जीम ट्रेनरकडून प्राध्यापिकेचा निर्घृण खून

0
9

>> जुने गोवेतील कदंब पठारावर फेकला मृतदेह; सावंतवाडीतील संशयिताला अटक

गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेचा जुने गोवे येथे खून झाल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. प्रेमसंबंध फिस्कटल्याच्या रागातून जीम ट्रेनर गौरव प्रकाश बिद्रे (३६, सध्या रा. जुने गोवे, मूळ रा. सावंतवाडी) याने प्राध्यापिका गौरी आचारी (३५, रा. खोर्ली-जुने गोवे) हिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयिताने खुनाची कबुली दिली असून, जुने गोवे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी आचारी या खांडोळ्यातील सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी सायंकाळपासून त्या बेपत्ता होत्या. या प्रकरणी गौरी यांच्या आईने जुने गोवे पोलिसांत तक्रार नोंदवली होती. ही तक्रार प्राप्त होताच जुने गोवे पोलिसांनी तपास सुरू केला. गौरी यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन या आधारे तपास सुरू केला. तसेच वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या आईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गौरव बिद्रे याला ताब्यात घेतले. तो जीम ट्रेनर म्हणून जुने गोवेत कार्यरत आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते; मात्र काही कारणास्तव दोघांतील संबंध फिस्कटले. हा विषय सोडवण्याच्या बहाण्याने गौरी आचारी हिला त्याने जुने गोवे येथे बोलावून घेतले आणि तिला निर्जनस्थळी नेत कारमध्ये गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रेमसंबंध, संपूर्ण घटनाक्रम आणि खुनाची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी संशयिताला खून केलेल्या घटनास्थळी नेले. गौरव याने गौरी यांचा खून करून मृतदेह जुने गोवेतील बायपास रोडजवळील कदंब पठारावरील झाडाझुडपांत टाकून दिला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात घेतला. पीडितेचा गळा दाबून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात पाठवला असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध भादंसंच्या ३०२ आणि २०१ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताला पोलीस कोठडीसाठी शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जीम ट्रेनर गौरव बिद्रे याला गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्‍वभूमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बिद्रे याने तीन वर्षांपूर्वी बोरिवली-मुंबई येथे जीम ट्रेनिंग देताना एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.