– प्रकाश आचरेकर, मुंडवेल, वास्को
माणसाच्या जीवनातील सर्वांत मोठी घटना म्हणजे त्याचा मृत्यू होय. साहजिकच त्याच्या जीवनातील तीच सर्वांत भयानक घटना आहे. तेव्हा जीवन काय आहे? साध्या व सरळ भाषेत सांगायचे तर माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कालखंडाला जीवन म्हटले जाते. जीवन सुरू होणार्या जन्मस्थितीबद्दल लोकांचे अनेक विचार आहेत. काही लोकांच्या मते जन्म म्हणजे मातेच्या उदरात मीलन झालेल्या क्षणापासून जिवाची निर्मिती होते व तिथूनच त्याचे जीवन सुरू होते. काही लोकांच्या मते मातेच्या गर्भाशयातील अर्भकाच्या मेंदूच्या मध्यकेंद्राचा विकास होतो त्या कालापासून जीवन अथवा चेतना अथवा समज सुरू होते. तर काही लोकांच्या मते मुलाचा जन्म होऊन मूल मातेपासून वेगळे होते त्या क्षणापासून त्याचे जीवन मानले जाते.
जन्माप्रमाणे मृत्यूबद्दलही भिन्न विचार आहेत. अनेकांच्या मते वैद्यकशास्त्रानुसार, माणसाच्या मेंदूचा मृत्यू झाला की, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे मानले जाते. परंतु काही वेळा अपघाताने किंवा उच्च रक्तदाबाने रक्तवाहिनी फुटल्यास मेंदूच्या काही भागास रक्तपुरवठा होत नाही व त्याच्या पुढच्या भागात रक्तपुरवठा नसल्याने पेशी मृत होतात आणि त्यांच्या संबंधातील शरीराचा भाग बधीर अथवा निकामी होतो, पण मेंदूचा इतर भाग कार्यरत असल्याने त्या व्यक्तीचे जीवन सुरूच असते. परंतु मध्यमेंदूचा ‘हायपोथेलामस’ मृत झाल्यावर संपूर्ण मेंदूच मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. परंतु परंपरागत नियमाप्रमाणे हृदयाचे स्पंदन व श्वास बंद पडतो, त्या स्थितीला मृत्यू असे म्हटले आहे.
जीव हा भूक, तहान, भय, काम, आनंद, सुख, दुःख, क्रोध, आशा, निराशा वगैरे अनेक गुणांनी भरलेला आहे. त्यापैकी भूक व कामवासना या प्रमुख गुणांपेक्षाही भय हा प्रमुख महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपल्या आजारात व प्रतिस्पर्धेत भीती ही ठेवावीच लागते. भीतीमुळेच आपले तसे सर्व प्राण्यांचे जीवन आहे. भीती जीवनात नसती तर कोणीही केव्हाही इतर प्राण्यांचा सहजतेने भक्ष्य झालो असतो. अथवा क्षुल्लक कारणावरून आत्महत्येने जीवन नष्ट केले असते. तात्पर्य, भीती आहे म्हणून जीवन आहे. काही प्रमाणात भीती हा जन्मापासून आलेला गुणधर्म आहे तर काही प्रमाणात भीती हा गुणधर्म अनुभवावरून आलेला आहे. उदा. मुलाला आगीचा चटका आला की जीवनभर त्याची भीती वाटू लागते, तर काही प्रमाणात दुसर्याने सांगितलेले ऐकून अमूक गोष्टीची भीती वाटू लागते. उदाहरणार्थ, आई मुलाला सांगते की, अमुक वस्तू विषारी आहे. ते ऐकल्यावर मुलाला त्या वस्तूची भीती वाटू लागते. अनेकवेळा प्रसंगानुसार प्रेम, काम, क्रोध व स्फूर्ती यांचा भीतीवर वरचष्मा होतो. या काही काळात माणसांच्या मनातील भीती नाहीशी होते. काही वेळा खून करण्यासारखी वाईट कृत्येही अशी माणसे करतात.
माणसाच्या मनात भीती ही असायलाच हवी. परंतु ती अनाठायी अथवा जास्त असू नये. अशा माणसांना समाज भित्रा म्हणून उद्देशतो. अनेक वेळा आपण करीत असलेली गोष्ट चुकीची आहे काय? आपल्या हातून चूक होते काय? या गोष्टीने काही घाबरतात. ही अनाठायी भीती मनुष्यप्रेम आणि निसर्ग अथवा प्राणीजीवन हे आपले कुटुंब आहे आणि आपण त्याची सेवा करीत आहोत, या उद्देशाने आपण निर्भय होऊन स्फूर्तीही येते.
माणसाच्या जीवनात आत्मविश्वास हवा, तर तो थोडा निर्भयही असावा लागतो. तो माणसाला शिक्षणाद्वारे संपन्न होतो. शिक्षण हे मनुष्य जीवनाच्या अर्थाचे विवरण करते. शिक्षण हे माणसाची जीवनावश्यकता व्यसनमुक्त आनंदी जीवन, व्यक्तिमत्त्व व त्याशिवाय जग कसे आहे व त्यात आपली भूमिका कशी असावी हे विदित करते. परंतु आरोग्य, आयुष्य व पैसा यांनी समृद्ध असून चांगल्या शिक्षणाशिवाय असलेले जीवन हे अधुरेच आहे. म्हणूनच आधुनिक जगातील माणसाला खर्या अर्थाने जीवनाचा भोग भोगायचे तर त्याला शिक्षणाचा तिसरा डोळा अत्यंत आवश्यक आहे.
