- – डॉ. सीताकांत घाणेकर
योगसाधना- ५६१, अंतरंगयोग-१४६
चौफेर नजर फिरवली तर एक दुःखदायक दृश्य नजरेत येते. ते म्हणजे, अनेकांच्या जीवनात गोडवा नाही. त्यांतील अनेकजण असे आहेत की त्यांच्याकडे सर्वकाही आहे पण जीवनात अनेक कारणांमुळे गोडवा नाही. मग अशा जीवनाला अर्थ काय?
मानवी जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी विविधता आवश्यक असते, मग ती कुठल्याही संदर्भात असो! आपले कपडे, आपले भोजन, दरदिवसाचे वेळापत्रक, प्रत्येक महिन्यातील कार्यक्रम वगैरे…
आपल्याला कपडे वेगवेगळ्या रंगाचे लागतात. भोजनात विविध पदार्थ असतात- चवदेखील वेगळी हवी- गोड, तिखट, आंबट वगैरे… प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमामध्ये थोडा बदल केला तर बरे वाटते. दर महिन्याला विविध कार्यक्रम, उत्सव असतात; तशीच माणसेही नवनवीन भेटली की आपल्याला आनंद होतो. दूरदर्शन किंवा रेडिओवरच्या कार्यक्रमांमध्येही विविधता असली तर चांगली करमणूक होते. उदा. नाटक, सिनेमा, बातम्या, सांस्कृृतिक कार्यक्रम, गाणे, नाच, स्पर्धा वगैरे… या वेगळेपणामुळेच जीवनाला पुष्टी येते.
निसर्गात तर क्षणाक्षणाला विविधतेचाच अनुभव येतो. दिवस-रात्र; उजेड-काळोख; अनेक ऋतू- उन्हाळा, पावसाळा, हिवाळा; वृक्ष-वनस्पती, पशुपक्षी, फुले-फळे… आणि मानव? विविध वंश, रंग, वर्ण, भाषा, धर्म… या सर्वांमुळे निसर्गाला एक वेगळा रंग येतो.
संगीतातदेखील विविध राग, ताल, सूर, लय, स्वर… आणि भारतात तर देवी-देवता अनेक… प्रत्येकाचे क्षेत्र, कार्य, रूप वेगळे.
हे सर्व आवश्यकच आहे; नाहीतर एकसारखेपणा असला तर जीवन कंटाळवाणे होईल. त्यातच भर म्हणून विविध मानसिक अवस्था- सुखदुःख, शांती, आनंद, समाधान, प्रेम, राग-द्वेष, मद, मत्सर, लोभ, मोह वगैरे….
थोडा विचार केला तर लक्षात येईल की अशी रचना करण्यामागे सृष्टिकर्त्याचा काहीतरी चांगला हेतू असेल. त्यासंदर्भात विचार, अभ्यास, चिंतन करणे आवश्यक आहे.
हे सगळे बघण्याचे कारण म्हणजे आपला मूळ विषय- पंचामृत- दूध, दही, तूप, मध, साखर. यांतील आपण पहिल्या तीन जिन्नसांची महत्ता जाणली; आता शेवटचे दोन घेऊ.
दुधाने स्नान घातल्यानंतर पाण्याने मूर्ती साफ केली जाते व तद्नंतर येते मधाचे स्नान.
तरुपुष्पसामुद्भुतं सुस्वाद मधुरं मधु|
तेजः पुष्टिकरं दिव्यं स्नानार्थं प्रतिगृह्यताम॥
- हे देवा, तरुपुष्पातून निर्माण होणारे स्वादिष्ट, मधुर, तेज आणि पुष्टीदायक असा दिव्य मध मी स्नानासाठी अर्पण करतो, त्याचा स्वीकार कर.
या श्लोकातच मधुरस आहे. मध गोड आहेच, पण त्याशिवाय ते पुष्टीदायक आहे.
आजच्या कलियुगात मायेच्या रूपाने आसुरी शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनात विविध संकटे निर्माण होतात. काही मानवनिर्मित, काही मानव स्वभावामुळे. काही निसर्गनिर्मित, काही निसर्गाचा मानवाने नाश केल्याने.
याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाला सामर्थ्य हवे. सत्यात फार सामर्ध्य असते म्हणून ते विजयी होते. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात- ‘सत्यमेव जयेते|’ पण पुढे ते म्हणतात- ‘सत्य सामर्थ्यभेव जयते|’
इतिहासाकडे नजर टाकली तर हा मुद्दा लगेच लक्षात येतो की, ज्या-ज्या व्यक्तींनी सत्याचे पालन केले, त्या-त्या व्यक्तींना विविध संकटे आली. पण आपल्या सामर्थ्यामुळे त्यांनी सर्व संकटांचा सामना केला. ते विजयी झाले. हे सामर्थ्यदेखील विविध क्षेत्रांतील, पैलूंतील होते- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. यांतदेखील विविधता आहेच- संत, महापुरुष, ऋषी-महर्षी, राजे-महाराजे, स्त्री-पुरुष, अगदी देव आणि अवतारदेखील.
