26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

जीवनसौंदर्याचा वेध घेणारे जीवनसौंदर्याचा वेध घेणारे  कविकुलश्री बा. भ. बोरकर

 – सोमनाथ कोमरपंत

… इथे श्रुती धन्य जहाल्या…. बोरकर शब्दसृष्टीचे किमयागार झाले… या दीर्घकालीन इंद्रदिनांचा रसिकमनांवरील असर अजूनही सरत नाही. कारण कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांची कविता ही त्यांच्या नित्यनूतन आनंदाचा ठेवा आहे………………………… 

३० नोव्हेंबर १९१०ला बा. भ. बोरकरांचा जन्म झाला. त्याला आज १०७ वर्षें झाली. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी कुडचडे येथे झाला. बोरी हा त्यांचा मूळ गाव. आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने त्यांनी जन्मगावाला अर्थपूर्णता प्राप्त करून दिली. सिद्धनाथाच्या पायथ्याशी नारळी-पोफळींनी विनटलेला बोरी गाव आजच्या घटकेलाही स्वप्नभूमीसारखा वाटतो. अघनाशीनी ऊर्फ जुवारीचे विस्तीर्ण पात्र या भूमीलगत आहे. हिरवळ आणि पाणी यांचे नित्य सान्निध्य लाभलेल्या या भूमीत बोरकरांना बालपणीच गाणी सुचली यात नवल ते काय? येथल्या वृक्षवल्लरीदेखील त्यांच्या कानात गाणी गुणगुणत होत्या. पावसाळी निर्झर या लय-तालात समरस होत होते. साथीला नवदुर्गेच्या मंदिरातील ढोल, नगारे, ताशा वाजत होते. पक्ष्यांचे मधुर गान या सुरावटीत भावमग्न होत होते.

श्रावणातील रात्री अभंग गायनात, ग्रंथपठनात व कथा-कीर्तनात तल्लीन व्हायच्या. या सार्‍या नादलयीत बोरकरांचे कान तयार झाले. त्यांना उच्चारलेल्या शब्दांना आणि लिहिलेल्या कवितांना ही धून सहजतेने प्राप्त झाली. पात्रिस रेंदेराचे कांतारदेखील त्यांनी तेवढ्याच तन्मयतेने ऐकले. डोळस श्रवणभक्ती हा बोरकरांचा स्थायीभाव बनला. कानातले मनात उतरले. रूप-रस-गंध-नाद-स्पर्श या पंचसंवेदनांचे डोळे त्याला प्राप्त झाले. इथे श्रुती धन्य जहाल्या…. बोरकर शब्दसृष्टीचे किमयागार झाले… या दीर्घकालीन इंद्रदिनांचा रसिकमनांवरील असर अजूनही सरत नाही. कारण कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांची कविता ही त्यांच्या नित्यनूतन आनंदाचा ठेवा आहे.

बा. भ. बोरकर यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते. प्रत्येक पैलू तेवढाच दैदीप्यमान. पण कविता हा त्यांच्या जीवनाचा मर्मबंध. प्राणहेतू ते त्यांचे प्रेयस् आणि श्रेयस्‌ही. बोरकर आनंदयात्री होते. त्याच्या खाणाखुणा त्यांच्या प्रत्येक कवितेत ओथंबून वाहताहेत याची रसिकमनाला जाणीव होते.

उदा.

सुख जालें सुख जालें काट्यातुनि सुम आले,

स्वर्गातिल जलसेकीं मन न्हालें मन न्हालें

वन आतां वासंतिक नवकिसलय – बहराचें

स्वर्णारुण किरणांतील द्विजकूजन – प्रहराचे,

उसवति हृदयात झरे, उसळति उदकांत हिरे

सजल उन्हीं, अमल घनीं वर्णोपम ध्वनि गहिरे या अभिव्यक्तीतील शब्द आणि अर्थ यांची अनुपम गळामिठी अनुभवावी आणि तृप्त व्हावे. बोरकरांच्या कविमनाला सुरुवातीपासून पारलौकिकाची ओढ होतीच; पण ऐहिकतेत त्यांचे मन निरंतर सौंदर्याचा शोध घेत राहिले ः