माणसाच्या जीवनात कमतरता ही असतेच. कुठलाही माणूस हा पूर्ण सुखी असतच नाही. परंतु तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती असे आढळते की माणसाच्या जीवनातील काळ पन्नास टक्के झोपेत अथवा निष्क्रियतेत गेलेला असतो. पुढील तीस ते चाळीस टक्के केवळ कामाच्या कटकटीत अथवा दुःखी विचारांत गेलेला असतो. शेवटी खरे सुख हे फक्त १० टक्क्यांहून कमीच असते. तरी काही लोक त्याहून जास्त सुखी असतात. अशा जास्त सुखी माणसाच्या जीवनात एक दुःख आल्यास तो त्याचे कुटुंब दुःखाने वेडेपिसे होत असल्याचे आपण पाहत असतो. त्याउलट जास्त दुःखी माणसाच्या जीवनात एक लहानसे सुख आले की तो फार आनंदी दिसतो. शेवटी माणसाच्या जीवनात कुठली तरी कमतरता असणे ही आवश्यक गोष्ट आहे. त्याच धडपडीत सुखदुःख सामावून घेण्याची शक्ती हेच खरे जीवन आहे.
माणसाच्या जीवनाच्या कालमर्यादेबद्दल बोलायचे तर त्याला अमूकच अशी मर्यादा नाही. माणसाला जन्माच्या दिवसापासून नव्वद – शंभर वर्षांपर्यंत केव्हाही मृत्यू येऊ शकतो. परंतु माणूस किती वर्षे जगला, त्याचबरोबर तो कसा जगला व जगलेल्या काळात काय कामगिरी केली हे महत्त्वाचे आहे. उदाहरण मोगल राजा औरंगजेब दीर्घायुषी होता. परंतु त्याच्यानंतर अनेक वर्षांचे त्याचे साम्राज्य धुळीला मिळाले, तर अल्पायुषी शिवाजी महाराज खंबीर मराठा राज्य स्थापनेच्या कर्तव्यामुळे महाराजा म्हणून गौरवले गेले. माणसाने आपल्या जीवनात समाज व कुटुंबामधील कर्तव्य तडीस नेण्यास प्रयत्नात राहिले पाहिजे. प्रत्येक माणसाचे जीवन हे त्याच्याच हातात असते, त्याला आकार देणे त्याच्याच हातात असते.
पक्षी ज्याप्रमाणे दगडधोंड्याच्या ढिगार्यातून धान्याचे दाणे टिपतो, त्याचप्रमाणे माणूसही वर्तमानकाळातील सुखदुःखातून सुख निवडत असतो. तरी आपल्या जीवनात सुखाबरोबर दुःख येत असते. त्याला सामोरे जाण्याचा धीर असावा लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला आपल्याभोवती प्रेमाच्या व्यक्ती असाव्यात असे वाटते. म्हणून आपण जुने मित्र व नाते सहसा तोडत नाही. कसाही असला तरी जिवलग मित्राशीच आपल्या दोन गोष्टी सांगणे होते. म्हणून आपण आपल्या जाणत्यांना मान देतो व लहानांकडून मान घेतो. फक्त मोठ्यांनी आपल्याला एकेरी बोललेले आवडते. जसजशी जाणती माणसे कमी होतात व आपल्याला नावाने हाक मारणारी माणसे कमी होतात, तेव्हा आपल्याला जाणवते की आता आपण जाणते झालेलो आहोत, आपल्यावर कुटुंबाची व समाजातही मार्गदर्शनाची जबाबदारी येते व त्याचबरोबर वय वाढते म्हणून भीती वाटू लागते.
आता जीवनातील शेवटचा भाग मृत्यू होय. त्याला सर्व थांबणे असेच समजतात. तेव्हा मरणाच्या दारात आलेल्या माणसाला आपण जगाचा व कुटुंबियांचा शेवटचा निरोप घेत आहोत व पुढे कधीच त्यांना भेटणार नाही या भावनेने तसेच शरीरयातना वाढत असल्याने त्याला दुःख व भीतीने घेरले जाते. धार्मिक माणसे मेलेला माणूस आपल्या धार्मिक कर्मांनुसार स्वर्गात अथवा अधोगतीला किंवा नरकात पोचतो असे म्हणतात. काहीजणांच्या मते ते एक संक्रमण आहे. या जन्मातील विचार, मूल्ये, महत्त्वाकांक्षा व आशा आकांक्षा पुढच्या जन्मात नेणारी मृत्यू ही स्थिती आहे. अथवा या जन्माच्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात मिळणार आहे. पण हे दुःख व भीती हा जीवाचा गुणधर्म आहे एवढेच. त्याचा जन्म – मरणाशी काय संबंध असणार? शेवटी विश्व हे चेतनेने भरलेले आहे आणि प्रत्येक जीव हा त्या चेतनेचा अंश आहे आणि मृत्यू हा त्यातील नैसर्गिक बाब आहे. म्हणून त्या चेतनेला उचित आहे तेच होत आहे, नव्हे काय?