्कार का? भगवंत म्हणजे कोण? तो आहे कुठे? तो काय करतो? आमच्यासाठी त्याचे महत्त्व काय? देव आहे तर विश्वाची अशी स्थिती का? एवढे दुःख का? एवढी गरिबी का? असे विविध प्रश्न…
तसे पाहिले तर मुलांची ही वृत्ती जिज्ञासू असते. ही गोष्ट तशी चांगलीच आहे. प्रत्येक क्षेत्र अशा वृत्तीमुळेच प्रगतिपथावर पोचते. मग ते क्षेत्र विज्ञान असो अथवा अध्यात्म असो.

येथे मूळ प्रश्न आहे तो विचारणाऱ्या व्यक्तीच्या वृत्तीचा. जर हा प्रश्न उद्धटपणाने विचारला असेल तर ती वृत्ती भूषणावह नाही. दुसऱ्याच्या मताला किंमत देऊन जर अभ्यासू वृत्ती बाळगली तर ते चांगलेच आहे, अन्यथा वैयक्तिक नात्याला मारक आहे.
विविध क्षेत्रांमध्ये अशा चर्चा, वादविवाद चालतात. पण तारतम्य ठेवले नाही तर मतभेद वाढतात. भांडणे होतात. असे घडणे कुठल्याही शास्त्राच्या दृष्टीने बरे नाही. शेवटी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण एक गोष्ट खरी की, मत मांडणाऱ्याला ज्ञान हवे, विषयाचा अभ्यास हवा. अज्ञान नको, विपरीत ज्ञान तर नकोच नको.

आजची पिढी जिज्ञासू वृत्तीची आहे. वडीलधाऱ्या मंडळीनी यासंदर्भात त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. केव्हा केव्हा तरुण व्यक्ती असे प्रश्न विचारते की वडीलधाऱ्यांना त्याबद्दल ज्ञान नसते. अशावेळी स्वतःचे अज्ञान मान्य करणे चांगले. काही झाले तरी चुकीचे उत्तर दिले जाऊ नये.
अनेकवेळा असे निदर्शनास येते की, तरुण व्यक्तीला देवाला नमस्कार करून त्याचे आशीर्वाद मिळावे म्हणून प्रार्थना करायला सांगतात. मग काही तरुण विचारतात की मी नमस्कार केला नाही तर देव मला आशीर्वाद देणार नाही का? अशावेळी काही व्यक्ती निरुत्तर होतात. तेव्हा यांना वाटते की आपल्याला मोठ्यांपेक्षा जास्त अक्कल आहे.

हल्ली काहीवेळा तर वेगळेच दृश्य दिसते. ते म्हणजे, सरळ नकारात्मक उत्तर. अशावेळी मोठ्या व्यक्तींनी शांत राहायला हवे. त्यावेळी तो विषय तिथेच बंद करावा म्हणजे वातावरण बिघडणार नाही. तद्नंतर योग्यवेळी त्या विषयावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विवेचन करावे म्हणजे कलह टळता येईल.
आजच्या जमान्यात दोन्ही तऱ्हेची दृश्ये दृष्टिक्षेपात येतात- आज्ञाधारक मुले व बंडखोर मुले. याचे मुख्य कारण म्हणजे संस्कार. हे संस्कार विविध आहेत-

  • मागच्या अनेक जन्मांचे संस्कार.
  • आईवडील व कुटुंबातील इतर व्यक्तींचे संस्कार.
  • समाजाकडून मिळणारे संस्कार- शाळा, कॉलेज, कार्यस्थळ, शेजारी, मित्रमैत्रिणी.
    त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण संस्कार आहेत.

आत्म्याचे मूळ संस्कार ः आपण मानतो की आत्मा परमात्म्याचे अपत्य आहे. म्हणून तर आपण ‘त्वमेव माता- पिता त्वमेव’ अशी प्रार्थना म्हणतो. त्यामुळे परमात्म्याचे संस्कार तेच आत्म्याचेदेखील आहेत. आत्मा पवित्र आहे व त्याचे सप्तसंस्कार आहेत.