मध हेदेखील या पुष्टीचे प्रतीक आहे. मानवी जीवन भक्तीच्या शक्तीने पुष्ट व्हायला हवे. श्रीमद् वल्लभाचार्य म्हणतात की, अशा पुष्ट भक्तालाच भागवत्प्रेमाचा आनंद मिळू शकेल.
मधुस्नानानंतर शेवटी येते ते शर्करास्नान.
इक्षुसारसमद्भुता शर्करा पुष्टिकारिका|
मलापहारिका दिव्या स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥
- हे देवा, उसापासून निर्माण होणारी पुष्टीकारक व मलापहारिका अशी दिव्य साखर मी तुला स्नानार्थ देत आहे, तिचा स्वीकार कर.
चौफेर नजर फिरवली तर एक दुःखदायक दृश्य नजरेत येते. ते म्हणजे, अनेकांच्या जीवनात गोडवा नाही. त्यांतील काहीजणांना नोकरी, घरदार, जेवण, कपडेलत्ते मिळत नाहीत. त्यांची स्थिती आपण समजू शकतो, पण अनेकजण असे आहेत की त्यांच्याकडे सर्वकाही आहे पण जीवनात अनेक कारणांमुळे गोडवा नाही. मग अशा जीवनाला अर्थ काय?
सर्वात आधी गोडवा हवा तो बुद्धीचा. त्यामुळे ज्ञान महत्त्वाचे. बुद्धी तेजस्वी असली तर येईल तो मनाचा गोडवा. तद्नंतर आपोआप विचार, बोल, कर्म… सर्वच गोड होतील. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात- ‘वचने का दरिद्रता?’
यासंदर्भात एक छान सुभाषित आहे-
प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवाः|
तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता॥ - प्रिय बोलल्याने सर्वांना आनंद होतो, मग तसे बोलण्यात वाणीची दरिद्रता कशासाठी?
प. पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात- ‘गोड वाणीमागे जीवनाची मधुरता नसेल तर केवळ ही वाणीची मधुरता खुशामत म्हटली जाईल; आणि खुशामत हे सौम्य वीष आहे, जे देणार्याला व पिणार्याला दोघांनाही पतनाच्या मार्गाकडे घेऊन जाते.’
सुलभाः पुरुषाः राजन् सततं प्रियवादिनः|
अप्रियस्यापि पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः॥ - खरी गोष्ट नेहमी कडूच असते. पण सांगणार्या माणसाचे जीवन जर मधुर असेल तर कडू सांगूनही तो माणूस स्वतः कडू बनत नाही.
अनेक संतांचे जीवन बघितले तर ही गोष्ट दृष्टिक्षेपात येते. समाजाच्या, व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना कटू गोष्टी, जीवनातील कठोर सत्य सांगावे लागले, पण त्यांचे मन प्रेमळ होते. जीवन शुद्ध आणि पवित्र होते.
संत तुकारामांना अनेकांनी त्रास दिला. त्यांचा छळ केला. ते ज्ञानी भक्त होते. विठ्ठलावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. पण रागाने त्यांना म्हणावे लागले-
वेदांचा तो अर्थ आम्हांसी ठावा,
इतरांनी वहावा व्यर्थ भार॥
बालपणात मूल आजारी असते त्यावेळी वैद्य जे औषध देतात ते कडू असते. पण आपल्या प्रिय मुलाचे हित लक्षात घेऊन आई ते कडू औषध मुलाला पाजतेच. तसेच कटू सत्य सांगण्याचा अधिकार संतमहात्म्यांनाच आहे. साखर स्वतःचे अस्तित्व संपवून प्रत्येक वस्तूमध्ये गोडवा निर्माण करते, तसेच महापुरुष संकटांचा सामना करीत समाजात मधुरता निर्माण करतात.
शास्त्रीजी म्हणतात ः
- भगवंताला शर्करास्नान घालताना अशी महानता हे आपले लक्ष्य असले पाहिजे.
- प्रभुशक्तीमध्ये जर मानवाचा अहंकार विरघळत नसेल तर जीवनदेखील फिकेच राहील.
- भगवंताला घातलेल्या पंचामृत स्नानात आपली भक्ती प्रगट होते. त्याचे रहस्य समजून आपण त्याचे पान केले तर आपल्या शक्तीचे संवर्धन होते.
- पंचामृताची शुभ्रता, परिवर्तकता, स्निग्धता, पुष्टीदायकता आणि मधुरता आपल्या जीवनात प्रगटो हीच अभिलाषा.
मला खात्री आहे की यापुढे पंचामृतस्नान करताना योगसाधक त्यामागचा भाव समजून पूजा करतील.
संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतिपूजन- ‘पंचामृत’