येथल्या पर्जन्यसेकीं ऐकतो तेथील केका,

येथल्या दुःखास देते नेत्र माझी चित्रलेखा

येथल्या प्राणांत फांदी तेथल्या कल्पोद्भवाची

तेथली सृष्टीच येथें आपुलालें बिंब पाहे, 

रश्मिसा राहून बिंबी मी तिला चुंबून आहे.
संवेदनक्षम वयातच बोरकरांना कवितेचा छंद जडला. आपल्या दैवदत्त गुणांची जाणीव त्यांना लहान वयातच झाली. जन्मजात प्रतिभेला प्रयत्नांची जोड मिळाली. व्युत्पन्नता आणि रसज्ञता यांचा मनोज्ञ मिलाफ त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वात झाला. त्यांच्या आंतरिक आनंदाचा स्वर कवितेत उमटला. त्यांचे बालपण एका मंतरलेल्या कालखंडात गेले. ‘एका पिढीचे आत्मकथन’ या वा.रा. ढवळे यांच्या गौरवग्रंथात बोरकरांनी बालपणी स्वतःवर झालेल्या संस्कारांविषयी आणि प्रभाव टाकणार्‍या व्यक्तींविषयी समरसून लिहिले आहे. हा साराच तपशील वाचनीय, मननीय आणि आल्हाददायी. बोरकरांवर बालपणी वाचनाचे, श्रवणाचे आणि विविध कलांचे जे संस्कार झाले, त्यांविषयी त्यांनी उत्कटतेने लिहिले आहे. हे सारे संस्कार त्यांनी अंतःप्रेरणेने स्वतःमध्ये मुरवून घेतले. या सर्वांच्या मुशीतून त्यांच्या व्यक्तित्वातील रससिद्ध कवीचा आत्मा घडत होता. या सार्‍या धडपडीत त्यांच्या जीवनधारणेचे आणि साहित्यसाधनेचे अंतःसूत्र सामावले आहे. बोरकर सौंदर्योपासक होते.

पूर्वसूरींवर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांचे काव्यलेखनातील आदर्श भा.रा.तांबे यांचा आनंदवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला होता. रामायण-महाभारत ही महाकाव्ये, संस्कृतमधील भवभूती, कालिदास इत्यादिकांचे अभिजात वाङ्‌मय, ज्ञानदेव-तुकाराम आणि अन्य संतकवींनी निर्माण केलेली समृद्ध काव्यपरंपरा, रवींद्रनाथ, श्री अरविंद यांच्या प्रतिभेचे झालेले संस्कार यांनी मिळून बोरकरांच्या प्रतिभाधर्माचे पोषण केले होते. समकालीन मराठी कवितेचे डोळसपणे ते परिशीलन करीत होते. एवढेच नव्हे तर काव्यक्षितिजावर उगवणार्‍या नव्या तार्‍यांचे ते ऊबदार मनाने स्वागत करीत होते. बोरकर या सार्‍यांच्या सहवासात ते रमले. काव्य-शास्त्र-विनोदाच्या या मैफलीत त्यांच्या गोष्टीवेल्हाळ वृत्तीला आगळा-वेगळा रंग चढायचा. अंगावरची शाल सरसावीत मुक्त मनाने ते हृदयसंवाद करायचे. स्वतःच्या कविता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ढंगात पेश करायचे. रसिकजन त्या काव्यरसात डुंबून जायचे.बोरकरांनी निर्माण केलेल्या वाङ्‌मयीन इंद्रधनूकडे पाहत राहावे आणि त्यांच्या काव्यरसाच्या आकंठ पानात मग्न व्हावे असे प्रत्येक रसिकाला का वाटते? याचे कारण बोरकरांची जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक अनुभूती. सौंदर्य शोधण्याची वृत्ती. जगात घाण आणि चिखलच असला तरी त्यांना कमळ गुणगंधाचा नवा उखाणा घालत आहे असे सदैव वाटायचे.

आपण सारेच निसर्ग पाहतो. त्याच्या विविध विलसितात रमतो. पण बोरकरांसारखा समर्थ कवी जे शब्दशिल्प घडवितो ते अम्लान स्वरूपाचे असते. निसर्गानुभूती हे बोरकरांचे बलस्थान आहे. कविमनातील ऊर्जा आणि निसर्गातील ऊर्जा यांचा समसमा संयोग त्यांच्या काव्यनिर्मितिप्रक्रियेत होतो. प्राचीन संस्कृत कवी ‘गीतगोविंद’कार जयदेव आणि आधुनिक कविकुलातील श्रेष्ठ कवी बालकवी या कवींप्रमाणेच बोरकरांची शब्दसृष्टी ही ‘मधुरकोमलकांत पदावली’ आहे. सहा ऋतूंचे सहा सोहळे दृश्यमान करावेत ते बा.भ. बोरकरांनीच. प्रत्यक्षातील सृष्टीपेक्षा ही सृष्टी विलोभनीय आणि अभिनव वाटते. बा.भ. बोरकर आणि त्यांची पर्जन्यसूक्ते यांच्यात अतूट अनुबंध आहे. ही पर्जन्यसूक्ते स्वर्गसुखाचा आनंद प्राप्त करून देणारी आहेत. लौकिक सृष्टीला अलौकिक शब्दांचा परीसस्पर्श झाला म्हणजे असे सौंदर्यलेणे जन्मास येते. अशा वेळी रसिकाच्या आनंदाला फांद्या फुटून निळे पाखरू झेप घेते. तो या काव्यानुभूतीपासून नामानिराळा राहूच शकत नाही.

