जीवनविकासासाठी करा अभ्यास

0
30

योगसाधना – ५२८
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – ११३

 • डॉ. सीताकांत घाणेकर

मानव हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. त्याशिवाय त्याला भावपूर्ण हृदयदेखील मिळालेलं आहे. सृष्टिकर्त्याची अशी अपेक्षा आहे की त्याने दोन्ही गोष्टींचा- बुद्धी व भाव- योग्य उपयोग करून जीवनविकास साधावा.

भारतीय संस्कृती श्रेष्ठ, अद्भुत, अजोड आहे. कितीही विशेषणे लावली तरी कमी पडतील. शब्द संपून जातील पण या संस्कृतीचे संपूर्ण आकलन होणे अत्यंत कठीण आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इथे उत्तम मार्गदर्शन आहे. ती जेवढी उच्च आहे तेवढीच सूक्ष्म व गूढदेखील आहे. जो कुणी या संस्कृतीचा अभ्यास करतो त्याला विविध पैलूंचे दर्शन घडते.

याचे मूळ कारण म्हणजे आपल्या ऋषीमहर्षींनी अत्यंत कष्टाने सृष्टिकर्त्याने बनवलेल्या त्याच्या कलाकृतीकडे कौतुकाने बघितले. प्रत्येक घटकाचा- भौतिक ते आध्यात्मिक- सूक्ष्म अभ्यास केला. प्रत्येक विषयावर चर्चा व चिंतन केले. आणि हे सर्व त्यांनी घनघोर अरण्यात त्यांच्या आश्रमात राहून- म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून, पवित्र अशा नद्यांच्या किनार्‍यांवर त्यांनी वास केला. या शांत अशा वातावरणात त्यांच्या बुद्धीला चालना मिळाली.

हजारो वर्षांपासून अनेक तत्त्ववेत्त्यांनी त्यात भर घातली. आपली विविध मते मांडली. त्यामुळे तिला एक सुंदर आकर्षक पुष्पगुच्छाची शोभा प्राप्त झाली.

स्वतः भगवंतालासुद्धा विविध अवतार घेऊन इथे या पवित्र भूमीत अवतरण्याचा मोह झाला. योगेश्वर कृष्णाच्या रूपाने तर त्यांच्या आवडत्या सख्याला – अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपाने उपदेश केला. यात वेद-उपनिषदांचे सार आहे. मानवाच्या विविध पैलूंवर – धर्म, कर्तव्य, भक्ती, योग, सद्गती, आत्मा… यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.
आपण भारतीय फार भाग्यवान- आपले संचित बळकट म्हणून आम्ही या देवभूमीत जन्म घेतला. पण त्याचबरोबर आपले दुर्भाग्य म्हणजे या संस्कृती मातेचे महत्त्व, श्रेष्ठत्व न समजल्यामुळे बहुतेकजण तिचा अभ्यास करत नाहीत. परदेशी संस्कृतीकडे जास्त आकर्षित होतो व सर्व आयुष्यभर सुख-शांती- समाधान शोधण्यासाठी सगळीकडे वणवण फिरतो व मार्ग न सापडल्यामुळे आणखी दुःखी होतो. इतर संस्कृतीमध्येही चांगले मुद्दे आहेत पण त्यात एवढी दिव्यता नाही. काहीजण या संस्कृतीचा अभ्यास करून आचरण करणारेदेखील आहेतच. पण हे अपवाद अगदी नगण्य आहेत.

खरे म्हणजे आपली संस्कृती प्रत्येक क्षेत्रात विश्‍वगुरू बनू शकते.
आजच्या विश्‍वांत अनेक विषय प्रचलित आहेत. त्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे महिलांबद्दल किंवा स्त्रियांच्या संबंधात- त्यांचे हक्क, त्यांची कर्तव्ये, त्यांचे कुटुंबातील व समाजातील स्थान आणि अशावेळी भारतीय संस्कृतीत या संदर्भात काय सांगितले आहे हेच बहुतेकांना माहीत नाही. उलट विपरीत ज्ञानामुळे आपण स्त्रीला गौण मानतो आणि परदेशी संस्कृतीचे मार्गदर्शन घ्यायला बघतो.
हा विषय समजण्यासाठी आपण –

 • अर्धनारीनटेश्वर – हा विषय विस्ताराने बघणे अत्यावश्यक आहे.
  पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी या विषयावर सूक्ष्म चिंतन करून मार्गदर्शनपर अत्यंत उपयुक्त ज्ञान दिले आहे.
 • नमः शिवाभ्यां नवयौवनयुक्त परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम्‌|
  नगेन्द्रकन्या-वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर-पार्वतीभ्याम्‌॥
 • कल्याण करणार्‍या, नवयौवनयुक्त, परस्पर आश्लिष्ट शरीर असलेल्याला नमस्कार. वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार.
  भगवंताने या विश्‍वांत अनेक प्राणी, पशुपक्षी, जीवजंतू, कृमीकीटक तयार केले. ते आपापल्या परीने जीवन जगतात व आनंदात आहेत पण त्यांना मानवासारखी बुद्धी व मानवाएवढे ज्ञान नाही. मानव हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. त्याशिवाय त्याला भावपूर्ण हृदयदेखील मिळालेलं आहे. सृष्टिकर्त्याची अशी अपेक्षा आहे की त्याने दोन्ही गोष्टींचा- बुद्धी व भाव – योग्य उपयोग करून जीवनविकास साधावा. फक्त बुद्धीचा उपयोग केला तर जीवन कोरडे भासेल व भावाचाच उपयोग केला तर जीवनाला अर्थ उरणार नाही. जीवनाच्या गुढाचे आकलन होणार नाही.