  1. ज्ञानस्वरूप, 2. सत्यस्वरूप, 3. प्रेमस्वरूप, 4. शांतीस्वरूप, 5. सुखस्वरूप, 6. आनंदस्वरूप, 7. शक्तीस्वरूप.
    पण आत्म्यावर वरील विविध सुसंस्कार व कुसंस्कार होतात. एक तर तो संस्कारी होतो अथवा संस्कारहीन. मूल कुठल्या वातावरणात वाढते यावर ते संस्कार ठरतात. म्हणून पालक, कुटुंबीय, समाज, शैक्षणिक संस्था यांनी यासंदर्भात अत्यंत दक्षता घ्यायला हवी.
    मुले आनंदी उपजली तर घरच्या लोकांना त्यांचा अभिमान वाटतो, त्यांची छाती इंचभर पुढे येते. नाहीतर त्यांची मान खाली जाते. पूर्वीच्या समाजात या विषयाला फार महत्त्व दिले जात असे. त्याचे एक कारण म्हणजे, सर्वांचे शिक्षण ऋषीच्या आश्रमात होत असे- ब्रह्मचर्याश्रमात. तिथे त्यांना सर्व तऱ्हेचे योग्य नैतिक शिक्षण मिळत असे. साधारण समाजापासून हे आश्रम दूर वनात असत.

आजच्या शिक्षणपद्धतीतदेखील नैतिक शिक्षणाचा एक विषय आहे. पण हे शिक्षण बहुतेकवेळा सैद्धांतिकच दिसते. प्रत्यक्ष परिणाम हवा तेवढा दिसत नाही. अपवाद जरूर आहेत. अनेक शैक्षणिक संस्था व आध्यात्मिक संस्था असे ज्ञान जरूर देतात. पण त्यांची संख्या अगदी नगण्य आहे.
शास्त्रशुद्ध योगसाधनेमध्ये याला उत्कृष्ट उपाय आहे- चारही योगमार्गांचा- ज्ञान, भक्ती, कर्म, राजयोग. तसेच अष्टांगयोगातील- यम, नियम, प्रत्याहार, ध्यान यांचा योग्य अभ्यास व पालन. हल्ली जे योगवर्ग चालले आहेत ते बहुतेक हठयोगाचे आहेत. त्यांत मानवाच्या सर्व पैलूंतील जीवनविकासाला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे काही व्याधी आटोक्यात आणण्यासाठी हे वर्ग चांगले आहेत, पण आपण जो विचार करतो त्यासाठी अशा ज्ञानाचा फार फायदा नाही. येथे आध्यात्मिक पैलूंवर भर द्यायला हवा.

उदाहरणार्थ- आत्मा हा शुद्ध, पवित्र असतो. कारण तो भगवंताचा अंश आहे. पण विश्वातील विपरीत परिस्थितीमुळे तो बिघडतो. जसे पावसाचे ढगांतून निघालेले पाणी साफ असते, पण वातावरण प्रदूषित असल्यामुळे ते खराब होते, तसेच ते थेंब कुठे पडणार तेदेखील महत्त्वाचे ठरते- विहिरीत, नदीत, समुद्रात की डबक्यात? त्या पाण्याला ठरवता येत नाही की आपण कुठे पडायचे ते!
तसेच आत्म्याचेदेखील आहे. पूर्वकर्माप्रमाणे त्याचे स्थान ठरलेले असते. त्याला मिळालेल्या योग्य ज्ञानाचा उपयोग करून तो आत्मा संस्कारी झाला तर त्याचा जीवनविकास होईल, अन्यथा नाही. म्हणून प्रत्येकाने सत्कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी जीवन ही एक कलाच आहे…