निसर्गविभ्रमांचे वर्णन करताना कवीचे डोळे त्या क्षणचित्रमालिकांकडे सूक्ष्मतेने आणि तीक्ष्णतेने फिरत राहतात. ही भिरभिरणारी सौंदर्यसाक्षी दृष्टी हे बोरकरांचे गुणवैशिष्ट्य. बोरकर …

बघ इकडे बघ तिकडे

वन प्रसन्न हरित गार

उदक स्वच्छ गाढ निळे ः

किरण जाय आर पार

होतीच नुक्तीच उन्हें ः

दवकणांत द्युतिसुमनें,

सुटला मनमुक्तपणें

गवतांतून गंधभार

पण आता घन गरजे

भूमि भिजे रोह रुजे

जडले बंध खूळ विजे

नाचे जणू तप्त तार

सौंदर्याच्या उन्मेषाला क्षणजीवी मानायला बोरकर तयार नाहीत. त्यांना जाणवते ती त्याच्यातील चैतन्यरूपाची चिरंतनता. या निरंतर सोहळ्यात त्यांचे भान हरपून जाते. असेच आणखी एक बहारदार क्षणचित्र ः

सर ओसरली जरा, ऊन शिंपडलें थोडें,

चमकलें गारांपरी शुभ्र प्राजक्ताचे सडे

इटुकल्या पाखराने निळी घेतली गोलांटी,

फूल लांबट पिवळें झालें सोन्याची वेलांटी

आलें भिंगरी होऊन एक पोपटी पिसोळें

त्याला पाहून हासलें ऊन पानांतले ओलें
बोरकरांच्या प्रेमकवितेचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. शारीर संवेदनांची चित्रे ते उत्कटतेने रंगवतात. प्रेमानुभूतीच्या विविध छटांचे आणि तरल मनोवृत्तीचे दर्शन त्यांतून घडते. प्रेयसीच्या सान्निध्यात प्रियकराला येणारी गोड अनुभूती, थरथरती स्पंदने आणि तिच्या पार्थिव-अपार्थिव रूपांची नितांत रमणीय भावचित्रे त्यांच्या प्रेमकवितांमधून आढळतात. त्यांच्या प्रेमविषयक अनुभव घेण्याच्या पद्धतीतच एक प्रकारची बेहोशी आढळते. त्या कवितांत संवेदनशील मनाचा सौंदर्यपूर्ण आविष्कार असतो. कवी आपल्याला आलेला दृक्‌संवेदनांचा अनुभव भावकोमल स्वरात टिपतो. अन्य संवेदनाही ते सहजतेने टिपतात. त्यांच्या प्रेमकवितेतील निसर्गप्रतिमा या अनुभूतीतील अविभाज्य घटक म्हणून अवतरलेल्या असतात. त्यांतून त्यांच्या प्रेमकवितांतील भावगम्य आशय उलगडत जातो. त्यांच्या या कवितांतीलही नादमयतेचा आणि आशयसौंदर्याचा वेगळेपणाने विचार करता येत नाही. ‘जपानी रमलाची रात’मध्ये बोरकरांच्या प्रेमकवितेची अनेक वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. या कवितेतील शब्दाशब्दांतून प्रीतिभावनेच्या संमोहनाचा साक्षात्कार घडतो. ‘सजवू कार्तिकमास’ ही कविताही अनेक गुणविशेषांनी युक्त आहे.अशी ही बा. भ. बोरकरांची विविधरुपिणी कविता आणि तिने घातलेली रसिकमनावरील मोहिनी ‘विसरूं म्हणता विसरेना’ अशीच!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

शिक्षक नव्हे, दीपस्तंभ!

मीना समुद्र ज्ञानोपासक, संवेदनशील, करुणामय, उदार अंतःकरणाचे प्रेरणादायक, स्फूर्तिदायक शिक्षक ज्यांना लाभले ते सारे अत्यंत भाग्यवान. शिक्षक दीपस्तंभासारखे...

परी या सम हा…

जनार्दन वेर्लेकर ३१ जुलै २०२१ रोजी जयंत पवारांनी व्हॉट्‌सऍपवरून मला आश्‍वस्त केलं ‘खूप आभार वेर्लेकर! बरं वाटलं’ माझ्या...

आला आला ग कान्हा.. आ ऽ ऽ ला

डॉ. गीता काळेपर्वरी बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात विविध रूपात हा श्रीकृष्ण वसलेला आहे. म्हणूनच त्याचा जन्मोत्सव जन्माष्टमी, गोकुळाष्टमी...

भरती-ओहोटी

गौरी भालचंद्र जगणं म्हणजे भरती-ओहोटीच्या लाटांमधून अचूक वेळ साधून त्या त्या घडीला वाळूचा किल्ला बांधणं.. वाळूत किल्ले बांधण्याचा...

ऋतुचक्र

प्राजक्ता गावकर ती नवतरुणी झालेली वसुंधरा ग्रीष्माच्या कडक ज्वाळांनी भाजून निघालेली असताना आपल्या सख्या प्रियतमाला आर्तपणे साद घालून आपल्याला...