मानव दोहोंचाही उपयोग करतो त्यामुळे सृष्टी एक अपघात आहे असे तो म्हणू शकत नाही. सद्सद्विवेकबुद्धीचा वापर केल्यानंतर त्याच्या सहज लक्षात येते की सृष्टीच्या निर्मितीमागे व तिचा सांभाळ करण्यासाठी एखादी निश्‍चित शक्ती कार्यरत आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून म्हणजे हजारो वर्षांपासून तो जीव- जगत- जगदीश यांच्या परस्पर संबंधांबद्दल चिंतन करीत आहे.
शास्त्रीजी म्हणतात की शास्त्रातील वाक्ये, महापुरुषांचे अनुभव आणि सृष्टीतील प्रेरक दृश्ये त्याच्या विचारधारेला साहाय्यक आहेत.

ऋषीमहर्षींनी जे ज्ञान संपादन केले त्याप्रमाणे त्यांना प्रामुख्याने तीन क्रियांचे ज्ञान झाले- निर्माण-पालन-विनाश. म्हणजेच जो घटक तयार झाला त्याचे विसर्जनही अपेक्षित आहे. त्यामुळे तीन शक्ती या तीन कार्यासाठी आवश्यक आहेत- सर्जक- पोषक व संहारक हे त्यांना पटले. म्हणून त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या साकार रूपांना स्वीकारून त्यांना भरीव स्वरूप दिले.
खरे म्हणजे हे तीन देव वेगळे नाहीत तर एकाच शक्तीची ही तीन रूपे आहेत. पण विपरीत ज्ञानामुळे व शास्त्रशुद्ध अभ्यास करून ज्ञान न मिळवल्यामुळे मानवाने त्यांना वेगळे मानले. एवढेच नव्हे तर त्यांच्यात परस्पर संबंधही चांगले नाहीत असे बालिश विचार समाजात पसरवले. त्यांचे उपासकदेखील वेगवेगळे ठरले व त्यांच्यातसुद्धा गैरसमज पसरले.
या संदर्भात अनेक साधी उदाहरणे बघितली तर मूळ मुद्दा सहज कळतो.

उदा.- एकाच व्यक्तीला विविध कार्ये असतात त्यामुळे त्या नावाने त्याची ओळख असते- व्यक्ती एकच जी मुलगा, पती, भाऊ, वडील, जावई, मालक, नोकर… असू शकतात. तसेच सृष्टीत जरी वेगवेगळी कार्ये दिसत असली तरी मूळ शक्ती एकच आहे. त्याला नावे वेगवेगळी असली तरीही. शास्त्रकारांचा हा संकेत समजायला हवा.

पू. पांडुरंगशास्त्री समजावून सांगतात – ‘‘एकाच चिरंतन शक्तीची शास्त्रकारांनी कधी पुरुषरूपात तर कधी स्त्रीरूपात कल्पना केलेली आहे. खरोखर ही शक्ती न पुरुष आहे किंवा स्त्री आहे. त्या शक्तीच्या पौरुष व कर्तृत्वाची कल्पना करून आपल्या ऋषींनी तिला पुरुष ठरवले तर तिच्यात असलेले प्रेम व कारुण्य पाहून शास्त्रकारांनी तिची स्त्रीरूपातही कल्पना केलेली आहे’’.

 • त्वमेव माता च पिता त्वमेव.
 • ती आईही आहे आणि बापही आहे.
  या दोहोंच्या गुणांचा समावेश ज्याच्यात होतो अशा रूपाची कल्पना करून शास्त्रकारांनी भगवान शंकराला ‘अर्धनारीनटेश्‍वरा’चे रूप दिलेले आहे.
  पुढे महाकवी कालिदासाने रघुवंशात लिहिले आहे त्या संदर्भात शास्त्रीजी म्हणतात – ‘‘जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्‍वरी|’’
 • येथे पितरौ शब्दाची व्याख्या केलेली आहे त्यात माता गुप्त आहे.
 • माता च पिता च पितरौ.
 • स्त्रीत्वाचे गुण व पुरुषत्वाचे गुण एक मानतात. एकत्र होतात. तोच मानव ज्ञानाचे परमोच्च रूप आहे. केवळ नारीचे गुण मुक्तीसाठी उपयोगी नाहीत. मुक्ती प्राप्त करण्यासाठी नर व नारी यांचे गुण एकत्र आले पाहिजेत. म्हणूनच द्वैत निर्माण होताच भगवंतात नर-नारी दोघांचे गुण एकत्रित झाले. उदा. उमा-महेश्‍वरात- पौरुष, कर्तृत्व, ज्ञान व विवेक यांच्यासारखे नराचे गुण आहेत. त्याच्या जोडीला स्नेह, प्रेम, वात्सल्य यांच्यासारखे नारीचेही गुण आहेत. म्हणून हे पूर्णजीवन आहे.

आज चौफेर नजर फिरवली तर विविध क्षेत्रात महिलांचे उद्धारक दिसतात. अनेकांनी तर महिला-मुक्तीच्या चळवळीच उभारल्या आहेत. चांगलेच आहे. पण अशा या पवित्र कार्यात राग, द्वेष, अहंकार व राजकारण करू नये. तर सर्वांच्या कल्याणासाठी मूळ भारतीय तत्त्वज्ञान या संदर्भात काय मानते, काय सांगते त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा. सर्वांचा जीवनविकास होईल.
योगसाधक तरी हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवून गैरसमज दूर करतील अशी प्रामाणिक इच्छा व अपेक्षा बाळगू या. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृती पूजन)